तन्ना सिंग यांचा नातू सारखा त्यांना फोनवर म्हणत असतो. “पण मी परत कसा जाणार, सांगा? त्याच्या भविष्यासाठीच तर मी इथे आलोय ना,” सिंग म्हणतात. ते आपल्या तंबूतल्या प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून आमच्याशी बोलत होते.
“दर वेळी माझा मुलगा त्याच्याबद्दल [त्यांच्या मुलाचा १५ वर्षांचा मुलगा] सांगतो तेव्हा ऊर भरून येतो. आपल्या नातवंडांना सोडून असं कुणी येतं का? आपली मुलं-मुली मागे ठेवून असं कोण येईल?” पाणावल्या डोळ्यांनी तन्ना सिंग मला विचारतात.
असं असलं तरीही कुठल्याही परिस्थितीत तन्ना सिंग माघारी जाणार नाहीयेत. २६ नोव्हेंबर २०२० पासून आजपर्यंत ते टिक्रीच्या आंदोलनस्थळावरून एका दिवसासाठीही कुठे गेलेले नाहीयेत. आणि जवळ जवळ एक वर्षानंतर पंतप्रधानांनी हे वादग्रस्त तीन कायदे रद्द होतील अशी घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात कायदे रद्द झाल्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब होईपर्यंत ७० वर्षांचे तन्ना सिंग टिक्रीतच थांबणार आहेत.
हे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी वर्षभरापूर्वी हजारो शेतकरी दिल्लीला यायला निघाले, त्यातलेच तेही एक. दिल्लीमध्ये येण्यापासून त्यांना रोकण्यात आलं त्यानंतर टिक्री (दिल्लीच्या पश्चिमेला), सिंघु (वायव्येकडे) आणि गाझीपूर सीमेवर हे शेतकरी तळ ठोकून आहेत.
तन्ना सिंग पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातल्या आपल्या भंगचारी गावाहून इथे आले. ते आणि त्यांच्याबरोबर इतर काही शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टरवर इथे आले. आंदोलन स्थळी कुठे तरी ट्रॅक्टर उभा केलेला आहे. गावी त्यांची आठ एकर जमीन आहे आणि त्यांचं कुटुंब या जमिनीत गहू आणि तांदूळ करतं. “शेताची जबाबदारी मुलावर टाकून मी इथे आलोय,” ते सांगतात.










