ते जरा विचित्र होतं – पण दिल्लीच्या जीटी कर्नाल बायपासपाशी आमच्या डोळ्यासमोर ते घडत होतं.
एक गट ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या दिशेने आणि आतमध्ये निघाला होता – आणि दुसरा एक गट उलट्या दिशेने, दिल्लीकडून सिंघुच्या दिशेने चालला होता. ते एकमेकांच्या जवळून गेले आणि हे दृश्य म्हणजे प्रत्यक्षात काय गोंधळ उडाला होता त्याचं रुपक म्हणता येईल. दिल्लीहून परत येणारा गट त्यांच्या नेत्यांच्या आवाहनाचा मान राखत परत येत होता. त्यांच्यातले काही जण चुकून दिल्लीत शिरले होते कारण त्यांचा असा समज झाला होता की त्यांच्या नेत्यांनी दिल्ली पोलिसांनी आखून दिलेला मार्ग सोडून वेगळ्याच मार्गाने दिल्लीत प्रवेश करायचं ठरवलं होतं.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संसदेत रेटून पारित केलेल्या तीन कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांची स्वतःची प्रजासत्ताक दिनाची परेड काढण्याचा निर्णय घेतला होता. सिंघु, टिक्री, गाझीपूर, चिल्ला आणि मेवात अशा दिल्लीच्या सीमेवरच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून मोर्चा निघणार होता. राजस्थान-हरयाणाच्या सीमेवर शहाजहानपूर इथे देखील एक मोर्चा निघाला ज्यामध्ये भारताच्या राज्यांचं आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधीत्व करणारे देखावे ६० किलोमीटर अंतर पार करणार होते. अखिल भारतीय किसान सभेच्या शब्दात सांगायचं तर प्रजासत्ताक दिनाला देशाच्या नागरिकांनी सादर केलेला हा सर्वात मोठा सोहळा होता.
हा भव्य, शांततापूर्ण, शिस्तबद्ध मोर्चा आजवर कधी झाला नव्हता. सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि इतर अनेकांनी आज खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आपल्या हाती घेतलं. इथेच नाही तर भारताच्या बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये असेच कार्यक्रम आणि मोर्चे काढण्यात आले.
पण, तुलनेने छोट्या एका गटाने इतक्या प्रचंड प्रमाणावर घडवून आणलेल्या अद्भुत अशा सोहळ्यापासून सगळ्यांचं लक्ष विचलित केलं आणि तुरळक पण त्रासदायक अशा, अचंबित करून टाकणाऱ्या घटनांकडे वळवलं. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनांचं नेतृत्व करणाऱ्या ३२ शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने ठरलेला मार्ग सोडून दिल्लीत शिरलेल्या या फुटीर गटाने केलेल्या हिंसेचा आणि तोडफोडीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. “शेतकऱ्यांच्या शांततामय आणि जबरदस्त आंदोलन उधळून लावण्यासाठी आखण्यात आलेला, खोलवर पाळंमुळं असणारा कट” अशा शब्दात मोर्चाने याचा निषेध व्यक्त केला आहे.



















