“अच्छा, तुम्ही कोलकात्याचे?” त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याचे डोळे चमकले. “मी कोलकाता आणि हावड्याला पण आलोय. किती तरी वेळा. आणि नेहमी कामाच्याच शोधात. कधी नशीब निघायचं, कधी नाही. शेवटी, इथे येऊन पोचलोय.”
‘इथे’ म्हणजे समुद्रसपाटीपासून १०,००० फूट उंचावर, लडाखमध्ये. झारखंडमधल्या आपल्या घरापासून २,५०० किलोमीटरवर राजू मुरमू आपल्या परिचयाच्या गजबजलेल्या शहराच्या आठवणींची ऊब आपल्या सभोवताली पांघरून घेतो. हिमालयाच्या या वाळवंटात त्याच्या तंबूबाहेरचं पारा संध्याकाळ होताच झपाट्याने खाली उतरायला लागतो. वीज नसल्याने राजू आणि त्याच्या सोबतचे स्थलांतरित कामगार राहतात त्या तंबूंभोवती थोड्या वेळातच अंधार भरून जाईल.
३१ वर्षीय राजू झारखंडच्या दुमका जिल्ह्यातल्या बाबूपूरचा रहिवासी आहे. तो आणि त्याच्यासारखे इतर कामगार भारतातले सर्वात उंचावरचे रस्ते बांधण्यासाठी लडाखला नियमित येतायत. “हे माझं चौथं वर्ष आहे. मी गेल्या वर्षीसुद्धा आलो होतो. काय करणार? आमच्या गावात काही कामच नाहीये,” तो सांगतो. रस्त्याचं काम सुरू आहे तिथपासून एक-दोन किलोमीटरवर राजू आणि झारखंडचेच इतर नऊ जण तंबू ठोकून राहतायत. ते समुद्रसपाटीपासून १७,५८२ फूट उंचावर असलेल्या खारदुंग ला (खारदोंग गावाजवळ) आणि १०,००० फूटावरच्या नुब्रा व्हॅलीदरम्यान खिंडीतल्या रस्त्याचं काम करतायत.
लडाखचा दुर्गम आणि विराण परिसर सीमापार होत असलेला व्यापर, धार्मिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे पूर्वापारपासून फार महत्त्वाचा राहिला आहे. सध्या मात्र झारखंड, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतल्या स्थलांतरित कामगारांची वर्दळ इथे वाढायला लागली आहे. लडाखला नवीन प्रशासकीय ओळख मिळाल्यामुळे काही खाजगी विकसक इथे या परिसरात आता हातपाय पसरू लागले आहेत. या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने सीमा रस्तेबांधणी संस्थेच्या सहकार्याने वाणिज्यिक आणि सैनिकी महत्त्व असणाऱ्या प्रदेशातल्या पायाभूत सेवा-सुविधा प्रकल्पांना गती दिली आहे. आणि त्यामुळेच लडाखमध्ये स्थलांतरित कामगारांची येजा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
रस्त्याच्या कडेला, कधी कधी आपल्या कुटुंबांसोबत, किंवा अगदी ११ फूट बाय ८.५ फुटी तंबूंमध्ये तुम्हाला हे कामगार पहायला मिळतील. रस्त्याचं काम जसजसं पुढे जातं, तसं हे तंबू देखील आपला तळ हलवत जातात. प्रत्येक तंबूत भांडी-कुंडी, पिशव्या खचाखच भरलेल्या दिसतात. एका तंबूत साधारणपणे १० जण राहतात. थंड जमिनीवर रग पसरून निजतात. विजेशिवाय, कडाक्याच्या थंडीचा मुकाबला करत आणि पुरेशा संरक्षक साहित्याशिवाय शून्याच्या खाली पारा गेल्यानंतरही काकडत काम करतात.























