“स्वयंपाकघरातनं सुरुवात झाली,” अजित राघव सांगतात. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातल्या जोशीमठ गावाचे रहिवासी असलेले राघव ३ जानेवारी २०२३ च्या सकाळी काय काय घडलं ते सांगू लागतात.
टॅक्सीचालक असलेले ३७ वर्षीय राघव सांगतात की सुरुवातीला स्वयंपाकघरात मोठाल्या भेगा दिसू लागल्या आणि त्यानंतर घराच्या इतर खोल्यांमध्ये त्या पसरल्या. त्यांचं दोन मजली साधंसं घर आहे. त्यातल्या त्यात कमी नुकसान झालेल्या एका खोलीत स्वयंपाकघर हलवलं. आणि अचानक या आठ जणांच्या कुटुंबाकडे रहायलाच जागा उरली नाही.
“ऐश्वर्या [वय, १२] आणि शृष्टी [वय ९] या दोघी मोठ्या मुलींना मी माझ्या थोरल्या बहिणीकडे रहायला पाठवून दिलं. राघव, त्यांची पत्नी गौरी देवी आणि सहा वर्षांची मुलगी आयेशा आणि त्यांच्या दोन वयोवृद्ध चुलत्या आता जेवणखाणं इथे या घरात करतात. पण झोपण्यासाठी मात्र जवळच्या संस्कृत महाविद्यालय या शाळेतल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात जातात. जवळपास २५-३० विस्थापित कुटुंबं तिथे रहायला आली आहेत.”
चमोली जिल्हा प्रशासनाने २१ जानेवारी २०२३ रोजी एक माहितीपत्रिका प्रसारित केली. जोशीमठच्या नऊ वॉर्डातल्या एकूण १८१ इमारती धोकादायक असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. भेगा पडलेल्या घरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे – १९ जानेवारी – ८४९ आणि २२ जानेवारी – ८६३. राघव आपल्या आसपासच्या घरांना कशा भेगा पडल्या आहेत ते पारीला दाखवतात. “जोशीमठमधल्या प्रत्येक घराची स्वतःची एक गोष्ट आहे,” ते म्हणतात. त्यांचा इशारा अनिर्बंध विकासकामांमुळे आजची परिस्थिती उद्भवली याकडे होता.
जोशीमठमधल्या भिंती, छत आणि आणि जमिनीला भेगा पडायला सुरुवात झाली ३ जानेवारी २०२३ रोजी. आणि पुढच्या अगदी थोड्या दिवसांत परिस्थिती अतिशय गंभीर बनली. ते राहतात त्या सिंघदर वॉर्डातल्या १३९ घरांना भेगा पडलेल्या दिसतायत आणि ९८ असुरक्षित प्रदेशात आहेत. या सगळ्या घरांवर जिल्हा प्रशासनाने लाल फुली मारली आहे. इथे राहणं किंवा त्या परिसरात वावर सुरक्षित नाही.
















