तीस वर्षांपासून देवू भोरे रस्सी वळतायत. जास्त चिवट धाग्यांपासून कच्चं सूत बाजूला करायचं. घरातल्या आढ्याला अडकवलेल्या आकड्याच्या मदतीने चिवट धागे नऊ फुटांपर्यंत ताणायचे आणि त्यांचे बिंडे बांधायचे. प्रत्येक बिंड्याचं वजन १.५-२ किलो भरतं. आठवड्यातले तीन दिवस सात सात तास करून असे १० बिंडे गुंडाळले जातात.
या पिढीजात धंद्यामध्ये सुताचा प्रवेश इतक्यातच झालाय. पूर्वापारपासून त्यांनी घायपातीपासून धागे काढले आहेत. पण त्या कामातून भागेनासं झालं तेव्हा त्यांनी सूत वापरायला सुरुवात केली. आणि आता बाजारात नायलॉनची चलती असल्यामुळे त्यालाही उतरती कळा आली आहे.
देवू लहान होते तेव्हा त्यांचे वडील महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरच्या १० किलोमीटरवरच्या जंगलांमध्ये चालत जायचे आणि घायपात घेऊन यायचे. इथल्या भागात त्याला फड म्हणतात. ते अंदाजे १५ किलो माल घेऊन यायचे. घायपातीचे काटे काढून टाकले की आठवडाभर ती घायपात पाण्यात भिजू घालायची आणि नंतर दोन दिवस सुकायला ठेवायची. या सगळ्यातून रस्स्या वळण्यासाठी दोन किलो तंतू मिळायचा. देवूंची आई, मैनाबाई देखील हे काम करायच्या आणि १० वर्षांचे देवू त्यांना मदत करायचे.
१९९० च्या सुरुवातीला भोरे कुटुंबियांनी घायपातीच्या ऐवजी सूत वापरायला सुरुवात केली – त्याच्या रस्स्या जास्त काळ टिकायच्या. शिवाय, देवू सांगतात, “लोकांनी जंगलं तोडल्यात. आणि फडापरीस सूत वापरणं सोयीचं आहे [घायपात भिजू घालायच्या, सुकवायच्या प्रक्रियेला खूप वेळ लागतो].”
१९९० पर्यंत त्यांच्या गावातली जवळ जवळ १०० कुटुंबं रस्स्या वळत असावीत असा देवूंचा अंदाज आहे. ते बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यातल्या बोरगावमध्ये राहतात. बाजारात स्वस्तातले नायलॉनचे दोर आले आणि कमाई घटू लागली तेव्हा अनेक जणांनी आसपासच्या गावांमध्ये शेतातली कामं करायला सुरुवात केली किंवा जवळच्या इचलकरंजी किंवा कागल शहरातल्या यंत्रमाग कारखान्यात किंवा स्पेअर पार्टच्या कारखान्यात कामं धरली.
सध्या बोरगावमध्ये भोरे कुटुंबाचे केवळ तीन सदस्य धडतपडत रस्स्या वळतायत – देवू, त्यांच्या पत्नी नंदूबाई आणि त्यांचा मुलगा अमित. त्यांची सून सविता शिवणकाम करते. धाकटा मुलगा भरत, वय २५ कागलच्या औद्योगिक वसाहतीत मजुरी करतो आणि दोघी विवाहित मुली, मालन आणि शालन गृहिणी आहेत.
“कित्येक शतकांपासून केवळ आमच्या समाजाचेच लोक रस्स्या वळतायत,” ५८ वर्षीय देवू सांगतात. ते मातंग या अनुसूचित जातीचे आहेत. “मी आमच्या बापजाद्यांची कला जिवंत ठेवलीये.” रस्स्या करणारी देवूंची ही चौथी पिढी आहे. ते दुसरीपर्यंत शाळेत गेले पण त्यांच्या आईवडलांना त्यांचं शिक्षण परवडेना गेलं आणि घरी रोज तीन तास चार गाया दोहायचं काम असायचं. त्यामुळे शाळेत जायला वेळ पण व्हायचा नाही.
आपल्या कुटुंबाचं हे पिढीजात काम हाती घेण्याआधी देवूंनी १० वर्षं इचलकरंजीत घरांना रंग देण्याचं काम केलंय. अधून मधून आपल्या एक एकर रानात पावसाच्या मर्जीप्रमाणे भुईमूग, सोयाबीन आणि भाज्या घेतल्या. सहा वर्षं असं सगळं केल्यानंतर त्यांनी वयाच्या २८ व्या वर्षी आपले वडील कृष्णा भोरे यांच्यासोबत रस्स्या वळायला सुरुवात केली.
सध्या देवू (बोरगावहून १५ किलोमीटरवर असणाऱ्या) इचलकरंजीहून ठोक प्रमाणात सूत आणतात, क्विंटलमागे रु. ३,८०० इतक्या भावाने. भोरे कुटुंबाला पंधरवड्याला सुमारे एक क्विंटल सूत लागतं ज्यातून १२ फुटी १५० रस्स्या तयार होतात. त्या वजनाला प्रत्येकी ५५० ग्रॅम भरतात. काही छोट्या रस्स्या पण बनतात.
