हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
बाजाराला, बाजारात...
ज्यांनी आणले त्या बायांच्या उंचीपेक्षा हे बांबू किमान तिपटीने लांब असतील. झारखंडच्या गोड्डामध्ये प्रत्येकीने किमान एक किंवा जास्त बांबू आठवडी बाजारात विकायला आणलाय. काही जणी तर १२ किलोमीटर चालत आल्यात, तेही डोक्यावर किंवा खांद्यावर बांबू तोलत. आणि अर्थातच त्या आधी जंगलात जाऊन बांबू तोडून आणायचं कामही त्यांनीच केलंय.
इतक्या सगळ्या मेहनतीनंतर दिवसाच्या शेवटी त्यांची २० रुपयाची जरी कमाई झाली तरी खूप. गोड्डातल्या दुसऱ्या एखाद्या बाजारात चक्कर टाकली तर दिसेल की काही जणी इतकंही कमवू शकल्या नाहीयेत. डोक्यावर पानांची चळत घेऊन येणाऱ्या या बायांनी ती पानं गोळा करून त्याच्या पत्रावळी शिवल्यायत. त्यांच्यासारख्या उत्तम टाकाऊ ताटल्या नाहीत. चहाची दुकानं, खानावळी आणि उपहारगृहात या शेकड्याने घेतल्या जातात. त्यातून बायांना जेमतेम १५-२० रुपये मिळत असतील. पुढच्या वेळी रेल्वे स्थानकावर जेव्हा अशा पत्रावळीत काही खाल, तेव्हा या तिथपर्यंत कशा पोचल्या ते तुमच्या आता लक्षात येईल.









