हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
चिखल, आया आणि पुरुषभर काम
विजयानगररममधली भूमीहीन श्रमिकांबरोबरची बैठक सकाळी ७ च्या आधी ठेवली होती. दिवसभर त्यांच्या कामाचा माग घ्यायचा असं नियोजन होतं. पण आम्हाला उशीर झाला. आम्ही पोचलो तोपर्यंत बायांचे कामाचे ३ तास भरलेदेखील होते. ताडाच्या झाडांमधून येणाऱ्या या बायांसारखे. किंवा कामाच्या ठिकाणी पोचलेल्या, तलावातून गाळ काढणाऱ्या त्यांच्या इतर मैत्रिणींसारखे.
बहुतेक जणी घरी स्वयंपाक, धुणी-भांडी आणि घरची इतरही काही कामं उरकून आल्या होत्या. मुलांची शाळेची तयारीही त्यांनी केली होतीच. घरच्या सगळ्यांचं नाष्टा पाणी केलं होतं. त्यांचं स्वतःचं अर्थात सगळ्यांच्या शेवटी. सरकारी रोजगार हमीच्या कामांवर पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी मजुरी दिली जात होती हे स्पष्ट दिसत होतं.
इथे तर किमान वेतन कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन होत होतं – स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठी. पश्चिम बंगाल आणि केरळसारखी राज्यं वगळता संपूर्ण देशात हेच वास्तव आहे. पण सगळीकडेच पुरुष कामगारांच्या तुलनेत स्त्रियांना निम्मी किंवा दोन तृतीयांश मजुरी मिळत असल्याचं दिसतं.







