अंबादास काकडे यांनी समजून सवरून यंदा खरिपात दुसरं पीक घ्यायचं ठरवलं. शेतीच्या खर्चातील काही अंशी रक्कम परत मिळविण्याची ही त्यांची शेवटची आशा आहे.

जूनच्या मध्यात पडलेल्या समाधानकारक पावसानंतर परभणी जिल्ह्यातील सैलू तालुक्यातील मोरेगावचे रहिवाशी असलेल्या ८३ वर्षीय अंबादास काकडे यांनी कापूस, सोयाबीन, तूर आणि मुगाचं पीक घेतलं होतं. त्यानंतर ऑगस्टच्या मध्यापर्यंत सबंध मराठवाड्यात काहीच पाऊस झाला नाही. परभणी समवेत या भागातील जमिनीच्या लांबच लांब पट्ट्यांवर पेरलेली पिके वाळून गेली किंवा खुरटली. काकडेंनी लागवड केलेलं सोयाबीन, तूर आणि मूगसुद्धा सुकून गेलं.

“माझ्याकडे एकूण १० एकर जमीन आहे,” ते म्हणाले. “पैकी [जुलै महिन्या अखेर] एक एकर जमिनीतला कापूस उपटून मी कोबीची लागवड केली. कारण, कोबी तीन महिन्यातच उगवते आणि तिच्या पिकाला पाणीसुद्धा कमी लागतं. जर पावसाची स्थिती अशीच राहिली तर मी आणखी एका एकरात टमाट्याचं [कमीच पाणी  लागणाऱ्या] उत्पादन घेईन.”

आपल्या शेतात एक एकर जमिनीवर अगोदरच लागवड केलेला कापूस उपटून त्याऐवजी कोबीचं पीक घेतल्याने काकडेंना १५,००० रुपयांचा तोटा झाला आहे. जर अवर्षणाचं चक्र असंच सुरू राहिलं तर कोबीच्या लागवडीत खर्च केलेले १५,००० रुपये सुद्धा वाया जातील. “मला कळतंय हो, यंदाच्या खेपेला मला नफा मिळणार नाही,” ते म्हणाले.

PHOTO • Parth M.N.

अंबादास काकडे यांनी यंदाच्या खरीप हंगामात एक एकर कापसाऐवजी कोबीची लागवड करून एकप्रकारे धोकाच पत्करला आहे

काकडे यांच्यावर बँकेचं ३ लाख तर ५ लाखाचं खासगी कर्ज आहे. “केवळ [एक एकर जमिनीत] लागवड केलेल्या दोन्ही पिकांच्या लागवडीचा खर्च निघाला तरी पुष्कळ. बाकी पुढे जे होईल ती निसर्गाची कृपा! मागील दहा वर्षांत वातावरण अनिश्चित होत चाललं आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यातल्या रब्बीत माझी पैशाची आबाळ व्हायला नको.”

काकडे अख्ख्या १० एकरात कापसाऐवजी दुसरं पीक घेणार नाहीत. कारण तसं करायला फार खर्च येईल – आणि त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत. ऑगस्टच्या मध्यानंतर मराठवाड्यात पाऊसच झाला नाही, तेव्हा त्यांना परतीच्या मॉन्सूनची आशा वाटतीये. जर पाऊस पडत राहिला तर कदाचित नोव्हेंबर मध्ये कापसाचं पीक घेता येईल आणि त्यातून काही उत्पन्न मिळेल. मात्र, पहिल्या पेरणीत वाळून गेलेलं भरडधान्यं काही हाती लागणार नाही.

आपल्या शेतात दुबार पेरणी करून काकडे संकटातून वाचण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरिपाच्या पिकाला वाढीसाठी नियमित पाऊस लागतो. जर पाऊस तुरळक प्रमाणात पडत असेल किंवा अगदीच पडत नसेल तर चांगला उतारा मिळत नाही याची शेतकऱ्यांना कल्पना असते. अशात, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दुबार पेरणी करण्याकरिता ते तिळतिळाने भांडवल आणि तेवढंच धीर गोळा करतात, जेणेकरून किमान लावलेला पैसा तरी परत मिळेल. दुबार पेरणीनंतर पाऊस पडला तर मेहनतीचं चीज होईल, नाहीतर उलट फटका बसायचा!

काकडे सध्या ८० वर्षांचे आहेत. आपल्या शेतातून सावकाश चालत चालत ते म्हणतात की, अशा अनिश्चिततेचा त्यांच्यावर परिणाम होतो. “आमच्या कुटुंबात एकूण १६ सदस्य आहेत. माझ्या तिन्ही मुलांचं लग्न झालं असून तिघेही वरकमाईसाठी [आसपासच्या गावात] शेतमजुरी करतात. माझे नातू त्यांना कामात मदत करून अभ्यास करतात, ते वयाने लहान आहेत.”

