हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
विटा, कोळसा आणि दगड
त्या फक्त अनवाणीच नाहीयेत, त्यांच्या डोक्यावर गरम विटा आहेत. फळीवरती उभे असलेले हे सगळे ओरिसातून स्थलांतर करून आंध्र प्रदेशातल्या वीट भट्ट्यांवर कामाला आलेले आहेत. बाहेरचं तापमान ४९ डिग्री इतकं भाजून काढणारं आहे. भट्टीत त्याहूनही जास्त उष्मा आहे. तिथे जास्त करून बायाच काम करतात.
दिवसाच्या कामाचे प्रत्येक बाईला १० ते १२ रुपये मिळतात. पुरुषांना मिळणाऱ्या तुटपुंज्या १५-२० रुपयांपेक्षाही कमी. ठेकेदार अशा स्थलांतरित कामगारांची संपूर्ण कुटुंबं उचल देऊन इथे घेऊन येतात. कर्जाच्या विळख्यामुळे या कामगारांना ठेकेदारांपासून सुटका करून घेता येत नाही. बहुतेक वेळा ते वेठबिगारीत ढकलले जातात. इथे येणाऱ्यांपैकी ९० टक्के भूमीहीन किंवा सीमांत शेतकरी आहेत.







