“टिक्रीच्या सीमेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रॅक्टरची किमान ५० किलोमीटरची रांग लागलीये,” कमल ब्रार सांगतात. हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातून ते आणि त्यांच्या गावातले इतर २० शेतकरी २४ जानेवारी रोजी दोन ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉली घेऊन टिक्रीच्या सीमेवर पोचले.
सप्टेंबर २०२० मध्ये संसदेत रेटून पारित करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर २६ नोव्हेंबर पासून आंदोलन करत आहेत. हरयाणा-दिल्लीच्या सीमेवरची टिक्री सीमा हे त्यातलं एक महत्त्वाचं आंदोलन स्थळ.
याच आंदोलनाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी राजधानीमध्ये अभूतपूर्व असा ट्रॅक्टर मोर्चा काढायचं ठरवलं आहे.
यात भाग घेणाऱ्यांपैकी एक आहेत निर्मल सिंग. पंजाबच्या फझिलका जिल्ह्याच्या अबोहार तालुक्याच्या आपल्या वहाबवाला गावाहून चार ट्रॅक्टर घेऊन आलेल्या सिंग यांचे टिक्रीमध्ये गाड्या उभ्या करायला जागा शोधण्यातच कित्येक तास गेले. किसान मझदूर एकता युनियनतर्फे ते वहाबवालाहून २५ लोकांना सोबत घेऊन आले आहेत. “अजून खूप सारी माणसं येणार आहेत. ट्रॅक्टरची संख्या वाढतच जाणार आहे, बघाच तुम्ही,” ते म्हणतात.








