एकटेपणा जिगर देद यांना नवा नाही. श्रीनगरच्या दल सरोवरातल्या एका घाटावर त्या आपल्या हाउसबोटशेजारच्या लाकडी झोपडीत एकट्याच राहतात. त्यांचा नवरा वारला आणि मग त्यांचा मुलगा. त्याला आता तीस वर्षं होऊन गेली. या काळात सगळ्या हाल अपेष्टा त्यांनी एकटीनेच सहन केल्या आहेत.
तरीही, त्या म्हणतात, “गेली तीस वर्षं मी एकटीच जगतीये, पण गेल्या एका वर्षात जितके हाल सोसले तितके त्या आधी कधीच नाहीत. सगळं काही ठप्प केलं होतं, त्यानंतर जरा पर्यटक यायला लागले आणि मग हा करोना आला आणि टाळेबंदी लागली. आम्हाला सगळ्यांना जणू कैदेत टाकलंय.”
५ ऑगस्ट २०१९ रोजी सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केलं आणि त्यानंतर जी बंदी घातली गेली त्यामुळे लोकांचं अतोनात नुकसान झालंय. “तेव्हापासून एकही गिऱ्हाईक आलेलं नाही,” जिगर सांगतात. तेव्हा अधिकृत सूचना करण्यात आली होती, की स्थानिकेतर सगळ्यांनी परत जावं, अर्थातच पर्यटकही माघारी गेले. “आम्ही अक्षरश- कोलमडून गेलो,” त्या म्हणतात. “आमच्या धंद्याला जबर फटका बसला. आधीच माझं आयुष्य विस्कटून गेलं होतं, ते पुरतं मोडकळीला आलं.”
सगळं कसं विस्कटत गेलं, त्या एकाकीपणाच्या गर्तेत कशा ढकलल्या गेल्या ते सगळं त्यांना नीट आठवतंयः “माझ्या बहिणीचा साखरपुडा होता. आम्ही सगळे एकत्र जमलो होतो, सगळे खुशीत गात-नाचत होते,” ऐंशी वर्षं पार केलेल्या (त्यांच्या मते) जिगर सांगतात. “माझा नवरा, अली मोहम्मद थुल्ला, माझ्यापाशी आला आणि छातीत कळ येतीये असं सांगू लागला. आणि मग, जेव्हा मी त्याला माझ्या कुशीत घेतलं तेव्हा त्याचं शरीर गार पडत चाललं होतं... त्या क्षणी मला वाटलं जसं काही आभाळच फाटलंय.”
पन्नाशी पार केलेले अली मोहम्मद गेले आणि जिगर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा मन्झूर मागे राहिले, “दुःख सोसण्यासाठी.” मन्ना, जिगर यांच्या मुलाचं लाडाचं नाव, फक्त १७ वर्षांचा होता. चार खोल्यांची इंदूरा, त्यांची हाउसबोट त्यांच्या झोपडीपासून जवळच पुलापाशी पाण्यात गळ टाकून उभी होती.
“जेव्हा केव्हा माझा मुलगा हाउसबोटीसाठी पर्यटकांना आणण्यासाठी बाहेर पडायचा, तेव्हा तो आमच्या शेजाऱ्यांना माझ्यावर लक्ष ठेवायला सांगायचा. त्याच्या वडलांच्या आठवणीत माझा बांध फुटेल हे त्याला माहित होतं,” जिगर सांगतात. आपल्या एका खोलीच्या घरात पलंगावर बसलेल्या जिगर यांची नजर घराबाहेर जाते. त्यांचे पती आणि मुलाच्या फोटोंनी घराच्या लाकडी भिंती सजल्या आहेत.
अलीच्या जाण्याचं दुःख विरतं न विरतं तोच, सातच महिन्यांनी मन्झूरलाही काळाने हिरावून नेलं. कधी किंवा कशामुळे तो गेला हे काही जिगर यांना आठवत नाही. पण वडलांच्या जाण्याचं दुःख त्याला सहन झालं नाही असं त्यांना वाटतं.
“माझं अख्खं जगच माझ्या डोळ्यासमोर उलटं-पालटं झालं,” त्या म्हणतात. “माझ्या आयुष्यातले दोघं हिरो मला एकटीला सोडून गेले आणि मागे राहिली ती त्यांच्या आठवणींनी भरलेली ही हाउसबोट.” त्या म्हणतात, “या आठवणी मला दिवसभर छळतात. माझ्या दुखण्यांमुळे अनेक गोष्टींचं मला विस्मरण झालंय, पण या रोजरोज छळणाऱ्या स्मृती मात्र ताज्यातवान्या आहेत.”