तीन दिवस ते धागे तयार करतात आणि उरलेल्या दिवशी आर के नगरमधल्या त्यांच्या घराशेजारच्या कच्च्या मातीच्या रस्त्यावर १२० फुटी धागे ताणायचं आणि वळायचं काम करतात. एका टोकाला अमितच्या हातात एक यंत्र असतं, ज्याला सहा छोटे आकडे असतात, प्रत्येकाला धाग्याचा पिळा बांधलेला असतो. दुसऱ्या टोकाला नंदूबाई हातात भोरखडी घेऊन उभ्या असतात, ज्याला हे पिळे जोडलेले असतात.
आणखी एक तरफ असते जी पीळली की सूत पिळलं जातं. देवू या पिळलेल्या धाग्यांमध्ये लाकडी कारलं ठेवतात आणि जसे धागे वळतात, तसं ते वळवतात जेणेकरून धागे समान पद्धतीने आणि घट्ट पिळले जातील. या वळण्याच्या कामासाठी तीन माणसांना अर्धा तास एकत्र काम करावं लागतं. एकदा का हे सूत पिळलं गेलं की मग रस्सी वळण्यासाठी ते तयार असतं.
‘आम्ही एवढी मेहनत करतो तरी काही पैसा सुटत नाही. लोक आमच्याकडून या रस्स्या घेत नाहीत, शहरातल्या हार्डवेअरच्या दुकानातून घेतात’. रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या रस्सीपेक्षा दुकानातला माल भारी वाटतो त्यांना
कधी कधी जशी मागणी असेल त्याप्रमाणे देवू दोरी वळण्याआधी सूत रंगवतात. बसने ३० किलोमीटर प्रवास करून मिरजेला जाऊन ते रंगाची भुकटी घेऊन येतात – २६० रुपये पाव किलो – पाच लिटर पाण्यात ती कालवतात आणि त्यात धागे बुडवतात. रंगवलेले धागे उन्हात सुकायला दोन तास तरी लागतात.
देवूंचं कुटुंब शेतकऱ्यांसाठी दोन प्रकारचे दोर तयार करतं, तीन फुटी कंडा जो बैलाच्या गळ्याभोवती बांधतात आणि १२ फुटी कासरा जो नांगराला बांधला जातो. कासऱ्याचा उपयोग कापणी झालेलं पीकं किंवा काही घरांमध्ये बाळाच्या पाळण्याला बांधायलाही होतो. भोरे कुटुंबीय हे दोर आणि रस्स्या कर्नाटकातल्या सौंदलगा, कारदगा, अक्कोळ, भोज आणि गळटगा गावातल्या आणि महाराष्ट्रातल्या कुरुंदवाडमधल्या आठवडी बाजारात विकतात. रंगीत कासऱ्याला १०० रुपये आणि सफेदवाल्याला रु. ८० मिळतात, रंगीत कंड्याची जोडी ५० रुपयांना आणि सफेद ३० रुपयांना विकली जाते.
“आमची यातून फार काही कमाई होत नाही,” ३० वर्षांचा अमित सांगतो. एकूण हिशोब केला तर रोजचं आठ तासाचं काम धरलं तर भोरे कुटुंबियांना दिवसाचे १०० रुपये मिळतात – महिन्याला कसेबसे ९,००० रुपये. “दर वर्षी बेंदराला किंवा पोळ्याला रंगीत दोरांना भरपूर मागणी असते,” देवू सांगतात. त्यांच्या कुटुंबाची [चार भावात मिळून] एक एकर शेतजमीन खंडाने कसायला दिली आहे. त्याचा वर्षाचा जुजबी १०,००० रुपये खंडही त्यांना मिळतो.
“तुम्हाला आता बैल-बारदाना फारसा पहायला मिळायचा नाही,” देवू म्हणतात. “आता सगळी शेती यंत्रानी व्हायला लागलीये. मग या रस्स्या कोण घेईल हो?” नंदूबाई म्हणतात. पन्नाशीच्या नंदूबाई मूळच्या महाराष्ट्रातल्या जयसिंगपूरच्या एका शेतमजूर कुटुंबातल्या. पंधराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं, तेव्हापासून त्याही दोर वळतायत. “नायलॉन आणि प्लास्टिकचे दोर जास्त चालतात त्यामुळे सुती रस्स्या कुणी घेईना गेलेत. पुढची दोन वर्षं तरी आम्हाला या रस्स्या करणं परवडणारे का काय माहित?”
आपल्या धंद्यातल्या तुटपुंज्या कमाईमुळे निराश झालेला अमित म्हणतो, “बडे दुकानदार आमच्या रस्स्यांच्या जीवावर बसून खायाला लागलेत. आणि आम्ही इथे स्वतः मेहनत करून पण आम्हाला काही पैसा सुटत नाही. लोक आमच्याकडून नाही, शहरातल्या हार्डवेअर दुकानातून रस्स्या विकत घ्यायलेत.” त्यांना वाटतं की रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या रस्सीपेक्षा दुकानातला माल जास्त भारी असतो.
जरूर पहाः दोर वळायची कलाच गायब होऊ लागते तेव्हा - फोटो अल्बम
अनुवादः मेधा काळे