पहिल्या मजल्यावरच्या खोलीला कुलुप आहे आणि सगळं सामसूम. खरं तर अजून वेळ संपायचीये. शेजारच्या लाकडी आणि पत्र्याच्या खोलीत देखील कुणीच नाहीये. खुर्च्या, टेबलं, लोखंडी बाकड्यांचा ढिगारा, लोह आणि फोलिक ॲसिडच्या गोळ्यांची खोकी आणि फेकून दिलेली वेष्टणं पडलीयेत. एक जुना, गंजून गेलेला फलकसुद्धा दिसतोय, बंद खोलीच्या इमारतीत आत शिरताना एक नवा फलक आहेः ‘गव्हर्नमेंट न्यू टाइप प्रायमरी हेल्थ सेंटर, शबरी मोहल्ला, दल, श्रीनगर’.
इथून बोटीने १० मिनिटांच्या अंतरावर नज़ीर अहमद भट यांचं ‘क्लिनिक’ आहे, जे बहुतेक वेळा उघडं असतं आणि तिथे लोकांची गजबज असते. हिवाळ्यातली थंडगार दुपार आहे. लाकडी खांबांवरच्या लाकडाच्याच दुकानात ते शेवटचं गिऱ्हाईक-पेशंट तपासतायत (संध्याकाळी आणखी काही रुग्णांना तपासायला ते येतील). दुकानाला आत एक वेगळी खोली आहे, इथे ते रुग्णांना इंजेक्शन देतात. बाहेर बोर्ड दिसतोय, ‘भट मेडिकेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट’.
सुमारे साठीच्या हफीझा दार बाकड्यावर वाट पाहत बसल्या आहेत. त्या नज़ीर डॉक्टरांना घ्यायला बोटीने आल्या आहेत, त्यांचा मोहल्ला इथून बोटीने १० मिनिटांच्या अंतरावर आहे. “माझ्या सासूला काही [मधुमेहासाठी] इंजेक्शन घ्यावी लागतात आणि नज़ीर साब घरी येऊन ती देतात कारण त्या वयामुळे इथे येऊ शकत नाहीत,” त्या सांगतात. बोलता बोलता त्या त्यांना आशीर्वाद देतात. “तिथे [नवीन पीएचसीत] आम्हाला डॉक्टर काही भेटत नाही,” हफीझा सांगतात. त्या शेतकरी आहेत आणि घर सांभाळतात. त्यांचे पती शेती करतात आणि दल सरोवरात शिकारा चालवतात. “तिथे फक्त लहान मुलांना पोलिओचे थेंब मिळतात आणि दुपारी ४ वाजल्यानंतर तर तिथे कुणीही नसतं.”
बेटांवर राहणाऱ्या लोकांना गेल्या दोन वर्षांत या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कधी डॉक्टर आल्याचंच आठवत नाहीये. २०१९ च्या ऑगस्ट महिन्यापासून काश्मीरमध्ये कर्फ्यू आणि टाळेबंदीचं सत्र संपलेलंच नाही. “काही वर्षांपूर्वी इथे एक डॉक्टर होते, ते चांगलं काम करत होते. पण त्यांची बदली झाली. २०१९ पासून तर इथे दुसरा कुणी डॉक्टर आलेला आम्ही पाहिलेला नाही,” ४० वर्षीय मोहम्मद रफीक मल्ला सांगतात. ते जवळच राहतात आणि पर्यटन छायाचित्रकार म्हणून काम करतात. “ते नियमितपणे येतही नाहीत आणि पुरेसा वेळ तिथे थांबतही नाहीत.”
श्रीनगरच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत काम करणाऱ्या नियोजन विभागाच्या सहाय्यक संचालकांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सर्व न्यू टाइप प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (काश्मीरमधली श्रेणीसुधार केलेली उपकेंद्रं) वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारा किमान एक एमबीबीएस डॉक्टर, एक फार्मासिस्ट, एक बहुद्देशीय महिला आरोग्य कर्मचारी आणि एक नर्सिंग ऑर्डर्ली असं मनुष्यबळ असणं अपेक्षित आहे.










