चौथ्या वेळी कमलाला दिवस गेले आणि जेव्हा तिने हे मूल नको असा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यात आधी ती ३० किलोमीटरवरच्या बेनूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काही गेली नाही. तिच्या घरापासून पायी जायच्या अंतरावर असणाऱ्या आठवडी बाजारापर्यंत ती पोचली. “मला तर ती जागा माहित पण नव्हती. माझ्या नवऱ्याने हुडकून काढली ती,” ती सांगते.
तिशी पार केलेली कमला आणि तिचा नवरा रवी (नावं बदलली आहेत) वय ३५, दोघंही गोंड आदिवासी आहेत. त्यांच्या पाड्यावरून जवळच असलेल्या एका स्थानिक ‘डॉक्टर’कडेच ते आधी गेले. “माझ्या एका मैत्रिणीनी मला त्याच्याबद्दल सांगितलं,” कमला सांगते. कमला आपल्या घराशेजारीच भाजीपाला लावते आणि आठवडी बाजारात विकते तर रवी गावातल्या मंडईत मजुरी करतो आणि आपल्या दोघा भावांसोबत तीन एकरांवर गहू आणि मका काढतो. ती सांगते तो दवाखाना महामार्गावरून जाताना सहज दिसतो. दवाखान्याने स्वतःचं नामकरण ‘हॉस्पिटल’ असं केलंय आणि प्रवेशद्वारावर ‘डॉक्टर’ची नावाची पाटी नसली तरी कुंपणावर आणि भिंतीवरच्या फ्लेक्स पोस्टरमध्ये आपल्या नावाआधी त्यांनी ही उपाधी लावलेली दिसते.
‘डॉक्टर’ने तिला तीन दिवसांत मिळून घ्यायच्या पाच गोळ्या दिल्या, कमला सांगते आणि त्याचे तिच्याकडून ५०० रुपये घेतले. दुसऱ्या पेशंटला लगेच हाकही मारली. या गोळ्या, त्याचा काही त्रास होतो का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणते गर्भ कधी आणि कसा पडून जाईल याबद्दल कसलीही माहिती त्याने दिली नाही.
हे औषध घेतल्यानंतर काही तासांतच कमलाला रक्तस्राव सुरू झाला. “मी काही दिवस वाट पाहिली, पण अंगावरून जायचं थांबेना. मग ज्यानी औषधं दिली त्या डॉक्टरकडे आम्ही परत गेलो. त्याने आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ‘सफाई’ करून घ्यायला सांगितलं.” सफाई म्हणजेच शोषणाच्या सहाय्याने गर्भाशय ‘साफ’ करणं.
बेनूर प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर कमला हिवाळ्याचं कोवळं ऊन खात बसलीये. गर्भपाताच्या प्रक्रियेला ३० मिनिटं लागतील. त्यासाठी ती आतून पुकारा होण्याची वाट पाहतीये. तीन-चार तास आधी आणि नंतर तिला विश्रांती घ्यायला सांगितलंय. आदल्या दिवशी गरजेच्या रक्त आणि लघवीच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातलं हे सर्वात मोठं प्राथमिक आरोग्य केंद्र असून २०१९ साली त्यात बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. इथे बाळंतिणीच्या विशेष खोल्या आहेत ज्यावर हसऱ्या आया आणि सुदृढ बालकांची रंगीबेरंगी चित्रं रंगवलेली दिसतायत. १० खाटांचा वॉर्ड, तीन खाटांची प्रसूतीची खोली आणि दिवस भरलेल्या, बाळंत होण्याची वाट पाहणाऱ्या स्त्रियांसाठी निवासी व्यवस्था आणि अगदी परस बागदेखील आहे इथे. बस्तरच्या या आदिवासी बहुल भागात सरकारी आरोग्यसेवांचं हे खूपच आशादायी चित्र म्हणायला पाहिजे.












