हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
साफसफाई
आंध्र प्रदेशातल्या विजयानगरममधली ही आजी तिचं घर आणि अंगण अगदी आरशासारखं लख्ख ठेवते. ते तर घरकाम आहे – बायांचं काम. घर असो किंवा सार्वजनिक जागा, साफसफाईचं – घाणीतलं काम बहुतेक वेळा बायांच्याच वाट्याला येतं. आणि त्यातनं पैशापेक्षा लोकांची दूषणं आणि शिव्याच जास्त मिळत असाव्यात. राजस्थानातल्या या ताईची परिस्थिती तर आणखीनच भयानक आहे. ती दलित आहे. लोकांच्या घरातल्या संडासातला मैला तिला हाताने गोळा करावा लागतो. राजस्थानातल्या सिकरमधल्या जवळ जवळ २५ घरांमध्ये ती हे काम करते.
या कामासाठी तिला प्रत्येक घरातून एक रोटी इतका मोबदला मिळतो. महिन्यातून एकदा त्यांना कळवळा आला तर ते काही पैसे देऊ करतात. कदाचित घरटी १० रुपये. कागदोपत्री तिची नोंद ‘भंगी’ अशी असली तरी ती स्वतःची ओळख ‘मेहतर’ अशी सांगते. अशी कामं करणारे अनेक समुदाय आता स्वतःला वाल्मिकी म्हणवून घेऊ लागले आहेत.
डोक्यावरच्या पाटीतून ती मानवी विष्ठा वाहून नेते आहे. भारतातल्या सर्वात जास्त शोषित आणि कसलाच आवाज नसणाऱ्या नागरिकांपैकी ती एक. राजस्थानच्या एकट्या सिकरमध्ये अशा शेकडो जणी आहेत.
भारतात हाताने मैला गोळा करणारे, वाहून नेणारे असे नक्की किती जण आहेत? नक्की काहीच माहिती नाही. १९७१ च्या जनगणनेपर्यंत त्यांचं काम स्वतंत्र व्यवसाय म्हणून नोंदवला पण गेला नव्हता. काही राज्य सरकारं तर अशा मैला वाहून नेणाऱ्यांचं अस्तित्वच नाकारतात. तरीही, जी काही अर्धवट आकडेवारी उपलब्ध आहे त्यातून असं दिसतं की सुमारे दहा लाख दलित हे मैला वाहून नेण्याचं काम करतात. प्रत्यक्षात हा आकडा जास्त असणार. आणि संडासातली विष्ठा वाहून नेण्याचं काम बहुतेक स्त्रियाच करतात.




