हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया
ती चढण चढून येत होती, डोक्यावरच्या भाऱ्यामुळे चेहरा झाकलेला होता. दिसणारं काम, न दिसणारी बाई. ओरिसातल्या मलकानगिरीतल्या या भूमीहीन स्त्रीसाठी हे श्रम रोजचेच आहेत. पाणी, जळण आणि चारा. बाईच्या आयुष्याची एक तृतीयांश वर्षं हे गोळा करण्यात जातात. देशात काही भागात बायांना दिवसाचे तब्बल ७ तास केवळ घरच्यासाठी पाणी आणि सरपण गोळा करण्यासाठी घालवावे लागतात. चारा गोळा करणंही वेळखाऊ काम आहे. या तिन्ही गोष्टी गोळा करण्यासाठी ग्रामीण भारतातल्या बायांना दर दिवशी किती तरी मैलाची पायपीट करावी लागते.
डोक्यावरच्या भाऱ्याचं वजन खूप जास्त आहे. मलकानगिरीच्या डोंगराची चढण चढून जाणाऱ्या या आदिवासी बाईच्या डोक्यावर सुमारे ३० किलोचं सरपण आहे. तिला अजून तीन किलोमीटर अंतर काटायचंय. किती तरी बायांना पाणी आणण्यासाठी असेच किंवा याहूनही जास्त कष्ट सोसावे लागतात.






