२०११ ची गोष्ट आहे. माझ्यासमोर बसलेल्या सगळ्यांना मी सांगत होतो - तुमच्या या विद्यापीठाची इमारत ज्या जागेवर उभी राहणार आहे त्यामध्ये अशा एका गावाची जमीन गेली आहे जिथल्या रहिवाशांना आजवर अनेकदा विस्थापित व्हावं लागलं आहे. आता यामध्ये तुमचा काही दोष नाही किंवा यासाठी तुम्ही जबाबदार नसलात तरी या एका गोष्टीबद्दल तुम्ही कायम त्यांचे ऋणी रहा.
आणि त्यांना या गोष्टीची जाणीवही होती. खरं तर हे ऐकल्यावर त्यांना तसा धक्काच बसला होता. त्यांना म्हणजे कोरापुटच्या सेंट्रल युनिवर्सिटी ऑफ ओडिशाच्या विद्यार्थ्यांना. त्यातले बहुतेक पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाचे विद्यार्थी होते. आणि चिकापार गावाची ती गोष्ट ऐकून ते हबकून गेले होते. हे गाव तब्बल तीन वेळा असंच उठवण्यात आलं होतं. आणि दर वेळी कारण होतं – ‘विकास’.
माझं मन थेट १९९३-१९९४ च्या काळात जाऊन पोचलं. गदबा (उच्चार - गोदोबा) आदिवासी असलेल्या मुक्ता कोदोम (शीर्षक छायाचित्रात आपल्या नातीसोबत), मला १९६० च्या दशकात अचानक मुसळधार पावसात रात्रीच त्यांना गावातून कसं बाहेर काढलं होतं त्याची कहाणी सांगत होत्या. त्यांच्यापुढे त्यांची पाचही मुलं, सगळ्यांच्या डोक्यावर बोचकी. वरून धो धो पाऊस आणि किर्र अंधारात मुक्तांनी जंगलातून वाट काढली होती. “कुठं जायचं आम्हाला काहीही माहित नव्हतं. साहेब लोकांनी सांगितलं म्हणून आम्ही गाव सोडलं. भयंकर होतं सगळं.”
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) लढाऊ मिग विमानांचा कारखान्यासाठी त्यांना गाव सोडावं लागलं होतं. हा प्रकल्प ओडिशात प्रत्यक्षात अवतरलाच नाही. तरीही मूळ रहिवाशांना त्यांची जमीन काही परत मिळाली नाही. आणि नुकसान भरपाई? “माझ्या कुटुंबाच्या मालकीची ६० एकर जमीन होती,” ज्योतिर्मोय खोरा सांगतात. दलित असणाऱ्या खोरांनी पुढची अनेक दशकं चिकापारच्या विस्थापितांसाठी मोठा संघर्ष केला. “अनेकानेक वर्षांनंतर आम्हाला मोबदला मिळाला. आमच्या ६० एकर जमिनीसाठी [एकूण] भरपाई मिळाली १५,००० रुपये.” विस्थापित रहिवाशांनी नव्याने त्यांचं गाव वसवलं. आपल्या मूळ गावाच्या रम्य आठवणी मनात ठेवत त्यांनी नव्या गावाचं नावही चिकापारच ठेवलं.




