“मला तुरुंगात टाकलं कारण मी माझ्या जमिनीसाठी भांडले, मी गुन्हा केला म्हणून नाही काही. मला तेव्हाही कधी तुरुंगाची भीती वाटली नाही आणि आताही वाटत नाही,” राजकुमारी भुइया सांगतात.
साधारणपणे ५५ वर्षं वय असणाऱ्या राजकुमारी भुइया आदिवासी आहेत. त्या उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातल्या धुमा गावी राहतात. कन्हार सिंचन प्रकल्पाच्या विरोधात निदर्शनं केल्यामुळे २०१५ साली त्यांना चार महिने तुरुंगवास झाला होता. दुधी तालुक्यातल्या कन्हार नदीवर धरण बांधण्यास स्थानिक लोकांचा आणि आदिवासींचा विरोध आहे कारण विस्थापनाची आणि त्यांचा प्रमुख जलस्रोत प्रदूषित होण्याची त्यांना भीती आहे.
काही बातम्यांनुसार, त्या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या निदर्शनांवेळी पोलिसांनी जमावाच्या दिशेने गोळीबार केला आणि लोकांना अटक करायला सुरुवात केली. राजकुमारी (शीर्षक छायाचित्रात डावीकडून दुसऱ्या) यांना काही दिवसांनी पकडून नेण्यात आलं आणि धुमापासून २०० किमीवरच्या मिर्झापूरच्या जिल्हा कारागृहात डांबण्यात आलं.
राजकुमारी यांच्याप्रमाणेच अखिल भारतीय वन जन श्रमजीवी युनियन या संघटनेच्या सदस्य असलेल्या सुकालो गोंड देखील कन्हारच्या निदर्शनांमध्ये सहभागी होत्या. “माझा जन्म कन्हारचा आहे आणि मला आमच्या समाजाला पाठिंबा द्यायचा होता. पोलिसांनी गोळीबार केला तेव्हा मी तिथे नव्हते [१४ एप्रिल २०१५ रोजी सकाळी १० च्या सुमारास, पुढील अंदाजे दोन तास]. मी नंतर तिथे पोचले, पण आंदोलनाला हिंसक वळण लागलं, त्यामुळे आम्ही सगळेच तिथून निघालो आणि वेगवेगळ्या दिशेने पांगलो. राजकुमारी तिच्या वाटेने आणि मी माझ्या,” त्या सांगतात. (या लेखासाठी मुलाखत घेतल्यानंतर सुकालोंना परत अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं आहे. पहा, https://cjp.org.in/sonebhadras-daughter-sukalo/)
“मी काही आठवडे घराबाहेर होते,” सुकालो सांगतात (शीर्षक छायाचित्रात उजवीकडून दुसऱ्या). “मी पाच तास पायी पायी माझ्या लांबच्या एका नातेवाइकाच्या घरी पोचले, तेही आदिवासी असल्याने त्यांना माझं दुःख समजू शकलं. मी दोन रात्री तिथे काढल्या आणि मग दुसऱ्या एकांच्या घरी गेले, तिथे मी दहा दिवस मुक्काम केला आणि मगच मी घरी परतले.”








