“मला ट्रॅक्टर कसा चालवायचा ते माहितीये,” सरबजीत कौर सांगून टाकतात. आणि म्हणूनच दोन महिन्यांपूर्वी त्या आपल्या पांढऱ्या ट्रॅक्टरवर स्वार झाल्या आणि पंजाबच्या आपल्या जसरूर गावाहून ४८० किलोमीटरचं अंतर पार करत हरयाणा-दिल्ली सीमेवर सिंघुला पोचल्या. “माझी मीच आले,” त्या सांगतात. त्यांच्या गावातले बाकी लोक मात्र शेतकरी संघटनेने ट्रॅक्टर ट्रॉलीची सोय केली होती, त्यातून पोचले.
जसरूर सोडण्याआधी देखील सरबजीत सप्टेंबर २०२० मध्ये संसदेत पारित केलेल्या कृषी कायद्यांबद्दल बोलत, त्यांचा विरोध करतच होत्या. अमृतसर जिल्ह्याच्या अजनाला तहसिलातल्या त्यांच्या २,१६९ लोकसंख्या असलेल्या गावात त्या घरोघरी जाऊन या कायद्यांच्या विरोधातली चळवळ उभी करत होत्या. मग, २५ नोव्हेंबर रोजी त्या जसरूर आणि आसपासच्या गावांमधून १४ ट्रॅक्टर ट्रॉल्यांचा जत्था निघाला त्यासोबत निघाल्या. हा जत्था जमहुरी किसान सभेने आयोजित केला होता (देशभरातल्या तब्बल २०० शेतकरी संघटनांचा संयुक्त मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीशी संलग्न). ते पहाटे निघून २७ नोव्हेंबर रोजी सिंघुला पोचले.
आणि आता २६ जानेवारीला, प्रजासत्ताक दिनी निघणाऱ्या अद्भुत अशा ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. हरयाणाच्या सोनिपतजवळ सिंघुच्या उत्तरेला तीन किलोमीटरवर कुंडलीच्या सीमेपासून हा मोर्चा सुरू होणार आहे. “मी माझ्या ट्रॅक्टरवर सहभागी होणार आहे,” त्या सांगतात.
हरयाणामधले सिंघु व टिकरी आणि उत्तर प्रदेशचं गाझीपूर ही २६ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या आंदोलनाची मुख्य केंद्रं बनली आहेत आणि लाखो शेतकरी तिथे ठाण मांडून बसले आहेत. तीन नवे कृषी कायदे रद्द करा ही त्यांची मागणी आहे. “जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत, बच्चे-बूढे, बाया-गडी कुणीही इथनं हलणार नाही,” सर्बजीत सांगतात.
“मला कुणीही इथे यायला सांगितलं नाही. आणि कुणीही मला इथे ‘बसवलेलं’ नाहीये,” त्या सांगतात. आंदोलनस्थळी ट्रॅक्टरची लांब रांग लागली आहेत, तिथे त्या आपल्या ट्रॅक्टरपाशी उभ्या आहेत. “माझ्या ट्रॅक्टरवरून किती तरी जण इथे आंदोलनासाठी आले आहेत. आता तुम्ही काय असं म्हणणार का, मी त्यांना इथे आणलंय म्हणून?” त्या विचारतात. (११ जानेवारी रोजी) भारताच्या सरन्यायाधीशांनी अशी टिप्पणी केली होती की आंदोलनाच्या ठिकाणी ‘बसवण्यात आलेल्या’ स्त्रिया आणि म्हाताऱ्यांना घरी जाण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे, त्या संदर्भात त्या बोलत होत्या.






