“आम्ही छुप्या मार्गाने आलो. करणार काय? आता निदान आमच्याकडे माल तर आहे, आता घरी बसून पाट्या विणून ठेवू,” तेलंगणाच्या कांगल गावातल्या बुरुडांचा एक गट सांगत होता. आणि त्यांचा हा छुपा मार्ग कोणता? असा जिथे पोलिसांच्या आडकाठ्या नाहीत, किंवा गावकऱ्यांना काट्याकुट्यांनी रस्ता बंद केलेला नाही.
४ एप्रिल रोजी नेलीगुंदरशी रामुलम्मा, सोबत चार बाया आणि एक गडी असे सगळे मिळून सकाळी ९ वाजता रिक्षात बसले. कांगलपासून सात किलोमीटरवर असणाऱ्या वेल्लीदंडुपाडु या पाड्यावरून शिंदीच्या झापा आणायला ते निघाले. यापासूनच ते पाट्या-दुरड्या विणतात. ते एरवी माळरानांवरून किंवा टोपल्यांच्या बदल्यात एखाद्या शेतकऱ्याच्या झाडाच्या झापा गोळा करून आणतात.
मार्च ते मे हा कांगलच्या बुरुडांसाठी
टोपल्यांच्या विक्रीच्या दृष्टीने फार कळीचा काळ असतो. हे बुरुड येरुकुला समाजाचे
असून तेलंगणामध्ये त्यांची नोंद अनुसूचित जमातींमध्ये होते. या काळात कडक ऊन
असल्यामुळे या झापा लवकर सुकतात.
एरवी वर्षभर ते शेतात मजुरी करतात, जिथे दिवसाला २०० रुपये मिळतात. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कापूस वेचणीला येतो तेव्हा महहिनाभर अधून मधून दिवसाला ७००-८०० रुपये मजुरी देखील मिळू शकते. अर्थात किती काम उपलब्ध आहे, त्यावर ते अवलंबून असतं.
या वर्षी मात्र कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे पाट्या विकून होणारी त्यांची कमाई पूर्णच थांबली. “ज्यांच्याकडे पैसा आहे ते चार घास खातायत. आम्ही मात्र नाही. त्यामुळेच आम्ही बाहेर पडलो. नाही तर कोणाला हौस आहे?”
रामुलम्मांच्या सहा जणांच्या गटाने एकत्र २-३ दिवस रोज ५-६ तास काम केलं तर ३०-३५ पाट्या विणून होतात. शक्यतो घरातले लोक एकत्र काम करतात – आणि रामुलम्मांच्या अंदाजानुसार कांगलमध्ये अशा १० तरी टोळ्या असतील. नलगोंडा जिल्ह्याच्या कांगल मंडलात येणाऱ्या या गावात सुमारे ७,००० वस्ती आहे आणि यातले २०० जण अनुसूचित जमातीत येतात.
“आम्हाला आधी या झापांचे काटे काढावे लागतात. त्यानंतर भिजवून, सुकवून त्याच्या बारीक धांदोट्या काढाव्या लागतात. त्यानंतर आम्ही पाट्या [आणि इतर वस्तू] विणतो,” रामुलम्मा सांगतात. “हे सगळं केल्यानंतर आता आम्हाला [टाळेबंदीमुळे] माल विकता येत नाहीये.”
हैद्राबादहून एक व्यापारी जर ८-१० दिवसांनी पाट्या घेऊन जायला येतो. हे बुरुड एक नग ५० रुपयाला विकतात – आणि मार्च ते मे या काळाच दिवसाला १००-१५० रुपयांची कमाई करतात. पण नेलीगुंदरशी सुमती सांगतात, “पण माल विकला तर पैसा पहायला मिळतो.”
तेलंगणात २३ मार्चला टाळेबंदी लागू झाली, त्यानंतर हा व्यापारी कांगलला आलेलाच नाही. “आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तो आमच्याकडून [आणि जवळपासच्या गावांमधून] ट्रक भरून माल घेऊन जातो,” ४० वर्षीय नेलीगुंदरशी रामुलु सांगतात, अर्थात हे सगळं टाळेबंदीच्या आधीचं.
