उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी कोविड-१९ ची दुसरी लाट आली. दार न वाजवता थेट आत घुसली. तुळजापूर तालुक्यावर आलेल्या संकटाला तुळजा भवानीचं मंदीरही कारणीभूत ठरलं.
जयसिंह पाटील कोविड-१९मुळे मरता मरता वाचले. धोका टळेपर्यंत त्यांनी मंदिरापासून चार हात लांब रहायचा निश्चय केलाय. "लोकांच्या श्रद्धेचा मी आदर करतो. पण महामारी दरम्यान मंदिरं उघडणं योग्य नाही."
४५ वर्षीय पाटील तुळजा भवानी मंदिर ट्रस्टमध्ये कारकून आहेत. "यंदाच्या फेब्रुवारीत मला शेकडो भक्ताच्या रांगेकडे लक्ष द्यायला सांगण्यात आलं," ते म्हणतात. हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक असून भारतभरातून दररोज हजारो भाविक इथे दर्शनाला येत असतात. "भक्त अरेरावी करतात. मंदिरात जाण्यापासून थांबवलं तर अंगावर धावून येतात. मला गर्दीला आवर घालत असतानाच कोविड-१९ झाला असणार."
ते दोन आठवड्यांहून अधिक काळ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर होते. त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण ७५-८० टक्के होतं – डॉक्टरांच्या मते ९२ टक्क्यांपेक्षा कमी प्रमाण म्हणजे धोक्याची घंटा आहे. "मी कसाबसा वाचलोय," जयसिंह म्हणतात. "इतके महिने झाले, अजूनही थकायला होतं."
ते आजारी पडले त्याच्या एका महिना अगोदर त्यांचा ३२ वर्षीय भाऊ जगदीश अशाच संकटातून बचावला. तो तीन आठवडे रुग्णालयात होता. त्याच्या रक्तातली ऑक्सिजनची पातळी ८० टक्क्यांच्या खाली गेली होती. "तो मंदिरात पुजारी आहे," जयसिंह म्हणतात. "त्याला एका कोविड बाधित भक्ताच्या संपर्कात आल्याने संसर्ग झाला. आम्ही दोघंही भयंकर अनुभवातून गेलोय."
भयंकर आणि खर्चिक. दोन्ही भावांच्या उपचारांवर मिळून ५ लाख रुपये खर्च आला. "आमचं नशीब म्हणून आम्ही वाचलो. पण हजारो लोक मरतायत अन् कुटुंबं उद्ध्वस्त होतायत. कितीही प्रयत्न केला तरी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचा बोऱ्या वाजतो," जयसिंह म्हणतात.
१२व्या शतकातील तुळजा भवानी मंदिराची वार्षिक उलाढाल रू. ४०० कोटी एवढी आहे, असं तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे सांगतात. तालुक्याचं अर्थकारण या मंदिराभोवतीच फिरतं. मिठाईवाले, साड्यांची दुकानं, किराणा दुकानं, हॉटेल, लॉज, आणि अगदी पुजाऱ्यांची घरं – सगळ्यांची कमाई इथे येणाऱ्या भक्तांवर अवलंबून आहे.
कोविडपूर्वी मंदिरात दररोज सरासरी ५०,००० भाविक यायचे, असं तांदळे म्हणतात. "नवरात्रात [सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान] दररोज जवळपास एक लाख भाविक येतात," ते म्हणतात. एका वर्षी तर मंदिरात एकाच दिवशी सुमारे सात लाख भाविकांची गर्दी जमली होती.
तहसील कार्यालयाने भाविकांना पास द्यायचं ठरवलं आणि दररोज केवळ २,००० लोकांनाच तुळजापुरात येण्याची परवानगी दिली. हा आकडा कालांतराने वाढवण्यात आला आणि जानेवारी २०२१ पर्यंत दररोज सुमारे ३०,००० भाविक येत होते
९० टक्क्यांहून अधिक भाविक उस्मानाबादच्या बाहेरून येतात, तांदळे म्हणतात. "ते महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि इतरही ठिकाणहून येतात."
त्यामुळे पहिल्या कोविड-१९ लाटेनंतर मंदिर पुन्हा उघडणं जोखमीचं होतं. विशेष म्हणजे पहिल्या लाटेदरम्यान मंदिरात येणाऱ्या भाविकांनी येथील केसेसचा भार वाढवला होता.
१७ मार्च, २०२० पासून मंदिर बंद होतं आणि काही दिवसांनीच देशभर टाळेबंदी जाहीर झाली, तरीही भाविक देवीचं दर्शन घ्यायला येतच राहिले. "ते मुख्य द्वाराजवळ यायचे आणि दुरून दर्शन घ्यायचे," एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. "लॉकडाऊन दरम्यानही भाविकांनी तुळजापूरला यायची सोय केली. एप्रिल-मे [२०२०] दरम्यान इथे दिवसाला ५,००० हून अधिक लोक येत होते. लॉकडाऊन नंतरही इथल्या केसेस कमी झाल्या नाहीत."
मे २०२० च्या अखेरीस जेव्हा जिल्हा प्रशासनाने तुळजापूरमधल्या जवळपास ३,५०० पुजाऱ्यांची तपासणी केली असता त्यांच्यापैकी २० टक्के कोविड-१९ संक्रमित आढळून आले, असं तांदळे सांगतात. जूनपासून तहसील कार्यालयाने तुळजापुरात प्रवेश करण्याआधी लोकांकडून कोविड-निगेटिव्ह रिपोर्ट मागायला सुरुवात केली. "त्याने परिस्थिती आटोक्यात आली," तांदळे म्हणतात. "पण तुळजापूरची परिस्थिती पहिल्या लाटेत खूपच बिघडली होती."
यात काहीच नवल नव्हतं.
काही प्रथा कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढवण्यात कारणीभूत ठरल्या. अशीच एक प्रथा म्हणजे पुजाऱ्यांच्या घरातील महिलांनी तयार केलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे. भाविक त्यासाठी लागणारं साहित्य घेऊन येतात आणि काही पोळ्या प्रसाद म्हणून खातात आणि उरलेल्या मंदिरात देवीला अर्पण करतात.
कोविडपूर्वी ६२ वर्षीय मंदाकिनी साळुंखे दररोज सुमारे १०० भाविकांसाठी पुरण पोळ्या बनवायच्या. त्यांचा मुलगा, ३५ वर्षीय नागेश, देवळात पुजारी आहे. "सणावाराला तर किती पोळ्या बनतात ते विचारूच नका. माझं समदं आयुष्य हे करण्यात गेलंय," त्या म्हणतात. "आयुष्यात पहिल्यांदा थोडा आराम मिळाला. पण लोकं तर पहिल्या लाटेतही येतच होती."
पुरण पोळी बनवणं ही काही सोपी गोष्ट नाही. चांगल्या चवीसोबत या गोल पोळ्या तापलेल्या तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकाव्या लागतात. "तुळजापुरात अशी एकही बाई नसंल जिच्या हाताला चटके बसले नसतील," कल्याणी, नागेश यांची ३० वर्षीय पत्नी म्हणते. "आराम मिळतोय ते खरंय पण आमच्या कमाईलाही फटका बसलाय."
नागेश यांचे पूर्वजही पुजारी होते आणि त्यांच्याकडून वारशाने मिळालेलं त्यांच्या उत्पन्नाचं एकमेव साधन आहे. "भाविक डाळ, तेल, तांदूळ आणि थोडं राशन घेऊन येतात," ते म्हणतात. "त्यातलं थोडं आम्ही त्यांना खाऊ घालतो अन् बाकीचं घरी वापरतो. त्यांच्या वतीनं पूजा केली की ते आम्हाला दक्षिणा देतात. आम्हाला [पुजाऱ्यांना] महिन्याचे रू. १८,००० मिळतात. आता ते सगळं बंद आहे."
मंदिर पुन्हा उघडावं अशी आपली मागणी नसल्याचं ते लगेच स्पष्ट करतात, कारण लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. "अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी तुम्ही लोकांचा बळी देऊ शकत नाही ना. आम्हाला परिस्थितीची कल्पना आहे," ते म्हणतात. "फक्त आम्हाला थोडी मदत मिळावी एवढंच."
तहसील कार्यालयाने भाविक तुळजापुरात येऊ नयेत म्हणून पुजारी आणि रहिवाशांची मदत घेतली. "आम्ही मुख्य पुजाऱ्यांच्या हातून पूजा सुरू ठेवली," तांदळे म्हणतात. "मागल्या वर्षी अगदी नवरात्रातही इथे कोणी भाविक आले नाहीत. आम्ही तुळजापुराच्या बाहेरून कोणालाही मंदिरात प्रवेश करू दिला नाही. दरवर्षी अहमदनगरहून [बुऱ्हाणनगर देवी मंदिरातून] वाजतगाजत पालखी निघते, पण यंदा आम्ही त्यांना कुठेही न थांबता पालखी थेट कारमधून आणायला सांगितली."
पण ऑक्टोबर २०२० मध्ये पहिली लाट ओसरली तसे लोकांनी सगळे नियम धाब्यावर बसवले, जणू काही महामारी इतिहासजमा झाली.
तुळजापूर मंदिर पुन्हा उघडण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली आणि नोव्हेंबर २०२० च्या पहिल्या आठवड्यात एक मोर्चा काढण्यात आला. राज्य विधानसभेतील विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनात पक्षाच्या (भाजप) पदाधिकाऱ्यांनी त्याचं नेतृत्व केलं. "हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार उघडले. मग मंदिरंच का म्हणून बंद ठेवायची?" गुलचंद व्यवहारे, भाजपच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे सचिव म्हणतात. "हा लोकांच्या पोटापाण्याचा सवाल आहे. कोविड फक्त मंदिरातूनच पसरतो का?"
तुळजापुरात अर्थकारण, राजकारण आणि श्रद्धा यांची सरमिसळ आहे, असं एक तहसील अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले. "लोक बोलताना अर्थकारणावर जोर देतात कारण श्रद्धेपेक्षा तो मुद्दा जास्त पटण्यासारखा आहे. खरं तर या तिन्ही घटकांमुळेच मंदिरं बंद करण्याला विरोध झाला."
महाराष्ट्रभर मंदिरं उघडण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आलं. मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०२०च्या मध्यात मंदिरं उघडण्यास परवानगी दिली.
तुळजापूरच्या स्थानिक प्रशासनाने यात्रेकरूंना पासेस देण्याचं ठरवलं, आणि दिवसाला केवळ २,००० लोकांनाच शहरात येण्याची परवानगी दिली. हळूहळू हा आकडा वाढवून दररोज ३०,००० भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली. त्यांना आवर घालणं कठीण होऊ लागलं, असं जयसिंग म्हणतात. "३०,००० पास देण्यात आले तेव्हा आणखी १०,००० लोक पासशिवाय शिरण्याचा प्रयत्न करत होते. देवीच्या दर्शनासाठी दूरवरून येणारे भाविक काहीही झालं तरी नकार सहन करू शकत नाहीत," ते म्हणतात. "दुसरी लाट सरली तरीही आपण बेफिकीर होऊ शकत नाही. काही लोक आजाराची चेष्टा करतात. तुम्हाला स्वतःहून अनुभव येत नाही तोवर तुम्हाला कळणार नाही."
तुळजापुरात भाविकांची गर्दी वाढू लागली तसा उस्मानाबाद जिल्ह्यातील कोविड केसेसचा आकडा वाढू लागला. फेब्रुवारीमध्ये या जिल्ह्यात ३८० कोविड केसेस होते. मार्चमध्ये हा आकडा नऊ पटींनी जास्त सुमारे ३,०५० एवढा झाला. एप्रिलमध्ये १७,८०० हून अधिक केसेस आढळल्या, ज्यामुळे उस्मानाबादच्या आरोग्य यंत्रणेवरचा भार वाढला.
"तुळजाभवानीच्या मंदिराव्यतिरिक्त उस्मानाबाद जिल्ह्यात एवढ्या प्रमाणात कुठेच अशी गर्दी जमली नाही," एक जिल्हास्तरीय अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणतात. "मंदिरामुळे कोविड-१९ची दुसरी लाट फोफावली यात शंका नाही. हे काही प्रमाणात [उत्तर प्रदेशातील] कुंभ मेळ्यासारखं होतं."
तुळजापूरच्या पुजाऱ्यांची दुसऱ्या लाटेदरम्यान कोविड-१९ चाचणी करण्यात आली तेंव्हा त्यांच्यापैकी ३२ टक्के पॉझिटीव्ह आढळून आले. जवळपास ५० जण मरण पावले, तांदळे सांगतात.
उस्मानाबादच्या आठ तालुक्यांपैकी केसेसचे प्रमाण आणि मृत्युदरात तुळजापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. उस्मानाबाद तालुक्यातत सर्वाधिक केसेस आणि मृत्युदर आहे कारण जिल्ह्यातील एकमेव मोठं सार्वजनिक रुग्णालय, सिव्हील हॉस्पिटल, इथे असून पूर्ण जिल्ह्यातील रुग्णांवर इथे उपचार सुरू आहेत.
दुष्काळ, कृषी संकट आणि कर्जाने ग्रासलेल्या मराठवाडा या कृषिप्रधान क्षेत्रात येणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. आधीच हवामान बदल, पाण्याचा दुष्काळ आणि कृषी संकटाचा सामना करत असलेल्या या जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी येथील मोडकळीला आलेल्या आरोग्य सेवेवर अवलंबून राहता येत नाही.
यंदाच्या एप्रिलमध्ये जेव्हा तुळजा भवानी मंदिर पुन्हा एकदा बंद करण्यात आलं, तेव्हा तुळजापूरचे रस्ते निर्मनुष्य झाले, दुकानं बंद करण्यात आली आणि शहरात सलग दुसऱ्या वर्षी एक भयाण शांतता पसरली.
"आजकालच्या [राजकीय] परिस्थितीत फार काळ मंदिर बंद ठेवणं धोक्याचं आहे," असं एक जिल्हा अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले. "कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते."
ढासळत्या अर्थकारणाचा त्यांच्यावर परिणाम होत असला तरी तुळजापुरातील लोकांनी सुरक्षित राहायचं ठरवलं.
४३ वर्षीय संदीप अगरवाल यांचं गावात किराणा दुकान आहे. ते म्हणतात की कोविडपूर्वीच्या काळात त्यांचा रोजचा धंदा दिवसाला रू. ३०,००० होता. तो शून्यावर येऊन कोसळला. "पण देशातल्या बहुतांश लोकांचं लसीकरण होईपर्यंत मंदिर उघडायला नको," ते म्हणतात. "आयुष्य एकदाच मिळतं. या महामारीतून बचावलो, तर आपण अर्थव्यवस्था सुधारू. ज्यांना मंदिर उघडायला हवंय ते उस्मानाबादमध्ये राहत नाहीत."
अगरवाल यांचं म्हणणं बरोबर आहे.
तुळजा भवानी मंदिरातील एक महंत तुकोजीबुवा यांना देशभरातून ‘मंदिर कधी उघडणार?’ असे दिवसाला वीसेक चौकशीवजा फोन येतात. "मी त्यांना सांगत असतो की लोकांचा जीव धोक्यात आहे, अन् असं समजा २०२० आणि २०२१ ही वर्षं आपण आरोग्यसेवेला वाहिली," ते म्हणतात. "तुमच्यात अन् तुमच्या श्रद्धेच्या आड हा व्हायरस येता कामा नये. तुम्ही आहात तिथून देवीला हात जोडू शकता."
मात्र, तुळजा भवानीच्या भक्तांना तिचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याची किंवा निदान दारापर्यंत यायची इच्छा आहे, असं महंत मला सांगतात.
तुकोजीबुवा आपलं वाक्य संपवत नाहीत तोच त्यांचा फोन वाजतो. तुळजापूरहून ३०० किमी लांब, पुण्याहून एक भक्त आहे.
"साष्टांग नमस्कार," भक्त म्हणतो.
"बोला, काय म्हणता?" महंत विचारतात.
"देऊळ लवकर उघडायला हवं," पुण्यातून बोलणारा भक्त कळकळीने म्हणतो. "देव कधीच काही वाईट घडू देणार नाही," तो म्हणतो. "आपण सकारात्मक राहायला हवं. आज आपण जे काही आहोत ते तुळजा भवानीमुळे. डॉक्टरही देवावर श्रद्धा ठेवायला सांगतातच की."
तुकोजीबुवा त्यांच्याशी चर्चा करून म्हणतात की त्याने पूजेचं ऑनलाईन प्रक्षेपण पाहावं. कोविड-१९ टाळेबंदी सुरू झाल्यापासून मंदिराने पूजेचं प्रक्षेपण सुरू केलंय.
पण भक्ताला हे मान्य नाही. "मंदिरातल्या गर्दीमुळे कोविड थोडीच पसरणार आहे," तो महंतांना म्हणतो, आणि मंदिर उघडता क्षणीच ३०० किलोमीटर अंतर चालत दर्शनाला येण्याचं वचन देतो.