काकडेंच्या पावलावर पाऊल ठेवत तीन किमी दूर असलेल्या खुपसा गावातील ४९ वर्षीय साहेबराव दसाळकर यांनी आपल्या १२ एकर कापसापैकी १.५ एकर काढून टाकला आहे. तेसुद्धा उरलेल्या पिकातून काहीतरी उत्पादन मिळेल अशी आशा धरून आहेत. “त्या १.५ एकरामागे मला २५,००० रुपयांचं नुकसान झालं आहे,” ते म्हणाले, “त्यावर मी कोबी लावणार आहे. मी जास्त पीक बदललं नाही, कारण नंतर पाऊस पडला तरीही प्रत्येक एकरामागे २-३ क्विंटल [चांगला मॉन्सून असल्यास ६-८ क्विंटल] कापूस सहज येईल. आणि त्यातून मला थोडा तरी नफा [ अंदाजे ४००० रुपये प्रति क्विंटल] मिळेल.”

PHOTO • Parth M.N.

खुपसा गावातील साहेबराव दसाळकर यांनी आपल्या शेतातील १ . ५ एकर कापसाऐवजी कोबीचं पीक घेतलं आहे , यंदाच्या खेपेला चांगलं उत्पादन मिळेल अशी ते आशा करतात

मराठवाड्यातील केवळ भरडधान्याचं उत्पादन घेणारे शेतकरी जास्त गंभीर संकटात आहेत. कारण, अशा कोरड्या वातावरणात ते तग धरून राहणं कठीण वाटतं. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील मलीहाप्पारगा गावातील ३५ वर्षीय हरी केंद्रे यांचं स्वतःचं पीक वाळून नष्ट झाल्याने त्यांच्यावर दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्याची पाळी आली. “दुबार पेरणीकरिता भांडवल जमा करण्याचा हा एकच मार्ग आहे,” जमीन नांगरत असताना ते म्हणतात. “माझ्या १० एकर शेतात पेरलेल्या सोयाबीन, मूग, तूर आणि उडदाच्या पिकाचं होत्याचं नव्हतं झालं. मला ६०,००० रुपयांचं नुकसान झालं.”

तुरळक पाऊस पडत असल्याने जळकोटमधील पाण्याचे स्रोतसुद्धा आटून गेले आहेत. “सूर्यफुलाला जास्त पाणी लागत नाही. मजुरी करून दिवसाला २०० रुपये रोजी मिळाली तरी मी दुबार पेरणीत सूर्यफूल लावीन.” ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या रब्बी हंगामात लागवडीकरिता पैसे जमा करण्याचा दुबार पेरणी हा एकच उपाय आहे. “माझ्यावर ४ लाखाचं खासगी कर्ज आहे,” ते म्हणतात, “मला पिकातून काहीतरी कमवावं लागेल का नाही, कर्जबाजारी व्हायची पाळी येईल नाही तर.”

PHOTO • Parth M.N.

पाऊस झाल्याने बरंचसं पीक वाया गेलं आहे किंवा खुरटलं आहे

मागील काही वर्षं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अशाच परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे. मॉन्सूनला वेळेत सुरुवात तर होते मात्र नंतर पुष्कळ आठवडे एक थेंबही पडत नाही. अशात बरेच शेतकरी दुबार पेरणी करतात. पण, या भागात २०१२-१५ अशी सलग चार वर्षे दुष्काळ राहिला आहे आणि शेतकऱ्यांची भांडवल जमा करण्याची क्षमताच कमी होत चाललीये. म्हणून २०१७ मध्ये फार कमी शेतकऱ्यांनी हिंमत दाखवली. बहुतेकांनी खरीप हंगाम हातचा गेल्याचंच कबूल केल्याचं दिसतं.”

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील ३२ वर्षीय गणेश भालेकर यांच्या मते अनेक शेतकऱ्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच खरीप हंगामाकरिता पैसे उसने घेतले होते. त्यामुळे त्यांनी दुबार पेरणी केली नाही. “आधीच पैसे उसने असल्यावर दुबार पेरणीसाठी पुन्हा पैसे उसने घेणं म्हणजे जिवंतपणी फाशी लावून घेणं आहे,” ते म्हणतात, “आमच्या डोक्यावर आधीच बरंच कर्ज आहे. अशात, थेट रब्बी हंगामाकरिता तयारी करणंच योग्य ठरेल.”

