सविंदण्यातली एप्रिल महिन्यातली रात्रीची गार हवा. घड्याळात २ वाजलेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या शिरूर तालुक्यातल्या या गावात मंदिरासमोरच्या खुल्या मैदानात चमचमत्या रंगीत दिव्यांच्या उजेडात हिंदी सिनेगीतांवर नर्तकींचे पाय थिरकतायत. लल्लन पासवान आणि त्याच्या साथीदारांचं मात्र या नाचकामाकडे लक्ष नाहीये. शिट्टया वाजवणारे पुरुष आणि मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्या स्पीकर्सपासून लांब, छोटीशी डुलकी काढण्यासाठी त्यांनी एक निवांत जागा शोधलीये. त्यातले काही जण मोबाइल फोनवर सिनेमा पाहून वेळ काढतायत.
“हे काम फार थकवणारं आहे. आम्ही रात्रभर जागे असतो, मालकांना वाटतं आम्ही त्यांच्यासाठी सगळा वेळ काम करावं,” लल्लन पासवान सांगतो. आता १९ पूर्ण असलेला लल्लन (शीर्षक छायाचित्रात) ‘मंगला बनसोडे आणि नीतीन कुमार तमाशा मंडळी’सोबत वयाच्या १३व्या वर्षापासून काम करतोय. तो ३० कामगारांच्या गटातला एक. उत्तर प्रदेशच्या लखनौ जिल्ह्याच्या माल तालुक्यातल्या मलिहाबाद तहसिलातले हे सगळे कामगार बहुतकरून दलित समुदायाचे, १५ ते ४५ वयोगटातले आहेत. आणि बहुतेक सगळे एकमेकांच्या नात्यातले किंवा गावी एकमेकाच्या भावकीतले आहेत.
तमाशाचा फड एका गावाहून दुसऱ्या गावाला जातो तिथे हे कामगार स्टेज आणि राहुट्या बांधायचं काम करतात. सप्टेंबर ते मे या आठ महिन्यांच्या हंगामात ते हेच काम किमान २१० वेळा करत असतील. तमाशा हा महाराष्ट्रातील लोककला प्रकार आहे, दररोज वेगवेगळ्या गावी मोकळ्या मैदानात तमाशा सादर केला जातो. नाच, गाणी, छोटे प्रवेश आणि वग असा एकत्र खेळ असतो. फडात कलाकार, मजूर, ड्रायव्हर, वायरमन, व्यवस्थापक आणि आचारी असा सगळा लवाजमा असतो.
लल्लनला त्याच्याच गावच्या, औमाउच्या एका मित्राकडून हे काम मिळालं. त्या आधी तो लखनौमध्ये एक मिस्त्री म्हणून काम करत होता. पण काम कधीमधीच मिळायचं आणि पैसे पण पुरेसे मिळत नसत. आता, पाचवीत शाळा सोडलेल्या लल्लनला त्याच्या गावातल्या गटाचा ‘मॅनेजर’ म्हणून महिन्याला रु. १०,००० मिळतात. गरज पडेल तसं तो फडासाठी मजूरही आणतो. “आम्हाला जर गावात एखादा मुलगा, काम नाही अभ्यास नाही, फुकट भटकताना दिसला तर आम्ही त्याला इथे मजुरीसाठी घेऊन येतो,” तो म्हणतो. “मला तर वाटतं की प्रत्येकासाठी एकत्र काम करण्याची, कमाई करण्याची ही एक चांगली संधी आहे.”
तमाशा फडाच्या मालकांनाही उत्तर प्रदेशातलेच मजूर हवे असतात. फडाचे मॅनेजर अनिल बनसोडे म्हणतात, “एक तर ते खूप मेहनती असतात आणि आम्हाला मध्येच टाकून निघून जाण्याची शक्यताही कमी.” उत्तर प्रदेशातले कामगार कमी मजुरीवर काम करायला तयार होतात हेही यामागचं आणखी एक कारण असावं असं पुणे स्थित छायाचित्रकार आणि तमाशाचे संशोधक संदेश भंडारे यांचं म्हणणं आहे.
