२००५ च्या जानेवारीमध्ये भोली देवी विष्णोई यांच्यावर दरीबामध्ये डायन असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याला आता पंधरा वर्षं होऊन गेलीत. त्या दिवशी, राजस्थानातल्या या गावातल्या तीन महिलांनी भोली यांच्यावर आपल्या मुलांवर करणी करून त्यांना आजारी पाडल्याचा आरोप केला होता. त्यांनी अख्ख्या गावासमोर त्यांना चेटकीण म्हटलं, त्या इतरांच्या शरीरात शिरून आजार आणतात, असा त्यांचा आरोप होता.

या घटनेच्या चार महिन्यांनंतर भोली आणि त्यांच्या कुटुंबाला आपलं घर सोडून जाणं भाग पडलं. सुवाना तुक्यातील दरीबा या ५०० घरांची वस्ती असलेल्या आपल्या गावाहून ते १४ किलोमीटर दूर भिलवाडा शहरात निघून गेले.

शेती व घरकाम करणाऱ्या आणि आता अंदाजे पन्नाशीच्या असलेल्या भोली म्हणतात की त्यांचा करणी वगैरेंवर विश्वास नाही. पण प्रथेनुसार जोवर त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिला त्यांचा प्रसाद स्वीकार करून त्यांना "पापमुक्त" करत नाहीत, तोवर त्यांच्यावरचा 'डायन' (किंवा 'डाकन') हा ठपका पुसला जाणार नाही, त्या सांगतात.

बराच काळ भोली यांनी आपल्या नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना खूश करण्यासाठी सारं काही केलं – पुष्कर, हरिद्वार आणि केदारनाथची यात्रा, गंगेत स्नान, उपास-तापास इत्यादी. हे केलं तर त्यांच्यावरचा चेटकिणी असल्याचा ठपका पुसला जाईल, असं त्यांना सांगण्यात आलं होतं.

"यात्रा, उपास-तापास करून झाल्यावर आमच्यातल्या रीतीप्रमाणं काही जोडप्यांना दावत देत असतात. पण एकही जण माझ्या दारी फिरकला नाही," भोली म्हणतात. बहिष्कार संपावा म्हणून गावातल्या सणांदरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या घरी आणि गावात दावत ठेवली होती. भोली यांच्या अंदाजानुसार त्यांनी गेल्या काही वर्षांत अशा दावतींवर १० लाखांचा खर्च केले असेल.

भोली यांना सहन करावा लागलेला बहिष्कार भिलवाडा जिल्ह्यात नवीन नाही, तारा अहलुवालिया म्हणतात. २००५ मधील घटनेनंतर त्यांनी भोली आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं एका न्यायालयीन याचिकेद्वारे प्रथम सूचना अहवाल (एफआयआर) दाखल केला होता. अहलुवलिया भिलवाडा स्थित सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

Left: Bholi and her family were forced to leave their home in Dariba village four months after the incident. Right: She moved with her husband Pyarchand (right) and family (including daughter-in-law Hemlata, on the left) to Bhilwara city
PHOTO • People's Archive of Rural India
Left: Bholi and her family were forced to leave their home in Dariba village four months after the incident. Right: She moved with her husband Pyarchand (right) and family (including daughter-in-law Hemlata, on the left) to Bhilwara city
PHOTO • Tara Ahluwalia

डावीकडे : भोली आणि त्यांच्या कुटुंबाला या घटनेच्या चार महिन्यांनंतर आपलं घर सोडून जाणं भाग पडलं. उजवीकडे: आपले पती प्यारचंद (उजव्या बाजूला) आणि कुटुंबासोबत (डाव्या बाजूला सून हेमलता) त्या भिलवाडा शहरात निघून गेल्या. (२०१७ मध्ये काढलेलं छायाचित्र)

२८ जानेवारी, २००५ रोजी दाखल केलेल्या एफआयआरनुसार एका कुटुंबातील सात सदस्यांनी भोली यांच्या कुटुंबाची दरीबामधील तीन बिघा (१.२ एकर) जमीन बळकावण्याच्या कुटिल हेतूने त्यांना चेटकीण ठरवलं. भोली यांच्या कुटुंबाप्रमाणे त्यांना छळणारं कुटुंबही विष्णोई (किंवा बिष्णोई) समाजाचं आहे. राजस्थानात ls इतर मागासवर्गीयामध्ये (ओबीसी) समाविष्ट आहेत. भोली यांचे पती प्यारचंद विष्णोई सांगतात की बरीच वर्षं खंडाने शेती करण्यासाठी दिलेल्या जमिनीतून आपल्या शेताकडे वाट काढण्यासाठी हे कुटुंब परवानगी मागत होतं. त्यांनी नकार देऊन त्यांना वेगळी वाट काढायला सांगितली तेव्हापासून त्यांच्यातील वादाला तोंड फुटलं ज्याची परिणती म्हणजे भोली देवींची डायन म्हणून अवहेलना.

