७४ वर्षांचे प्रेमराम भाट सुमारे ६० वर्षांपूर्वीची आठवण सांगताना म्हणतात, “माझ्या बाबांनी या दोऱ्या माझ्या बोटांना बांधल्या आणि मला बाहुल्या कशा नाचवायच्या हे शिकवलं.”
“मी नऊ वर्षांचा असल्यापासून बाबा मला त्यांच्यासोबत वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांच्या कठपुतळ्यांच्या कार्यक्रमाला घेऊन जायचे,” ते म्हणतात. “मी तेव्हा ढोल वाजवायचो, काही दिवसांनी मलाही बाहुल्या नाचवायला आवडायला लागलं. लालूराम भाट, माझे बाबा, त्यांनी मला बाहुल्या कशा वळवायच्या हे शिकवलं, हळू हळू मलाही ते जमायला लागलं.”
प्रेमराम पश्चिम जोधपूरमधील प्रताप नगर भागात फूटपाथवर एका झोपडीत राहतात. त्यांची पत्नी सत्तरीची जुग्नीबाई, त्यांचा मुलगा सुरेश, सून सुनिता आणि त्यांची तीन ते १२ वर्षं वयोगटाची ४ नातवंडं असे सगळे एकत्र राहतात. हे कुटुंब भाट जातीत येते (ही जात राजस्थानमध्ये ओबीसी किंवा इतर मागासवर्ग प्रवर्गात मोडते). समाजातील जाणते लोक सांगतात की अनेक भाट कुटुंबं सुमारे १०० वर्षांपूर्वी राज्यातील नागौर जिल्ह्यातून स्थलांतर करून राजस्थानमधील जोधपुर, जयपूर, जैसलमेर आणि बिकानेर यांसारख्या विविधं शहरात स्थायिक झाली.
“मी बाहुल्या बनवण्याचं किंवा नाचवण्याचं कुठलेही ट्रेनिंग घेतलेले नाही, मी ही कला बाबांना बघत बघत शिकलोय,” ३९ वर्षांचे सुरेश सांगत होते. तेही आपल्या वडिलांसोबत १० वर्षांचे असल्यापासून वेगवेगळ्या गावांमध्ये बाहुल्यांचा कार्यक्रम सादर करायला जायचे व प्रेमराम यांना जमेल तेवढी मदत करायचे. घरी असताना ते बाहुल्या बनवायला मदत करायचे. “आणि १५ वर्षांचा होईपर्यंत मीसुद्धा बाहुल्यांचा खेळ व्यवस्थित शिकलो. मी एकटा गावांमध्ये जाऊन कार्यक्रम करायला लागलो,” ते सांगतात.
त्यांचा १२ वर्षांचा मुलगा मोहित आता त्यांना साथ देतो. “जेव्हा काम मिळतं तेव्हा मोहित माझ्यासोबत असतो आणि ढोल वाजवतो,” सुरेश सांगतात. “तो पाचवीत शिकतो पण सध्या [करोना लॉकडाऊनमुळे] सगळ्या शाळा बंद आहेत.”
आणि सध्या काम मिळणं अवघड झालंय. राजस्थानमधल्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहणारे विदेशी पर्यटक हेच प्रामुख्याने बाहुल्यांचा नाच बघायला येतात. त्यांचासाठी तीन जणांचा चमू तासभराचा कार्यक्रम करायचा. एक जण बाहुल्या हाताळायचा, तर बाकीचे हार्मोनियम आणि ढोलक वाजवायचे. या बाहुल्यांच्या खेळामध्ये सहसा लोकगीते आणि राजेशाही कारस्थानांचे आणि संघर्षांचे वर्णन केले जाते. (सोबतचा व्हिडिओ बघा).
हे कार्यक्रम करून प्रत्येक कलाकाराला ३०० ते ५०० रुपये मिळायचे, महिन्याभरात ३-४ वेळा असे कार्यक्रम होत होते. परंतु कार्यक्रमांची निमंत्रणे लॉकडाऊनमुळे बंद झाली, त्यामुळे हे कलाकार रस्त्याच्या शेजारी कधीतरी खेळ साजरा करून प्रत्येक खेळामागे १००-१५० रुपये कमावतात. स्ट्रॉ-वेलवेटच्या वस्तू बनवून, त्या विकून त्यांना थोडेफार पैसे मिळतात.(See Jaipur toy makers: stuck under a grass ceiling )
लॉकडाऊन दरम्यान रेशन आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी या समाजाला सेवाभावी संस्थांवर अवलंबून राहावे लागले, परंतु आता राज्यभरातील निर्बंध कमी केल्याने त्यांचे काम हळूहळू सुरू होत आहे.
जोधपुर शहराच्या प्रताप नगर भागातील फुटपाथच्या समोरच्या बाजूला ३८ वर्षीय मंजू भाट आपल्या झोपडीत राहतात, त्या घरी बाहुल्यांसाठी कपडे आणि दागिने बनवतात. त्यांचे पती, ४१ वर्षीय बनवारी लाल भाट त्याच बाहुल्यांचा खेळ साजरा करतात.
“ही कला लुप्त होत चालली आहे,” त्या चिंतीत होत म्हणतात. “आधी आम्हाला महिन्याभरात ३-४ कार्यक्रम मिळायचे पण कोरोना आल्यापासून आमचं काम बंद झालंय. फक्त सरकार या कलेला आता वाचवू शकतं. आम्ही नाही. आता मनोरंजनाची नवनवीन साधनं लोकांकडे आलीयेत, आमचे कार्यक्रम कोण बघणार?”
याशिवाय, त्यांच्या पारंपारिक कथांशी छेडछाड केली जात असल्याचे त्या म्हणतात. “आमच्याकडे खऱ्या कहाण्या आहेत. हे शिकले-सवरलेले लोकं आमच्याकडे येतात, आमच्या कहाण्या ऐकतात, त्यांना पाहिजे त्या गोष्टी ते वापरतात आणि मग टीव्ही सिरीयल, नाटकं किंवा सिनेमे बनवतात. त्यात खऱ्या गोष्टी कमी आणि खोटेपणा जास्त असतो.”
प्रेमरामसुद्धा म्हणतात की टेलिव्हिजन आणि मोबाईल फोनसारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे त्यांच्यासारख्या कलाकारांना आधी मिळणारा मान-सन्मान कमी झाला आहे. “आमचे पूर्वज राजा-महाराजांच्या दरबारात लोकांचे मनोरंजन करायचे. त्या मोबदल्यात त्यांना धान्य, पैसे आणि वेगवेगळ्या वस्तू मिळायच्या. या गोष्टींमुळे वर्षभर त्यांना कशाची गरज पडायची नाही. माझे बाबा आणि आजोबा गावागावात जाऊन लोकांचं मनोरंजन करायचे. गावकरी अजूनही आम्हाला मान देतात, पण जग बदललंय. आमच्या कलेची आता किंमत उरलेली नाहीये. ही कला आता संपत चाललीये आणि मलाही आता बाहुल्यांचा खेळ करून मजा येत नाही.
अनुवादः हृषीकेश पाटील