हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
आयुष्य वेचताना
तिचा दिवस पहाटे ४.३० वाजता सुरू झालाय. तासाभरातच ती छत्तीसगडच्या सरगुजाच्या जंगलात तेंदूपत्ता गोळा करू लागलीये. आता छत्तीसगडच्या वेगवेगळ्या भागात हजारो आदिवासी बाया अगदी हेच काम करत असतील. अख्खी कुटुंबंच तेंदूपत्ता गोळा करण्याचं काम करतात. पानांचा वापर बिड्या वळण्यासाठी होतो.
सहा जणांचं तिचं कुटुंब एका दिवसात ९० रुपये (१.८५ डॉलर) कमवू शकतं. हा चांगला दिवस म्हणायचा. तेंदूच्या ऐन मोसमात दोन आठवड्यात जेवढी कमाई होते, ती पुढच्या तीन महिन्यांहून जास्त असू शकते. त्यामुळे हंगाम चालू असताना त्यांना जितकं शक्य आहे तितकं काम करणं भाग असतं. दीड महिन्यानंतर जीविकेसाठी त्यांना दुसरा काही तरी मार्ग शोधायला लागेल. या पट्ट्यातलं जवळ जवळ प्रत्येक कुटुंब आता जंगलात आहे. आदिवासींच्या अर्थव्यवस्थेत तेंदूला फार मोलाचं स्थान आहे.