भिलवाडा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक हरेंद्र कुमार महावार यांच्या निरीक्षणानुसार, जादूटोण्याचे खटले बरेचदा दिसतात तसे नसतात. "त्यातील पुष्कळ खटले खोटे असतात आणि त्यांचं मूळ जमिनीच्या वादात सापडतं. या भागातील सामाजिक प्रथांमुळे हे होतं," ते म्हणतात.

बरेचदा गावातली बडी प्रस्थं एखाद्या महिलेला छळण्यासाठी तिला जादूटोण्याच्या प्रकरणात गोवतात, खासकरून विधवा किंवा ज्यांना न्यायिक लढा देणं आर्थिकदृष्ट्या जमणार नाही अशा एकट्या महिलांची जमीन बळकावण्यासाठी बरेचदा हा कट रचण्यात येतो, अहलुवालिया सांगतात. त्या बाल एवं महिला चेतना समितीच्या संस्थापिका आहेत आणि भिलवाडा जिल्ह्यातील १९८० च्या अखेरपासून चालत आलेल्या चेटकीण प्रथेविरुद्ध अभियान राबवत आहेत.

घराघरातील वितुष्ट आणि वैर यांतूनही महिलांविरुद्ध अशा प्रकारचे आरोप होत असतात. अशा घटनांना पूर्वी सामाजिक समस्या मानलं जात असल्याने हे प्रकरण ग्राम पंचायतीकडे जायचं. "या प्रथेला बढावा देण्यात आणि महिलांना चेटकीण म्हणून घोषित करण्यात ग्राम पंचायतीनं देखील भूमिका बजावलीय," अहलुवालिया म्हणतात.

एप्रिल २०१५ मध्ये कार्यकर्त्यांच्या २५ वर्ष प्रदीर्घ लढ्यानंतर राजस्थान शासनाने राजस्थान डायन-प्रताड़ना निवारण कायदा पारित केला. या कायद्यानुसार चेटकीण म्हणून छळ तसंच जादूटोणा हे कायद्याने गुन्हा घोषित करण्यात आले – छळ केल्याबद्दल १ ते ५ वर्षं कारावास अथवा रू. ५०,००० किंवा अधिक भुर्दंड किंवा दोन्हींचीही तरतूद आहे.

PHOTO • Madhav Sharma

२०१५ मध्ये हा कायदा पारित झाल्यापासून राजस्थानभर चेटकीण म्हणून छळ केल्याचे २६१ खटले दाखल करण्यात आले. मात्र, पोलिसांनी केवळ १०९ खटल्यांमध्येच आरोपपत्र दाखल केलंय – आणि आजवर एकालाही शिक्षा झाली नाही

राजस्थान पोलिसांनी गोळा केलेल्या आकडेवारीनुसार कायदा लागू झाल्यानंतर भिलवाडा जिल्ह्यातच ७५ घटना नोंदवण्यात आल्या. (महावार यांच्या निरीक्षणात पोलिसांकडे दर महिन्याला अशा १०-१५ तक्रारी येत असतात, मात्र प्रत्येकच तक्रार नोंदवली जातेच, असं नाही.) २०१५ मध्ये हा कायदा पारित झाल्यापासून राजस्थानभर चेटकीण म्हणून छळ केल्याचे २६१ खटले दाखल करण्यात आले – २०१५ मध्ये १२, २०१६ मध्ये ६१, २०१७ मध्ये ११६, २०१८ मध्ये २७ आणि नोव्हेंबर २०१९ पर्यंत २७ खटले. मात्र, पोलिसांनी केवळ १०९ खटल्यांमध्येच आरोपपत्र दाखल केलं आहे.

"कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येत नाहीये. म्हणूनच आजवर अवघ्या राजस्थानात एकाही व्यक्तीला चेटकीण म्हणून छळ केल्याच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही," अहलुवालिया सांगतात. त्यांच्या मते ग्रामीण भागातील पोलिसांना बरेचदा कायद्याची माहिती नसते, आणि चेटकीण म्हणून छळ करण्याच्या खटल्याचं वर्गीकरण ते साधं भांडण म्हणून करतात.

