मध्यरात्रीचे २ वाजले होते. नुसता किर्र काळोख. तमिळ नाडूच्या रामनादपुरम (स्थानिकांच्या भाषेत रामनाड) जिल्ह्यालगतच्या समुद्रावर ‘मेकनाइज्ड बोट’ असं बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या एका बोटीवर.
ही मेकनाइज्ड बोट म्हणजे एका मोडकळीला आलेल्या, पुरातन म्हणता येईल अशा बोटीला लेलँड बसचं इंजिन बसवलेलं. (१९६४ साली या इंजिनवर बंदी आणली गेली, पण त्यात काही फेरबदल करून मासेमारीच्या कामासाठी त्याचा पुनर्वापर होऊ लागला. आणि १९९३ साली मी जेव्हा या सफरीवर निघालो होतो तेव्हाही ही इंजिनं वापरात होती.) माझ्यासोबतचे सगळेच स्थानिक मच्छीमार होते. त्यांना आपण नक्की कुठे आहोत हे पक्कं माहित असलं तरी मी मात्र पूर्णपणे गोंधळून गेलो होतो. बंगालच्या उपसागरात कुठे तरी इतकंच फार तर मी म्हणू शकेन.
आम्ही मागच्या १६ तासांपासून दर्यावर होतो. काही ठिकाणी समुद्र खवळलेला होता. पण आमच्या बोटीवरच्या पाच जणांच्या चेहऱ्यावरचं हास्य कशानेही विरत नव्हतं. त्या सगळ्याचं आडनाव फर्नांडो – या भागातल्या मच्छीमार समुदायामधे या आडनावाची पुष्कळ मंडळी तुम्हाला भेटतील.
या ‘मेकनाइज्ड बोटी’वर दिव्याची कसलीही सोय नव्हती. रॉकेलमध्ये कापडाचा एक बोळा बुडवून पेटवून काठीच्या टोकाला बांधला होता. फर्नांडो टोळीतल्या एकाने तो हातात धरून ठेवला होता. माझी अडचण वेगळीच होती. इतक्या मिट्ट काळोखात मी यांचे फोटो कसे घेणार?
पण माझी अडचण माशांनीच सोडवली.
जाळीत घावलेले मासे बोटीत ओतले की ते चमचम चमकायचे. फॉस्फरेसन्सची म्हणजेच अंधारात प्रकाश निर्माण करण्याच्या त्यांच्या गुणांची (आणि इतरही काही असलं तर माहित नाही) ही किमया. त्यामुळे मासे ओतलेला बोटीचा कोपरा उजळून निघायचा. त्यांच्यावर कॅमेऱ्याचा फ्लॅश पडला की प्रकाशाची चिंताच नाही. एक दोन फोटो तर मी फ्लॅश न वापरताही काढू शकलो. (तसंही फ्लॅशचं मला वावडंच आहे म्हणा).
एक तासाभराने मी आजवर कधीही खाल्ले नसतील इतक्या ताज्या फडफडीत माशांची मेजवानी मला मिळाली. पत्र्याचा जुना, भोकं पडलेला डबा पालथा घालून त्यावर ते मासे भाजले होते. काही तरी युक्ती करून त्यांनी डब्याखाली आग पेटवली होती. आम्ही दोन दिवस समुद्रावर होतो. १९९३ मध्ये मी रामनाडच्या दर्यावर अशा तीन सफरी केल्या. आणि या प्रत्येक सफरीत माझ्या लक्षात आलं की हे मच्छीमार आपल्या अत्यंत साध्या उपकरणांनी, अतिशय खडतर परिस्थितीतही विलक्षण कार्यक्षमतेने आणि मुख्य म्हणजे आनंदाने काम करतात.



