“आपल्याला तरंगत्या मळ्यांमध्ये काम करायचंय असं ऐकल्यावर दलच्या बाहेरचे कामगार पाण्यात बुडण्याच्या भीतीने घाबरतात!” मोहम्मद मकबूल मट्टू हसत हसत सांगतात.
श्रीनगरमधल्या दल सरोवराच्या परिसरातल्या मोती मोहल्ला खुर्दमध्ये राहणारे ४७ वर्षीय मट्टू शेतकरी आहेत. मजुरांना २०० रुपये जादा म्हणजेच ७०० रुपये रोज द्यावा लागतोय. श्रीनगर किंवा आसपासच्या परिसरात शेतमजुरी ५०० रुपये रोज अशी आहे. मजुरीवरचा खर्च कमी व्हावा म्हणून, “मी आणि माझी पत्नी तस्लीमा रोज इथे [कामासाठी] येतो, बाकी कितीही गडबड असली तरी,” ते सांगतात.
दल सरोवरातल्या आपल्या ७.५ एकराच्या मळ्यात जाण्यासाठी शिकाऱ्याचा वापर करतात. या तरंगत्या मळ्यांना इथे दल के गार्डन म्हणतात. इथे ते वर्षभर नवलकोल, हाख सारख्या वेगवेगळ्या भाज्या पिकवतात. हिवाळ्यात - ११ अंश तापमानात सुद्धा ते इथे येतात. शिकारा पाण्यातून नेताना बर्फाचा थर फोडून जावं लागतं. “आजकाल या धंद्यात फारसा पैसा राहिलेला नाही. मी हे काम करतोय कारण मला तेवढंच काम करता येतं,” ते म्हणतात.
१८ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं दल सरोवर इथल्या हाउसबोट, शिकारे आणि पुरातन चिनार वृक्ष असलेल्या चार चिनार बेटांसाठी प्रसिद्ध आहे. सरोवराच्या काठाने मुघल कालीन बागा आहेत. श्रीनगरमधलं हे सगळ्यात महत्त्वाचं पर्यटनस्थळ आहे.
या सरोवरात अनेक तरंगती घरं आणि तरंगते मळे आहेत. २१ चौरस किलोमीटर नैसर्गिक पाणथळ जागेत हे सरोवर आहे. तरंगते मळे दोन प्रकारचे आहेतः राध आणि देंब. राध प्रकारचा तरंगता मळा शेतकरी दोन प्रकारचं गवत विणून तयार करतातः पेच (Typha angustata) आणि नरगासा (Phragmites australis). विणून पूर्ण झाल्यावर मळ्याची ही चटईसारखी ‘जमीन’ चार गुंठे ते १२ गुंठे इतकी मोठी असू शकते. सरोवरातच ती ३-४ वर्षांपर्यंत सुकवली जाते आणि त्यानंतर तिचा शेतीसाठी वापर केला जातो. एकदा का ही पूर्ण वाळली की त्यावर मातीचे थर दिले जातात आणि मग यात भाजीचे वाफे तयार केले जातात. शेतकरी ही राध सरोवराच्या वेगवेगळ्या भागात हलवतात.
डेंब ही सरोवराच्या काठाला असलेली दलदलीची जागा आहे. तीसुद्धा तरंगती असते पण ती मुद्दामहून हलवता येत नाही.















