मोहम्मद घौसेउद्दीन अझीम यांच्या दुकानात एका दोरीवर रंगीत कागद, लग्नपत्रिका आणि पोस्टर टांगले आहेत. एका वाळलेल्या वेळूची कलम वापरून ते पांढऱ्या शुभ्र कागदावर उर्दूमध्ये अल्लाह लिहितात. कसलीही सुरुवात या एका शब्दानेच होते. "मी गेली २८ वर्षं कातीब म्हणून काम करतोय. मी सौदी अरेबियात काम करत होतो तेव्हा या कलेवर हुकूमत मिळवली. मी १९९६ मध्ये भारतात परतलो तेव्हा हे दुकान उघडलं," ते सांगतात.
अझीम, ४४, हैदराबाद शहराच्या अगदी मध्यभागी राहतात आणि त्यांचं दुकान चारमिनार जवळील छत्ता बाजारात जमाल मार्केट नावाच्या एका तीन मजली इमारतीत आहे. हा शहरातील सर्वांत जुन्या बाजारांपैकी एक आहे. शतकांपूर्वीच्या विशिष्ट खत्ताती (उर्दू आणि अरबी लिपीत सुलेखन) साठी नावाजलेल्या छपाईच्या दुकानांचं हे केंद्र आहे.
दख्खनच्या प्रांतात कुतुबशाहीच्या काळापासून (१५१८-१६८७) खत्तातीचा इतिहास सुरू झाल्याचं आढळतं. ऐतिहासिक दृष्ट्या तिच्यात पारंगत असलेले खत्तात अथवा कातीब लोक अरबी आणि उर्दू लिपीत कुराण कोरून ठेवत असत. यांपैकी काही हस्तलिखित कुराण हैदराबादेतील आणि आसपासच्या बऱ्याच संग्रहालयांत पाहायला मिळतात. कुतुबशाहीत शहरात बांधण्यात आलेल्या इमारतींवर देखील खत्ताती पाहायला मिळू शकते. आजकाल लोकांना खास प्रसंगांसाठी खुश खत (सुलेखन) हवी असते आणि ते पारंगत कातिबांच्या शोधात छत्ता बाजारात येत असतात. उर्दू माध्यमाच्या शाळा व मदरसे देखील कधीकधी आपली चिन्हांकनं बनवून घ्यायला इथे येतात.
अझीम यांच्या अवतीभोवती बरीच वर्दळ - कागद हाताळणारे कामगार, ओरडणारे ग्राहक, छपाई यंत्रांचा गोंगाट - असूनसुद्धा ते शांतपणे काम करत आहेत. " लोकांसाठी मला उस्ताद कातीब असलो तरी मी तर स्वतःला कलेचा उपासक मानतो," ते म्हणतात. “खत्ताती हे एक प्रकारचं व्याकरण आहे. प्रत्येक टंक अन् अक्षराचं व्याकरण ठरलेलं आहे - लांबी, रुंदी अन् खोली, टिंबा-टिंबामधील अंतर महत्त्वाचं आहे. या व्याकरणाशी तडजोड न करता तुम्ही कलम कशी फिरवता, त्यावर त्या अक्षराचं सौंदर्य अवलंबून असतं. सारं काही हाताच्या बारीक अन् लयदार हालचालीवर आहे बघा."
छत्ता बाजारातील इतर कातिबांप्रमाणेच अझीम देखील दिवसाचे आठ तास अन् आठवड्याचे सहा दिवस काम करतात. "अरबी लिपीत एकूण २१३ खत्ताती टंका आहेत. सगळ्या शिकायचं म्हटलं तर तीसेक वर्षं निघून जातील, अन् त्यांवर चोख हुकूमत मिळवायला तर उभं आयुष्य खर्ची घालावं लागेल," अझीम सांगतात. "तुम्ही या कलेसाठी अख्खं आयुष्य झोकून दिलंत, तरी कमीच."
कातीब लग्नपत्रिकेच्या एका कागदावर नक्षी काढून देण्याचे रू. २००-३०० घेतात, जी ते चपळाईने ४५ मिनिटांत काढून देतात. मग, ग्राहक जवळच्या छपाईखान्यातून तिच्या प्रती काढून आणतात. जुन्या शहरात उरलेल्या १० (त्यांच्या स्वतःच्या अंदाजानुसार) कातिबांपैकी प्रत्येकाला कामाच्या दिवशी अंदाजे १० नक्ष्यांची कामं तरी येतातच.