इतर कामांपेक्षा स्टेज बांधणं मोठं मुश्किल काम आहे, लल्लन आणि त्याचे साथीदार सांगतात. एकदा का सामान वाहून नेणारा ट्रक गावात पोचला की सगळे मजूर लाकडी फळ्या, लोखंडी सांगाडा आणि प्रकाश योजना आणि साउंडसाठी लागणारं सगळं साहित्य उतरवून घेतात. लोखंडी सांगाडा उभा करून त्यावर लाकडी फळ्या टाकल्या जातात. त्यानंतर स्टेजचं छत आणि दिवे इत्यादीसाठी लोखंडी फ्रेम उभ्या केल्या जातात. १५-२० कलाकार आणि सगळी वाद्यं इत्यादीचं वजन पेलेल असं पक्कं स्टेज उभारावं लागतं. कधी कधी तर खेळात एखादी मोटरसायकल किंवा घोडासुद्धा असतो. अशा वेळी या जादा वजनाची देखील सोय करावी लागते.
“जो गट स्टेज बांधतो ना त्यांना तमाशा संपेपर्यंत जागं रहावं लागतं, तशी फड मालकांची अपेक्षा असते,” राहुट्या बांधणाऱ्या आठ जणांच्या गटाची जबाबदारी लल्लनवर आहे. “पण मालक [आमच्या कामात] लुडबूड करत नाही. ही पूर्ण आमची जबाबदारी असते आणि आम्हीच ती नीट पार पाडतो,” तो अभिमानाने सांगतो.
स्टेजजवळ लोखंडी अडथळे उभारण्याचं काम चार जणांकडे आहे, जेणेकरून प्रेक्षक स्टेजच्या फार जवळ जाऊ शकणार नाहीत. तिकिटबारीवरच्या खेळांवेळी आणखी १०-१२ जण स्टेजला जोडून मोठा मांडव घालतात आणि मांडवाकडे जाण्यासाठी यायला जायला दारं उभारली जातात. एक जण फक्त जनरेटरचं काम पाहतो कारण महाराष्ट्रातल्या विजेच्या लपंडावामुळे त्याच्याशिवाय काहीच करणं शक्य नाही.
हे मजूर सुरक्षेची पण काळजी घेतात. औमाउचाच संतराम रावत, वय २० जनरेटरचं काम पाहतो. पण प्रेक्षक जास्त दंगा करायला लागले तर तो त्यांना आवरायलाही मदत करतो. “लोक जर [स्त्री कलाकार राहत असलेल्या] राहुट्यांमध्ये यायचा त्या फाडायचा प्रयत्न करायला लागले तर आम्हाला त्यांना जरा नीट वागायला सांगावं लागतं. त्यांनी असं करू नये हेही त्यांना सांगावं लागतं,” गेली पाच वर्षं या फडाबरोबर काम करणारा संतराम सांगतो. “त्यांच्यात जर एखादा बेवडा असेल तर मात्र आम्ही त्याला २-३ झापडा लगावतो आणि हाकलून लावतो.”
मजुरांच्या विश्रांतीची वेळ काही ठरलेली नाही. खेळ रात्री १० किंवा ११ वाजता सुरू होतो आणि रात्री ३ ला किंवा अगदी पहाटे ५ पर्यंत चालतो. त्यानंतर त्यांना पटापट राहुट्या, स्टेज आणि सगळं साहित्य गोळा करावं लागतं. खेळ जर तिकिटं लावून होणार असेल (गावाने सुपारी दिलेला खेळ सगळ्यांना मोफत असतो) तर त्यांना तिकिटाची खिडकी पण आवरून घ्यावी लागते. एकदा का सगळं सामान ट्रकमध्ये लादलं की मग तिथेच मिळेल त्या जागेत हे मजूर अंगाचं मुटकुळं करून झोपायचा प्रयत्न करतात. हे ट्रक आणि कलाकारांना घेऊन जाणाऱ्या बस पुढच्या गावी जायला निघतात. एकदा तिथे पोचलं की दुपारपर्यंत हे मजूर कलाकारांना विश्रांतीसाठी आणि कपडे बदलण्यासाठी आधी राहुट्या ठोकतात. मग ते जरा वेळ डुलकी काढतात, अंघोळी उरकतात आणि खाऊन घेतात. आणि मग परत ४ वाजता त्यांचं स्टेज उभारण्याचं काम सुरू होतं.
