हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
धूळ उडवीत गायी निघाल्या
बिहारमधली शेणगोळे सुकायला ठेवणारी ही बाई देशाच्या अर्थव्यवस्थेत फार मोठं योगदान देते आहे. अर्थात या योगदानाची देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात मात्र कधीच दखल घेतली जात नाही. चुलीसाठी शेणाचा वापर करणाऱ्या लाखो कुटुंबांनी जर जीवाश्म आधारित इंधनाकडे वळायचं ठरवलं तर काय संकट ओढवेल याची कल्पना करणं मुश्किल आहे. पेट्रोल आणि आणि इतर इंधनाच्या आयातीवर आपल्या देशाचं जेवढं परकीय चलन खर्च होतं तितकं इतर कोणत्याच गोष्टीवर होत नाही. १९९९-२००० साली हा आकडा ४७,४२१ कोट रुपये म्हणजेच १०.५ अब्ज डॉलर इतका होता.
हा आकडा नक्की किती मोठा आहे ते समजून घेऊ या. अन्न, खाद्यतेल, औषधं आणि इतर औषधी पदार्थ, रसायनं, लोखंड आणि स्टील या सगळ्या घटकांच्या आयातीवर मिळून जितकं परकीय चलन खर्च होतं त्यापेक्षा हा आकडा तिपटीहून जास्त आहे. पेट्रोल आणि पेट्रोलजन्य पदार्थांच्या आयातीचा खर्च आपल्या एकूण आयातीच्या एक चतुर्थांश इतका आहे.
इतकंच नाही तर खतांवर होणाऱ्या आयातीवरील खर्चाच्या – १.४ अब्ज डॉलर - हा आकडा आठपट आहे. लाखो भारतीय शेतात उत्तम जैव खत म्हणूनही शेणाचा वापर करतात. म्हणजे त्या बाबतीतही आपला प्रचंड पैसा वाचतोय ते वेगळंच. कीटकरोधक म्हणून आणि इतर किती तरी गोष्टींसाठीदेखील शेणाचा वापर केला जातो. काहीही म्हणा, शेण्या आणि शेण गोळा करणाऱ्या बाया – अर्थात हेही बाईचंच काम आहे – देशाच्या गंगाजळीतले करोडोच नाही अब्जावधी डॉलर वाचवतात हे निश्चित. कदाचित शेअर बाजाराच्या यादीत शेण नाही म्हणून किंवा बायांच्या आयुष्याबद्दल किंवा शेण गोळा करण्यासाठी त्यांना पडणाऱ्या कष्टांबद्दल कुणाला घेणं देणं नाही म्हणून असेल – मुख्य प्रवाहातल्या अर्थतज्ज्ञांनी या गोष्टीची कधीही दखल घेतलेली नाही. त्यांना हे श्रम दिसतच नाहीत. त्याबद्दलचा आदर ठेवणं तर दूरच.