भिलवाडा स्थित कार्यकर्ते राकेश शर्मा, जे दलित आदिवासी एवं घुमंतु अधिकार अभियान, राजस्थानशी संबंधित आहेत, अशा घटनांचा पोलीस नीट तपास करत नाहीत, इतकंच काय तर भारतीय दंड विधानाच्या योग्य कलमांअंतर्गत खटला दाखल करत नाहीत, हे मान्य करतात. काही पोलीस आरोपींकडून लाच घेऊन खटला दाबून टाकतात, असा आरोप शर्मा करतात. "या प्रथेला दोन पैलू आहेत – सामाजिक आणि न्यायिक. सामाजिक कुप्रथा जर महिलांना चेटकीण ठरवत असतील, तर गुन्हेगारांना शिक्षा करणं हे कायद्याचं कर्तव्य आहे. पण, दुर्दैवानं असं होत नाही. पोलीस आपली कामगिरी चोख बजावत नाहीयेत, म्हणून एकाही पीडितेचं पुनर्वसन झालं नाही, ना कोण्या आरोपीचा गुन्हा सिद्ध झालाय."

भोली यांचा खटला नोंदवल्यापासून कनिष्ठ न्यायालयातच अडकून पडलाय. "आम्ही ४ ते ५ वेळा [भिलवाडा जिल्हा न्यायालय] कोर्टात चकरा मारल्या. सुरुवातीला आम्हाला एक सरकारी वकील मिळाला, पण नंतर नंतर आरोपी एकाही सुनावणीला हजर राहत नसल्याने त्या बंद पडल्या," प्यारचंद म्हणतात. भोली यांच्या खटल्याची शेवटची न्यायालयीन सुनावणी एप्रिल २०१९ मध्ये झाली होती.

PHOTO • Madhav Sharma

सध्या ६८ वर्षांचे असलेले प्यारचंद यांनी २००६ मध्ये दरीबाहून १८ किलोमीटर दूर कुमरिया खेडा गावातील सरकारी प्राथमिक शाळेतून शिक्षक म्हणून स्वेच्छा निवृत्ती घेतली. चेटकीण ठरवून आपल्या पत्नी लागलेला कलंक आणि तिरस्कारातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी हे केलं. त्यांना तेव्हा दरमहा रू. ३५,००० एवढा पगार मिळत होता. त्यांनी आणि भोली यांनी गावात लोकांच्या मनधरणीसाठी ज्या काही दावती ठेवल्या त्यासाठी लागणारा पैसा त्यांच्या बचतीतून तसंच तिघा मुलांच्या कमाईतून आला.

गाव सोडून हे कुटुंब भिलवाडा शहरात निघून आलं, तरी त्यांच्या समस्यांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. २४ ऑगस्ट, २०१६ रोजी एका शेजारणीने भोली यांनी काळी जादू केल्याने तिला गुडघेदुखी सुरू झाल्याचा आरोप करून त्यांना मारहाण केली. तिने त्या दिवशी भोली यांच्याबद्दल एका स्थानिक वृत्तपत्रात बातमी वाचली होती आणि दरीबामध्ये त्यांची चेटकीण म्हणून बदनामी झाली होती, हे तिला कळलं होतं.

"माझ्या गावातल्या लोकांनी तसंच माझ्या शहरातल्या शेजाऱ्यांनी माझ्यावर हे लांच्छन लावलंय. अन् त्यामुळं माझ्या सुनेलाही लोक डायन म्हणू लागले. तिला १२ वर्षं वाळीत टाकलं होतं अन् माझ्याशी ती काडीचाही संबंध ठेवणार नाही, या बानीवर तिचा समाजात पुन्हा स्वीकार केला," भोली म्हणतात. त्यांचा मुलगा ओमप्रकाश, अर्थात हेमलता यांचा नवरा, आणि त्यांच्या चार मुलांनाही त्यांना भेटण्यास मनाई आहे.

३५ वर्षीय हेमलताला चेटकीणीचा कलंक लागला आणि तिला भिलवाड्यातील आपलं माहेरही परकं झालं. "तिथं गेले तर मला अस्पृश्यासारखी वागणूक मिळायची. माझ्या सासूची खबर इथल्या पेपरमध्ये छापून आली त्याचा फटका माझ्या घरच्यांनाही बसला. वस्तीतल्या लोकांनी माझ्याशी संबंध तोडून टाकले," ती  सांगते. ओमप्रकाश, वय ४०, भिलवाड्यातील एका ट्रॅक्टर उत्पादकाच्या शोरुममध्ये महिन्याला रू. २०,००० पगारावर काम करतात. त्यांनी पत्नी आणि आपल्या आईला साथ दिली, ती सांगते. हेमलता स्वतः शहरातील एका खासगी शाळेत शिकवून रू. १५,००० कमावते.