सतत फिरतीवर असल्यामुळे खाण्याचेही वांदेच असतात. “कुठल्याच पोरांना [मजुरांना] इथलं खाणं आवडत नाही. आम्ही आमच्या घरी गव्हाच्या पोळ्या आणि भात खातो. इथे [ज्वारी किंवा बाजरीच्या] भाकरी खाव्या लागतात,” संतराम म्हणतो. “वर सगळ्यात शेंगदाणा आणि खोबरं,” लल्लन बोलतो आणि बाकी सगळेही माना डोलावतात. “आमच्या खाण्यात यातलं काहीच वापरत नाहीत. पण लाड चालत नाहीत, आहे ते खायलाच लागणार.”
खाण्याच्या वेळा पण फार विचित्र. “कधी कधी आम्हाला सकाळी १० वाजता खाणं मिळतं, तर कधी दुपारी ३ वाजता. ठराविक वेळ नाही. हंगामाच्या शेवटी आमच्या तब्येती उतरलेल्या असतात,” लल्लन सांगतो. “आम्हाला वेळेवर खाणं मिळालं तरच आम्ही खातो, नाही तर आम्हाला सगळं सामान लावायचं, उतरवायचं काम रिकाम्या पोटी करावं लागतं,” लल्लनचा धाकटा भाऊ, १८ वर्षांचा सर्वेश सांगतो.
अशा सगळ्या अडचणी असल्या तरी या मजुरांना तमाशाचं काम हवं असतं कारण नियमित काम आणि कमाई. ते फडाबरोबरच्या आठ महिन्याच्या हंगामात महिन्याला रु. ९०००-१०,००० कमवतात, अर्थात नुकत्याच आलेल्या नव्या पोरांना मात्र रु. ५००० च मिळतात.
सर्वेशने ११ वीत असताना शाळा सोडली, आपल्याकडे पैसे नाहीत असं घरच्यांचं सततचं सांगणं ऐकून तो कंटाळला होता. “मी विचार केला, पैसे मागण्यापेक्षा स्वतःच पैसा कमवावा,” तो म्हणतो. त्याचे वडीलही फडात मजुरी करतात आणि त्याचा धाकटा भाऊदेखील इथेच वरकामाला आहे. आठ महिन्यांनंतर सगळा खर्च वगळता हे कुटुंब दीड ते दोन लाख रुपये घरी घेऊन जाईल. या वर्षीच्या तमाशाच्या कमाईतून लल्लनचं लग्न पार पडेल आणि घर बांधायला काढलंय तिथेही पैसे कामी येतील.
प्रत्येक मजुराला रोज हातखर्चाला ५० रुपये मिळतात. त्यांच्या महिन्याच्या कमाईतून ही रक्कम वगळली जाते. यातला बराचसा पैसा (फडात मिळणाऱ्या दोन वेळच्या जेवणापेक्षा) जादाच्या खाण्यावर खर्च होतो. काही जण तंबाखू किंवा दारूवर हा पैसा खर्च करतात. “मी पीत नाही, पण इथे तसे ५-६ जण आहेत,” लल्लन सांगतो. त्याचे वडील त्यातलेच एक. त्यातल्या काहींना गांजाचं व्यसन आहे. “आम्ही किराणा शोधेपर्यंत यांना गांजा आणि दारूचा तपास लागलेला असतो,” सर्वेश हसत हसत सांगतो.
तमाशाबरोबर काम करण्याचं दुसरं कारण म्हणजे या मजुरांना फिरायला मिळतं. “आम्ही रोज नव्या जागी जातो, त्यामुळे रोज नवीन गावी हिंडता येतं. एकाच जागी काम करणं किंती कंटाळवाणं होईल,” लल्लन म्हणतो.
