“सगळ्या ३२ संघटना नौजवानांना विनंती करतोय की कुणालाही त्रास होता कामा नये. कुणीही काहीही नुकसान करणार नाही. कुणी कुणाशी भांडणार नाही. या आपल्या लढ्याला कुणीही गालबोट लावणार नाही,” हे आवाहन ऐकू येत होतं. “दिल्ली पोलिसांनी दिलेल्या अधिकृत मार्गावरूनच आपण मोर्चा काढणार आहोत. आपण जगाला दाखवून देऊ की शांततापूर्ण मोर्चा कसा असतो,” ट्रॅक्टरवर बसवलेल्या लाउडस्पीकरवरून नेता सांगत होता.
२६ जानेवारी, सकाळचे ९.४५ वाजले होते, आणि ट्रॅक्टर्सचा जत्था मुंडका इंडस्ट्रियल एरिया मेट्रो स्टेशन जवळून निघाला होता जेव्हा लाउडस्पीकरवरून आवाज आला. सेवाभावी कार्यकर्ते पुढे गेले आणि मानवी साखळी करून त्यांनी सगळ्यांना थांबायला सांगितलं जेणेकरून नेते काय सांगतायत ते सगळ्यांना समजेल.
मोर्चा पश्चिम दिल्लीच्या टिक्रीहून सकाळी ९ वाजता निघाला होता. किसान मजदूर एकता जिंदाबादचे नारे घुमत होते. जत्थ्यासोबत अनेक आंदोलक आणि सेवाभावी कार्यकर्ते पायी निघाले होते – काहींच्या हाताता तिरंगा होता तर काहींच्या हातात आपापल्या संघटनेचे झेंडे. “जे पायी चालत निघाले आहेत, त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी ट्रॅक्टरवर बसून घ्या. आपल्याला दूरचं अंतर जायचं आहे,” लाउडस्पीकरवरच्या नेत्यानी आवाहन केलं. तरीही पायी जाणारे अनेक चालत राहिले.
हा जत्था शांतपणे पुढे जात होता आणि मुंडकाच्या वस्तीतले अनेक जण रस्त्याच्या कडेने आणि रस्त्याच्या दुभाजकावर उभं राहून हे दृश्य पाहत होते. हा अभूतपूर्व जत्था अनेक जण आपापल्या फोनमध्ये चित्रित करत होते, काही जण हात हलवत अभिवादन करत होते आणि काही तर ढोलाच्या तालावर नाचतही होते.
त्यातलाच एक, मुंडकाचा रहिवासी, ३२ वर्षीय विजय राणा त्याच्या वस्तीतून निघालेल्या या जत्थ्यातल्या शेतकऱ्यांवर झेंडूच्या पाकळ्या उधळायला इथे आला होता. “जर राजकारण्याचं स्वागत असं फुलं उधळून केलं जातं, तर मग शेतकऱ्यांचं का नाही?” तो विचारतो. राणा स्वतः शेतकरी आहे आणि मुंडका गावात आपल्या १० एकरात गहू, भात आणि दुधी भोपळ्याची शेती करतो. तो म्हणतो, “शेतकरी काही सैनिकांहून कमी नाहीत. जर सीमेवरच्या सैनिकांनी सीमा सोडली तर देश कुणाच्याही ताब्यात जाऊ शकेल. तसंच शेतकऱ्याशिवाय हा देश उपाशी राहील.”