२०१६ मध्ये भोली आणि प्यारचंद यांच्यावर जवाहर नगर, भिलवाडा दरमहा रू. ३,००० ला एक घर भाड्याने घेऊन राहण्याची वेळ आली. खरं तर याच कॉलनीत त्यांचं स्वतःचं वडिलोपार्जित घर आहे. ओमप्रकाश, हेमलता आणि त्यांची मुलं त्यांच्या मूळ घरी राहतात. भोली आणि प्यारचंद आपल्या पेंशनमधून खर्च भागवतात, शिवाय प्यारचंद भिलवाड्याजवळील त्यांची १.६ एकर जमीन करतात, तिथे ते  मोहरी आणि हरभऱ्याचं पीक घेतात.

"आमचा एकही नातेवाईक आम्हाला घरी भेटायला येत नाही, माहेरचंही कोणी नाही," भोली म्हणतात. या कलंकापायी त्यांच्या इतर दोन मुलांच्या बायकाही त्यांना दुरावल्या आहेत. सुंदरलाल, २८, आता जोधपूर मध्ये राहतो, जिथे तो एका कॉलेजमध्ये शिकवतो, आणि पप्पू, ३०, आपल्या वडिलांसोबत शेतीवर काम करतो आणि भिलवाड्यात ओमप्रकाश यांच्यासोबत राहतो.

'People from my village as well as neighbours in the city have marked me with this stigma', says Bholi
PHOTO • Madhav Sharma

'माझ्या गावातल्या लोकांनी तसंच माझ्या शहरातल्या शेजाऱ्यांनी माझ्यावर हे लांच्छन लावलंय,' भोली म्हणतात.

भोली यांचं कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं असलं तरी चेटकीण म्हणून छळण्यात येणाऱ्या बऱ्याच पीडितांना एकाकी आयुष्य जगावं लागतं, घरच्यांच्या पाठिंब्याविना. "मागील दोन वर्षांत भिलवाड्यातील चेटकीण म्हणून घोषित झालेल्या सात महिला मरण पावल्या आहेत," अहलुवालिया म्हणतात. त्यांच्या मते हे नैसर्गिक मृत्यू असले, तरी मानसिक चिंता, एकटेपणा आणि दारिद्र्य हेही याला कारणीभूत आहेत.

ग्रामीण भागांमध्ये समाजाने वाळीत टाकण्याइतकं मोठं दुःख नाही, हेमलता सांगते. जादूटोणा आणि कऱणीचं कारण पुढे करत लोक कहाण्या रचतात, ज्यातून लोकांना भीती निर्माण करता येते, डॉ. राजीव गुप्ता, राजस्थान विद्यापीठ, जयपूर येथील समाजशास्त्राचे प्राध्यापक सांगतात. "या प्रथेत भय आणि असुरक्षिततेचे बरेच पैलू आहेत. म्हणून समाजही पीडितेशी बोलायला कचरतो. हीच भीती आणि असुरक्षितता पुढील पिढीकडे जाते," ते म्हणतात.

पण राजस्थानचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री मास्टर भंवरलाल मेघवाल यांना या प्रकाराची कल्पनाही नाही – अशा राज्यात जिथे ही प्रथा बऱ्याच काळापासून प्रचलित आहे आणि २०१५ पासून कायद्याने गुन्हा आहे. "महिलांशी असं वागणं योग्य नाही," ते म्हणतात. "पण मला यातलं काहीच माहीत नाही. मी [संबंधित] विभागाशी बोलेन."

भोली यांना न्याय मिळण्यासाठी अजूनही बरीच वाट पहावी लागेलसं दिसतंय. आसवं भरल्या डोळ्यांनी त्या विचारतात, "फक्त बायांनाच डायन म्हणून का बदनाम करतात? पुरुषांना का नाही?"

मूळ हिंदीतून इंग्रजी अनुवाद: शफीक आलम

मराठी अनुवाद : कौशल काळू

Madhav Sharma

ਮਾਧਵ ਸ਼ਰਮਾ, ਜੈਪੁਰ ਤੋਂ ਹਨ ਤੇ ਇੱਕ ਸੁਤੰਤਰ ਪੱਤਰਕਾਰ ਹਨ। ਉਹ ਸਮਾਜਿਕ, ਵਾਤਾਵਰਣ ਸਬੰਧੀ ਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਮਸਲਿਆਂ ਬਾਰੇ ਲਿਖਦੇ ਹਨ।

Other stories by Madhav Sharma
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo