गोळीबार, जो झालाच नाही. पण विविध मथळ्यांखालची ही बातमी – पोलिसांकडून शेतकऱ्याची गोळी घालून हत्या – समाजमाध्यमांवर प्रचंड गाजत होती. तीही बहादुर शाह जफर मार्गावर संबंधित शेतकरी “मारला गेला” त्याच्या काही क्षणात. गोळीबारात असा कोणता मृत्यू झालाच नाही. पण तो झाला ही अफवा पसरली आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या प्रसिद्ध आयटीओ जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलनातल्या फुटीर गटांमध्ये गोंधळ, हल्लकल्लोळ उडाला. आणि याच अफवेने कदाचित लाल किल्ला आणि इतर ठिकाणी झालेल्या हिंसेला खतपाणी मिळालं.
अशी बातमी पसरली की ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याला पोलिसांनी अगदी नजरेच्या टप्प्यात असताना गोळी घालून ठार मारलं. आणि अर्थातच समाजमाध्यमांना ही बातमी पसरवण्याआधी त्याची सत्यता तपासण्याची कसलीही गरज भासली नाही. आणि लवकरच, काही वृत्तवाहिन्यांनी देखील ही बातमी द्यायला सुरुवात केली. प्रत्यक्षात घटनास्थळी लोक या ‘गोलीकांडा’चा आणि तथाकथित पोलिसी अत्याचाराचा निषेध करत होते. आणि आयटीओपाशी पोचलेले आंदोलक मात्र इथेतिथे विखुरले होते.
खरं तर मारला गेलेला, नवनीत सिंग, वय ४५ ट्रॅक्टर पलटी होऊन त्यात मारला गेला – कुणीही एकही गोळी झाडली नव्हती. पण हे स्पष्टीकरण येईपर्यंत ही बातमी आणि लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराने प्रत्यक्षात आंदोलक शेतकऱ्यांचा जो भव्य ट्रॅक्टर मोर्चा निघाला तो मात्र झाकोळून गेला. सप्टेंबर २०२० मध्ये संसदेत रेटून पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने आंदोलन करत आहेत.
फार वेगळ्या रितीने सुरू झालेल्या दिवसाची हे दुर्दैवच.
भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन सुरू झाला तोच ऊबदार सूर्यकिरणांनी, निराशा आणि थंडीच्या कडाक्यानंतर, सुखद. देशाच्या राजधानीच्या वेशीवर गेले दोन महिने आंदोलन करणारे शेतकरी ठरवलेल्या मार्गावर शांततापूर्ण ट्रॅक्टर मोर्चा काढून इतिहास घडवणार होते. दुपारच्या सुमारास राजपथावरची शासकीय परेड संपल्यानंतर सिंघु, टिक्री आणि गाझीपूर या सीमांवरून तीन परेड सुरू होणार होत्या.
या तिन्ही परेड म्हणजे देशाच्या नागरिकांनी साजरा केलेला प्रजासत्ताक दिनाचा सर्वात मोठा, भव्य सोहळा असणार होत्या – आणि तशा त्या झाल्याही. पण संध्याकाळ होईपर्यंत लोकांचं लक्ष आणि उत्सुकता विपरित दिशेलाच गेली होती.








