बाळंतपणानंतर दीपा दवाखान्यातून घरी आली तेव्हा आपल्या गर्भाशयात तांबी बसवलीये याची तिला सुतराम कल्पना नव्हती.
तिचं दुसरं बाळ जन्माला आलं होतं, दुसरा मुलगा. तिला नसबंदी करून घ्यायची होती. पण सिझेरियन झालं होतं त्यामुळे, दीपा सांगते, “डॉक्टरांनी सांगितलं की सिझेरियन आणि नसबंदी एकाच वेळी करता येत नाहीत.”
त्यामुळे डॉक्टरांनी दीपाला तांबी बसवून घेण्याचा सल्ला दिला. दीपा आणि तिचा नवरा नवीन (दोघांची नावं बदलली आहेत) यांना वाटलं होतं की डॉक्टर फक्त सल्ला देतायत.
२०१८ च्या मे महिन्यात बाळंतपणानंतर चार दिवसांनी २१ वर्षीय दीपाला दिल्लीच्या शासकीय दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं. “आम्हाला कल्पनाच नव्हती की डॉक्टरांनी तांबी बसवून टाकली होती,” नवीन सांगतो.
साधारण एक आठवडाभरानंतर त्यांच्या भागातल्या आशा कार्यकर्तीने हॉस्पिटलने घरी जाताना दिलेले कागद वाचले तेव्हा कुठे त्यांना काय झालंय ते लक्षात आलं. दीपा आणि नवीन दोघांनीही त्या आधी ते काही वाचलेले नव्हते.
तांबी हे गर्भाशयात बसवण्याचं गर्भनिरोधक साधन आहे. यामुळे गर्भ गर्भाशयाच्या भिंतीवर रुजत नाही. “काही वेळा तांबीची सवय होण्यासाठी तीन महिने लागू शकतात आणि काही जणींना त्याचा त्रासही होऊ शकतो. म्हणून आम्ही दवाखान्यात नियमित [सहा महिन्यांपर्यंत] येऊन तपासणी करून जायला सांगतो,” ३६ वर्षीय सुशीला देवी सांगतात. त्या २०१३ सालापासून दीपाच्या परिसरात आशा कार्यकर्ती म्हणून काम करत आहेत.
पण पहिल्या तीन महिन्यांमध्ये दीपाला कसलाच त्रास झाला नाही. तिच्या थोरल्या मुलाचं काही तरी आजारपण सुरू असल्याने ती तपासणीसाठी दवाखान्यात देखील गेली नाही. तिने तांबी वापरावी असं ठरवलं.










