४ मे रोजी हरिंदर सिंग यांनी त्यांच्या साथीदाराला, पप्पूला शेवटचे दोन मृतदेह दहन करण्यासाठी तयार करायला सांगितलं. त्यांचे साथीदार एकदम चकित का व्हावेत, त्यांना कळालं नाही. त्यांनी वापरलेले शब्दच चकित करणारे होते.
“दो लौंडे लेटे हुए हैं,” ते म्हणाले होते. सुरुवातीला वाटलेलं आश्चर्य सरल्यावर त्यांच्या साथीदारांना कळालं की हरिंदर अगदी सहज बोलून गेले होते पण थोडं हसू आलंच. निगम बोध या दिल्लीच्या सर्वात जास्त गर्दी असलेल्या स्मशानभूमीत काम करणाऱ्या या कामगारांच्या रोजच्या धबडग्यात असे विसाव्याचे क्षण दुर्मिळच.
पण मला त्या शब्दांमागचा अर्थ समजावून सांगायला पाहिजे असं हरिंदर यांना वाटलं असावं. स्मशानभूमीच्या दाहिन्यांशेजारी एका छोट्याशा खोलीत आपल्या सहकाऱ्यांबरोबर रात्रीचं जेवण करत असलेल्या हरिंदर यांनी एक खोल श्वास घेतला आणि ते म्हणाले, “तुम्ही त्यांना मृतदेह म्हणता. आम्ही म्हणतो पोरं.” कोविडच्या नरकासम असलेल्या या महासाथीत त्यांचा हरिंदर यांचा श्वास थांबलेला नाही हे नशीब म्हणण्याची गत आहे.
“इथे येणारी प्रत्येक व्यक्ती कुणाचा तरी मुलगा, मुलगी असतेच, माझ्या लेकरांसारखी,” पप्पू म्हणतो. “त्यांना दाहिन्यांमध्ये लोटताना वेदना होतात. पण त्यांच्या आत्म्याखातर आम्हाला हे करावं लागतं, हो ना?” निगम बोधमध्ये जवळपास एक महिनाभर दररोज २०० मृतदेह सीएनजी किंवा सरणावर दहनासाठी येत होते.
त्या दिवशी, ४ मे रोजी निगम बोध घाटावरच्या सीएनजी दाहिन्यांमध्ये ३५ देह लोटले गेले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा विळखा दिल्लीला बसला तेव्हा रोजची सरासरी ४५-५० इतकी होती. महामारीच्या अगोदर मात्र या स्मशामभूमीत महिन्याला १०० मृतदेहांचं दहन केलं जात होतं.
दिल्लीच्या कश्मीर गेटपाशी यमुना नदीच्या तीरावर असलेल्या या घाटाच्या प्रवेशद्वारापाशी भिंतीवर एक भव्य शिल्प आहे. त्यावर लिहिलंयः “मला इथे आणल्याबद्दल आभारी आहे. इथून पुढचा प्रवास मला एकट्यानेच करायचा आहे.” या वर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात जेव्हा देशाच्या राजधानीला कोविड-१९ चा विळखा पडला तेव्हा गेलेले हे जीव मात्र एकटे नव्हते – पैलतीरावर जाताना त्यांच्यासोबत चार पावलं चालणारे दोस्त त्यांना मिळाले होते.














