हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
घराकडे अपुल्या...
खरं तर तिचं स्वयंपाक पाणी सगळं आधीच उरकलंय. ताडगूळ तयार करून विकणं हे तिच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन. मोठ्या कल्हईत ती ढवळतीये तो ताडगूळाचा पाक आहे. काही जरी चूक झाली, तर तिच्या कुटुंबाला पुढच्या आठवडाभराच्या कमाईवर पाणी सोडावं लागू शकतं.
हे काम पूर्ण व्हायला तिला वेळ लागणारसं दिसतंय. स्वयंपाकातही तिचा बराच वेळ गेलाय. कोणत्या ना कोणत्या कामानिमित्ताने दिवसातले बरेच तास तिला धुरात काम करायला लागतं. वाफा आणि धूर नाकातोंडात जात असतात. बाई म्हणून तिच्या वाटणीच्या सगळ्या कामांमध्ये या कामांची भर पडते. अगदी लहानपणापासून तिला ही भूमिका निभवावी लागत असल्यामुळे तिच्यासारख्या लाखो जणींचा शाळा लहान वयातच, अर्ध्यावरच सुटते.