चारमिनार जवळील घांझी बाजारात राहणाऱ्या मुहम्मद अफजल खान, ५३, यांच्यासारख्या बऱ्याच जणांनी १९९० च्या दशकांत हे काम सोडून दिलं. "माझे वडील घौसे मुहम्मद खान हे त्यांच्या जमान्यातील उस्ताद कातीब होते," ते सांगतात. " ते शेकडो मुलांना इदारा-ए-अदाबियत-इ-उर्दू [हैदराबाद शहरातील पंजागुट्टा भागात उर्दू सुलेखन शिकण्याचं एक केंद्र] येथे शिकवायचे. आम्ही दोघंही सियासत [एक उर्दू दैनिक] मध्ये कामावर होतो. पण, संगणक आले तेंव्हा मी माझी नोकरी गमावून बसलो. मग मी जाहिरात क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. ही कला काही वर्षांत नष्ट होईल. आम्ही शेवटचे [उपासक] उरलो आहोत," त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दाटून येते.
१९९० च्या दशकाच्या मध्यावर उर्दू टंक संगणकीकृत झाले अन् ग्राहक डिजिटल छपाईकडे वळू लागले. अशाने, कातिबांना असणाऱ्या मागणीत अचानक घट झाली. सियासत सारखे वृत्तपत्र देखील डिजिटल झाले आणि ते आपल्या काही ठळक बातम्या लिहिण्यापुरते केवळ एखाद दोन कातीब उरले. बाकी कातीब आपला व्यवसाय गमावून बसले आणि काहींनी छत्ता बाजारात आपली दुकानं उघडली अन् ते पत्रिका, निशाण, पोस्टर अन् फलक यांवर सुलेखन करू लागले.
कातीब म्हणतात की ही कला जोपासण्यासाठी सरकारचा पाठिंबा नसल्याने खत्ताती ची कला दैन्यावस्थेत असून ती नष्ट होण्याची भीती आहे. शिवाय, तरुण पिढीला या कलेची आवड नाही - जे थोडे फार लोक ती शिकतात, ते अपेक्षित मेहनत पाहून हे काम सोडून देतात. अन् भविष्य धूसर असल्याने इतरांना हा वेळेचा अपव्यय वाटतो.
पण, तिशीतले मुहम्मद फाहिम आणि झैनुल आबेदिन हे दोघेही याला अपवाद आहेत. त्यांचे वडील, मुहम्मद नाईम साबरी, जे २०१८ मध्ये मरण पावले, एक निष्णात कातीब होते, तसेच अरबी आणि उर्दू सुलेखनात रंगांचा वापर करणाऱ्या सुरुवातीच्या कातिबांपैकी एक होते, असं मला त्यांच्या मुलांनी आणि छत्ता बाजारातील इतरांनी सांगितलं. त्यांनी हे दुकान सुरू केलं, जे आता त्यांची मुलं चालवतात - आणि अरबी व उर्दू व्यतिरिक्त ते इंग्रजी सुलेखनात देखील पारंगत झाले आहेत. या भावंडांचे कुवैत, सौदी अरेबिया सारख्या देशात गिर्हाइक आहेत. त्यांच्याकरिता ते प्रसंगी सुलेखन केलेल्या मोठ्या तस्विरी बनवतात.
कामाचा दिवस जसजसा कलायला लागतो तसं छत्ता बाजारातील कातीब आपल्या कलम गोळा करून नीट रचून ठेवतात. दौती बाजूला सारतात आणि घरी निघण्यापूर्वी नमाज पढतात. मी अझीम यांना ही कला नष्ट होईल का असं विचारता ते सावध होऊन म्हणतात, "असं म्हणू नका! कष्ट पडले तरी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही हे काम चालूच ठेवू." त्यांच्या दुकानातील भिंतीवर लावलेलं, त्यांच्याच कामासंबंधीचं एक वृत्तपत्राचं कात्रण जीर्ण शीर्ण होत चाललंय. त्यांच्या कलेसारखंच.
या लेखाची एक आवृत्ती ' यू ओ एच डिस्पॅच ' या हैदराबाद विद्यापीठाच्या मासिकात एप्रिल , २०१९ मध्ये प्रकाशित झाली आहे .
अनुवादः कौशल काळू