“हे पाणी ना काचेसारखं नितळ होतं – जेव्हा गटारं पण साफ होती – अगदी गेल्या २० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाणं टाकलं ना तर तळाला गेलेलं दिसायचं. यमुनेचं पाणी पीत होतो आम्ही,” ओंजळीत यमुनेचं गढूळ पाणी घेऊन ते तोंडापाशी नेत मच्छीमार रमण हलदर सांगतात. आमचे भयभीत चेहरे पाहून ते ओंजळीतलं पाणी तसंच बोटाच्या फटींतून सोडून देतात आणि एक सखेद हास्य त्यांच्या चेहऱ्यावर उमटतं.
पण आज यमुनेत काय दिसतं? प्लास्टिक, अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठीची अल्युमिनियमची फॉइल, गाळ, वर्तमानपत्रं, सडलेली फुलं, मलबा, चिंध्या-चपाट्या, नासकं अन्न, पाण्यावर तरंगणारे नारळ, रसायनांचा फेस आणि जलपर्णी. राजधानीच्या भौतिक आणि मिथ्या उपभोगाचं प्रतिबिंब.
राष्ट्रीय राजधानी प्रदेशातून वाहणाऱ्या यमुनेची लांबी केवळ २२ किलोमीटर (किंवा एकूण लांबीच्या केवळ १.६ टक्के) आहे. पण या १,३७६ किलोमीटर लांब नदीच्या प्रदूषणापैकी ८० टक्के प्रदूषण या छोट्याशा पट्ट्यात मिसळत असलेल्या कचऱ्यामुळे आणि विषारी घटकांमुळे होतंय. आणि याचीच दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाच्या देखरेख समितीने २०१८ साली दिल्लीतील यमुनेची संभावना ‘गटार’ अशी केली होती. या सगळ्या प्रदूषणामुळे पाण्यातील प्राणवायूची पातळी झपाट्याने कमी होते ज्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मासे मरण पावतात.
गेल्या वर्षी दिल्लीतील या नदीच्या दक्षिणेकडच्या पट्ट्यात हजारो मासे मेलेले आढळले होते. मात्र दिल्लीत हे दर वर्षी कधी ना कधी घडतच असतं.
“नदीची परिसंस्था टिकायची असेल तर पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूची पातळी ६ किंवा त्याहून जास्त पाहिजे. माशांना किमान ४-५ पातळीइतका प्राणवायू लागतो. दिल्लीतून वाहणाऱ्या यमुनेत ही पातळी ०.४ आहे,” प्रियांक हिरानी सांगतात. शिकागो विद्य़ापीठाच्या टाटा सेंटर फॉर डेव्हलपमेंटच्या वॉटर टू क्लाउड या प्रकल्पाचे ते संचालक आहेत. या प्रकल्पाअंतर्गत नद्यांच्या प्रदूषणाचं सद्यस्थितीत मापन केलं जातं.