पण बहुतेक कामगार आपण तमाशाच्या फडावर काम करत असल्याचं आपल्या घरच्यांना सांगत नाहीत. “आम्ही गावी लोकांना सांगितलंय की आम्ही ऑर्केस्ट्रामध्ये किंवा एका डीजे कंपनीत कामाला आहोत आणि तिथे कधी कधी नाचाचे कार्यक्रमही होतात. तमाशात काम करणं त्यांना फारसं मानाचं वाटणार नाही,” लल्लन सांगतो. उत्तर प्रदेशात अशाच प्रकारचा जी ‘नौटंकी’ असते तिथे ते काम करत नाहीत कारण तिथल्या नाचणाऱ्यांबद्दल फार बरं बोललं जात नाही. “इथे या कलेला मान आहे, उत्तर प्रदेशात तसं नाही.”
मेमध्ये तमाशाचा हंगाम संपला की सगळे मजूर आंब्याच्या मोसमासाठी औमाउला जातात. या भागातले आंबे सगळ्या देशातच काय देशाबाहेर पाठवले जातात, सर्वेश अभिमानाने सांगतो. आमच्या बागेत सात प्रकारचे आंबे आहेत, संतराम भर घालतो.
हा विश्रांतीचा आणि शीण घालवायचा काळ असतो. “आम्ही इथून परत जातो तेव्हा आम्हाला विश्रांतीची फार गरज असते. गावी दोन महिने काढल्यानंतर आम्ही परत कामासाठी तंदुरुस्त. आंबे खायचे, फारसं काही काम करायचं नाही. खा-झोपा-भटका-पुन्हा तेच,” लल्लन सांगतो.
या गटातल्या बहुतेकांप्रमाणे लल्लन आणि सर्वेशच्या कुटुंबाच्या मालकीची जमीन आहे जिथे ते घरी खाण्यापुरता गहू करतात आणि विकायला म्हणून आंबे लावलेत. “या तमाशाच्या मैदानाइतकी आमची जमीन असेल. साधारणपणे एक एकर,” लल्लन सांगतो. त्यांचा चुलता शेती करतो आणि त्यांना त्यांचा वाटा मिळतो, दर वर्षी सुमारे ६०-७०,००० रुपये. सर्वेश आणि लल्लन रोज थोडा वेळ आंबे उतरवतात, बाजारात पाठवतात आणि मग परत आराम करतात.
“आम्हाला आवश्यक तेवढी कमाई या जमिनीतून होते. पण आम्ही गावी राहिलो तर आम्ही रोजची कमाई रोज खर्चून टाकू. इथे आम्हाला एक गठ्ठा पैसे हातात मिळतात, खर्च करून कशावर करणार? या पैशातून आम्ही घर बांधू शकतो, लग्नाचा खर्च करू शकतो...” लल्लन समजावून सांगतो.
तो गावी असताना छोटी मोठी कामं करतो. लखनौत रोजंदारीवर काम किंवा गावात शेतमजुरी किंवा रोजगार हमीवर काम – यातून दिवसाला रु. २०० हाती पडतात. पण रोज काही काम मिळत नाही. “कधी कधी तर सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पूर्ण वेळ काम मिळण्याची वाट पाहण्यात जातो,” तो हसून सांगतो.
पण, पुढच्या वर्षी, लग्न झाल्यानंतर काही तमाशावर परत येणार नाही असं लल्लन सांगतो. “मी गावीच काही तरी काम शोधीन... मला सगळ्या गोष्टी करता येतात. कपडे पण शिवता येतात,” तो म्हणतो. त्याची होणारी बायको शिलाई करते आणि तिने बीएची पदवी घेतल्याचंही तो सांगतो.
संतरामसुद्धा गावी परतल्यावर लग्न करणार आहे. तो म्हणतो, “आता मी गावीच स्थायिक होणार आहे. मी तिथे दुकान टाकायचं म्हणतोय, किराणा दुकान. मीच इथे आलो तर बायकोकडे आणि आईकडे कोण पाहणार? माझं लग्न व्हायचंय म्हणून मी इथे येत होतो.”
सर्वेशसुद्धा म्हणतो की तोही कदाचित आता तमाशावर येण्यापेक्षा चंदिगड किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरात काम शोधणारे. “मला फक्त नीट खाणं आणि झोप गरजेची आहे. आम्ही एकदा का घर सोडलं की आम्ही कुठेही काम करायला तयार असतो...”
अनुवादः मेधा काळे