लग्नसमारंभ किंवा इतर मोठ्या कार्यक्रमांमध्ये शिजलेला भात मोकळा करण्यासाठी आणि इतर पदार्थांमधलं तेल झिरपण्यासाठी म्हणून या पाट्या वापरल्या जातात. १५ मार्चपासून तेलंगण शासनाने अशा कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.
सध्या व्यापाऱ्यांकडे यंदा २५ मार्च रोजी आलेल्या उगाडीच्या आधी आणलेला माल पडून आहे. त्यामुळे टाळेबंदी उठली किंवा शिथिल झाली तरी व्यापारी कांगलला येतील ते मोठ्या कार्यक्रमांसाठी सभागृहं आणि मंगल कार्यालयं सुरू झाल्यानंतरच.
“त्यांनी [फोनवर] आम्हाला भरवसा दिलाय की ते [टाळेबंदी उठल्यावर] आमच्याकडून सगळा माल विकत घेतील म्हणून,” सुमती सांगतात. हा माल नाशवंत नाही त्यामुळे काहीही वाया जाणार नाही अशी त्यांना आणि इतर बुरुडांनाही आशा आहे. पण कांगलमध्ये प्रत्येकाच्याच घरी पाट्यांची थप्पी लागली आहे, त्यामुळे जेव्हा केव्हा टाळेबंदी उठेल तेव्हा एका पाटीला काय भाव मिळेल हे मात्र स्पष्ट होत नाही.
टाळेबंदी सुरू व्हायच्या आधी, उगाडीच्या आधी एक आठवडा व्यापाऱ्याला पाट्या विकून आलेल्या पैशातून रामुलुंच्या पत्नी नेलीगुंदरशी याडम्मांनी १० दिवसांचं सामान भरलं होतं. बुरुड लोक डाळ, तांदूळ, साखर, तिखट आणि तेल या नेहमीच्या गोष्टी स्थानिक बाजारातून थोड्या थोड्या विकत घेतात किंवा कांगलमधल्या रेशन दुकानातून आणतात. मी ४ एप्रिल रोजी याडम्मांना भेटलो तेव्हा त्यांच्या घरचा बाजारातून आणलेला तांदूळ संपला होता आणि मागल्या महिन्यातला रेशनवरचा तांदूळ – ‘कंट्रोल बिय्यम’, कुपनचा तांदूळ तेवढा उरला होता. तेलंगणात, कुटुंबातल्या प्रत्येकाला रेशनवर १ रुपये किलो दराने सहा किलो तांदूळ मिळतो. आणि इथल्या बाजारात मात्र तांदळाचे भाव ४० रुपये किलो इतके आहेत.
पण टाळेबंदी लागण्याच्या आधीच याडम्मा आणि इतरांच्या ध्यानात आलं होतं की कांगलच्या रेशन दुकानातून आणलेला भात काही खायला चांगला नाहीये. शिजल्यावर तो चिकट होतो आणि त्याला कसा तरी वास येतो. “फारच कम्मती बिय्यम [चविष्ट तांदूळ] होता,” उपरोधाने याडम्मा म्हणतात. “खा, खा, आणि मरा,” त्या पुढे म्हणतात.
तरीही, त्या रेशनवरून नियमित तांदूळ घेत होत्या कारण तांदूळ उचलला नाही तर कार्ड बंद होतील अशी त्यांना भीती होती. याडम्मा हा तांदूळ दळून आणतात आणि रात्री, त्या, त्यांचे पती आणि दोन मुलं भाकरी खातात. टाळेबंदीआधी सकाळ संध्याकाळ बाजारातला यापेक्षा सन्ना बिय्यम (भारी भात) आणि भाज्या जेवणात असायच्या. पण असला तांदुळ, भाज्या आणि इतर गरजेच्या गोष्टी विकत घ्यायच्या तर या बुरुडांच्या हातात नियमित पैसा येणं गरजेचं आहे. “ऐ चन्न जातिकी [या दुर्बल जातीसाठी] या अशा सगळ्या अडचणी आहेत,” रामुलम्मा म्हणतात.