PHOTO • Parth M.N.

डावीकडे: बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील गणेश भालेकर आपल्या मुलांसोबत. उजवीकडे: सुरेश चोळे आपल्या पत्नीसोबत शेतावर बसलेले

भालेकरांनी एका सावकाराकडून १ लाख रुपये उचल घेतले आहेत. कास्तकार असल्याने त्यांना कुठल्याही बँकेतून कर्ज मिळू शकत नाही. एकूण १८ एकर जमिनीत १३ एकरात ऊस तर ५ एकरात सोयाबीन लावलं आहे. मालकासोबत झालेल्या सौद्यानुसार शेतीच्या खर्चातील ७५ टक्के खर्च मालक पाहतो आणि उरलेला २५ टक्के खर्च ते स्वतः पाहतात. शेतीतून मिळणारा नफा/ तोटा सुद्धा ते असाच वाटून घेतात.

“पाच एकरातील सोयाबीनचं अख्खं पीक वाळून गेलं,” वैराण दिसणाऱ्या पिकाकडे बोट दाखवून ते म्हणतात. “सोयाबीनवर गुंतवलेले माझे १५,००० रुपये सर्वच्या सर्व बुडाले असल्याचं मी स्वीकारलं आहे. आणि पाऊस न झाल्याने उसावरही परिणाम झाला आहे. उसावरची ही पांढरी वर्तुळं पाहिलीत? यंदा उत्पादन वाईट होणार….”

जळकोट तालुक्यातील कुलनूर गावच्या सुरेश चोळे यांची स्थिती भालेकरांपेक्षा वेगळी आहे. त्यांच्याकडे चांगला पाऊस पडल्यास विसंबून राहण्याकरिता ऊस किंवा कापसासारखं नगदी पीक नाही. त्यांनी आपल्या ४.५ एकर शेतात पेरलेल्या सोयाबीन, तूर आणि ज्वारीचं पीक वाईट अवस्थेत आहे. “हे पीक पहा,” ते म्हणतात, “आतापर्यंत [ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत] पिकं कमरेला लागायला पाहिजे होती. आणि इथे तर कसंबसं घोट्यापर्यंत आलीयेत.” ऑगस्ट महिन्यात नंतर पावसाने जोर धरला तरी चोळेंना काहीच उपयोग होणार नाही. “पिकाला नियमित पाऊस लागतो,” ते म्हणतात. “मी पेरणीलाच बी-बियाणं, कीटकनाशक आणि मजुरीवर ४५,००० रुपये खर्च केला होता. त्यातली १० टक्के रक्कमही मला वसूल करता येणार नाही.”

व्हिडिओ पाहा : हे पीक पहा ,” सुरेश चोळे म्हणतात , “ आतापर्यंत [ ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ] पिकं कमरेला लागायला पाहिजे होती . आणि इथे तर कसंबसं घोट्यापर्यंत आलीयेत

म्हणूनच इतरांप्रमाणे चोळेंनाही एक कठीण निर्णय घ्यावा लागेल: त्यांनी दुबार पेरणी करून आणखी पैसा घालवण्याचा धोका पत्करावा का? “माझी हिंमत नाही,” ते म्हणतात. “[आतापर्यंत] आतापर्यंतचाच दुष्काळ किती तरी तीव्र आहे. यापुढे धोका पत्करायची माझी हिंमत नाही.”

हे संभाषण झाल्याच्या दोनच आठवड्यांत ऑगस्टच्या मध्यात मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. चोळेंसारख्या शेतकऱ्यांना आपणही दुबार पेरणी करायला हवी होती असं वाटलं असणार. या भागातील शेतकऱ्यांच्या नशिबी दरवर्षीच हा जुगार आहे.

भाषांतर: कौशल काळू

Parth M.N.

ਪਾਰਥ ਐੱਮ.ਐੱਨ. 2017 ਤੋਂ ਪਾਰੀ ਦੇ ਫੈਲੋ ਹਨ ਅਤੇ ਵੱਖੋ-ਵੱਖ ਨਿਊਜ਼ ਵੈੱਬਸਾਈਟਾਂ ਨੂੰ ਰਿਪੋਰਟਿੰਗ ਕਰਨ ਵਾਲੇ ਸੁਤੰਤਰ ਪੱਤਰਕਾਰ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕ੍ਰਿਕੇਟ ਅਤੇ ਘੁੰਮਣਾ-ਫਿਰਨਾ ਚੰਗਾ ਲੱਗਦਾ ਹੈ।

Other stories by Parth M.N.
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo