मी काही कवी नाही
मी आहे छायाचित्रकार.
गळ्याभोवती माळा
घुंगरं आणि डोक्यावर वेगवेगळी पागोटी
घातलेल्या तरुणांची छायाचित्रं मी टिपलीयेत
मी पाहिलेत असे तरुण
आनंदाने उत्फुल्ल
ज्या रस्त्याचे चटके खात आज परततायत
त्याच रस्त्यांनी सायकलवर रमत जाणारे.
पोटात आग
पायाखाली चटका
डोळ्यात अंगार
निखाऱ्यावर चालतायत हे सारे
पायाचे तळवे पोळून घेत.
मी छायाचित्रं टिपलीयेत लहान मुलींची
केसात फुलं माळलेल्या
आणि हसऱ्या पाणीदार डोळ्याच्या
माझ्या मुलीसारखेच
डोळे असणाऱ्या या पोरी
आणि त्याच आता पाण्यासाठी टाहो फोडतायत
डोळ्यातल्या पाण्यात
त्यांचं हसू विरघळून गेलंय का?
माझ्या घराच्या इतकं जवळ
रस्त्यात हा असा प्राण कोणी सोडलाय?
ही जामलो आहे का?
ती जामलो होती का मी पाहिलेली
हिरव्या लाल मिरचीच्या रानात
अनवाणी पायाने
मिरच्या तोडणारी, वाटणी करणारी, मोजणारी
आकडेमोड केल्यासारखी?
हे भुकेलं मूल नक्की आहे तरी कुणाचं?
कुणाचं शरीर रस्त्याच्या कडेला
विरून जिरून चाललंय?
मी बायांचे चेहरे टिपलेत
तरण्या आणि म्हाताऱ्या
डोंगरिया कोंध बाया
बंजारा बाया
डोक्यावर पितळी घडे घेऊन
नाचत जाणाऱ्या बाया
आनंदाने पावलं थिरकवत
नाचणाऱ्या बाया
पण या त्या नाहीत –
डोक्यावरच्या बोजाने
त्यांचे खांदे वाकलेत!
छे, शक्यच नाही
डोक्यावर सरपणाच्या मोळ्या घेऊन
महामार्गावर चटचट पाय टाकत जाणाऱ्या
या त्या गोंड बाया नाहीतच मुळी.
या अर्धमेल्या, भुकेल्या कुणी तरी आहेत
ज्यांच्या कंबरेवर एक किरकिरं मूल आहे,
आणि उद्याची कसलीही आशा नसणारं एक पोटात.
खरंच, त्या दिसतात
अगदी माझ्या आईसारख्या, बहिणीसारख्या
पण कुपोषित, शोषित बाया आहेत या.
मरणाची वाट पाहणाऱ्या बाया.
या काही त्या बायाच नाहीत
त्या त्यांच्यासारख्या दिसत असतील –
पण मी ज्यांची छायाचित्रं घेतली
त्या या बाया नाहीत.
मी पुरुषांची छायाचित्रं काढलीयेत ना,
न डगमगणाऱ्या, शूर पुरुषांची
धिनकियातला तो मच्छीमार आणि मजूर
मोठाल्या कंपन्यांना पळवून लावणारी
त्याची गाणी ऐकलीयेत मी.
हा मूक रुदन करणारा तोच तर नाहीये ना?
मी या तरुणाला खरंच ओळखतो का तरी?
किंवा त्या म्हाताऱ्याला?
मैलो न् मैल चालणारे
त्यांच्या पाठी लागणाऱ्या दैन्याकडे दुर्लक्ष करत
वेढून टाकणारा एकाकीपणा दूर सारत
या सगळ्या अंधःकारातून
सुटण्यासाठी कोण हा दूरवर चालत चाललाय?
डोळ्यातलं न खळणारं पाणी थोपवत
हा कष्टाने पाय रोवत कोण चाललाय?
वीटभट्टीतून सुटका करून
आपल्या घरी जायचंय ज्याला
तो हा देगू तर नाही?
मी टिपू का यांची छबी कॅमेऱ्यात?
त्यांना गाणी गायला सांगू?
नाही, मी काही कवी नाही
मी गाणी नाही लिहू शकत.
मी छायाचित्रकार आहे
पण मी ज्यांची छायाचित्रं काढतो,
ते हे लोक नाहीत.
आहेत का?