राज्य शासन राष्ट्रीय खाद्यान्न महामंडळाकडून आलेल्या गोदामातल्या धान्याचं वितरण करतं. महामंडळाच्या गुणवत्ता नियंत्रण मार्गदर्शिकेमध्ये म्हटल्याप्रमाणे कबुतराची शिट, चिमण्यांची पिसं, उंदरांची लघवी आणि कीड, अळ्या कीटकांची लागण झाल्यास धान्य खराब होऊ शकतं. त्यामुळे कधी कधी खराब लसणाच्या वासाचं मेथिल ब्रोमाइड आणि फॉस्फिनसारख्या रसायनांची फवारणी केली जाते. कांगालच्या लोकांना रेशनवर खराब तांदुळ मिळतो त्याचं हे एक कारण असू शकतं. “आमची लेकरं त्या भाताला तोंडही लावत नाहीत,” नेलीगुंदरशी वेंकटम्मा सांगतात, त्याही बुरुडकाम करतात.
सध्या तरी धान्याच्या दर्जाचा प्रश्न सुटल्यासारखा वाटतोय. कोविड-१९ मदतीचा भाग म्हणून रामुलु आणि कांगलच्या इतर रहिवाशांना माणशी १२ किलो तांदूळ आणि घरटी १,५०० रुपये मिळाले आहेत. एप्रिल आणि मे असे दोन वेळा त्यांना ही मदत मिळाली आहे. त्यांना रेशनवर मिळतो त्यापेक्षा हा तांदूळ चांगला आहे, रामुलु सांगतात. पण त्यांमी ६ मे रोजी मला फोनवर सांगितलं, “सगळा [मदत म्हणून आलेला तांदूळ] काही चांगला नाहीये. त्यातला काही चांगलाय. सध्या तरी आम्ही तोच वापरतोय. काही जण वाटप झालेला तांदूळ बाजारातल्या तांदळात मिसळून खातायत.”
मी १५ एप्रिल रोजी रामुलुंना भेटलो, तेव्हा त्यांना कांगलच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर रोजंदारीवर काम मिळालं होतं – शक्यतो एप्रिल आणि मे महिन्यात हे काम सुरू असतं. पण अनेक जण कामाच्या शोधात असल्याने त्यांना एकाड एक दिवसच काम होतं, दिवसाला ५०० रुपये मजुरी मिळत होती. मेच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत अधून मधून हे काम चालू राहील, तोपर्यंत धान खरेदी पूर्ण होईल.
रामुलम्मा, याडम्मा आणि इतर बायादेखील २००-३०० रुपये मजुरीवर काम करतायत. “आम्ही कपाशीची धसकटं वेचायला जातो,” याडम्मांनी १२ मेला फोनवर मला सांगितलं.
त्या आणि कांगळची ही बाकीची कुटुंबं येत्या काही महिन्यात काय खाणार हे त्यांना रेशनवर आणि सरकारी वाटपात काय प्रकारचा तांदूळ मिळतो त्यावर तर अवलंबून आहेच पण त्यांच्या पाट्या विकल्या जाणार का आणि शेतात नियमित कामं मिळणार का यावरही हे ठरणार आहे.
दरम्यान १ मे रोजी गृह मंत्रालयाने नव्या सूचना जाहीर केल्या, ज्यानुसार लग्न किंवा तत्सम कार्यक्रमाला जास्तीत जास्त ५० व्यक्ती येऊ शकतात. तेलंगणातही अशी परवानगी मिळाली तर पाट्या-टोपल्यांच्या बाजारात जरा काही तरी हालचाल होईल. आतापर्यंत तरी, रामुलु सांगतात, “आम्हाला त्यांचा [टोपल्यांचे व्यापारी] काहीही फोन आलेला नाहीये. आम्ही वाटच पाहतोय.”
“या टोपल्यांना ५-६ महिने तरी काहीही होणार नाही,” रामुलम्मा सांगतात. “पण त्याचा [गिऱ्हाइकाचा] फोन आलेला नाही. कोरोना काही अजून संपलेला नाही.”
अनुवादः मेधा काळे