वर्गातला एकुलता एक विद्यार्थी – अवचित म्हात्रेला ते अगदी सवयीचं होऊन गेलं होतं. पण आपण अख्ख्या शाळेतला एकमेव विद्यार्थी ठरू हे जरा त्याच्यासाठी नवीनच होतं.
गेल्या वर्षी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता १२ वर्षांचा अवचित शाळेत आला. कोविड-१९ मुळे १८ महिने शाळा बंद होती. त्यानंतर पहिल्यांदाच तो शाळेत येत होता. तिन्ही वर्ग रिकामे. फक्त त्याचे एक शिक्षक त्याची वाट पाहत होते. शेजारच्या खुर्चीत महात्मा गांधींची तसबीर ठेवलेली होती.
२०१५ साली अवचित इयत्ता पहिलीत या शाळेत आला तेव्हापासून त्याच्या वर्गात दुसरा एकही विद्यार्थी नव्हता. “फक्त मीच होतो,” तो म्हणतो. आणि या शाळेचा अखेरचा विद्यार्थी देखील तोच आहे. अगदी अलिकडेपर्यंत शाळेत २५ विद्यार्थी होते. घारापुरी गावाच्या मोराबंदर, राजबंदर आणि शेतबंदर या तीन पाड्यांवरून ही मुलं शाळेत यायची. तिन्ही पाड्यांवर मिळून १,१०० लोकांची वस्ती आहे. घारापुरी बेटं मुंबईजवळचं सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहेत. एलिफंटा केव्ह्ज म्हणून ओळखलं जाणारं हे बेट रायगड जिल्ह्यात येतं. दक्षिण मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया पासून बोटीने एक तासाच्या अंतरावर.
सुमारे दहा वर्षांपूर्वीपर्यंत अवचित जातो त्या जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळेत ५५-६० विद्यार्थी होते. पण हळू हळू ही संख्या कमी व्हायला लागली. आणि २०१९ साली फक्त १३ विद्यार्थी उरले. मार्च २०२० पर्यंत हाच आकडा ७ वर आला. आणि २०२०-२१ शैक्षणिक वर्षामध्ये तीन जणांची सातवी पूर्ण झाली, दोन विद्यार्थी वेगळीकडे गेले त्यामुळे शाळेत दोघंच उरले – इयत्ता सहावीतला अवचित आणि इयत्ता सातवीतली गौरी म्हात्रे. “इथे अभ्यास नीट होत नव्हता,” ती म्हणते, “त्यामुळे सगळे शाळा सोडायला लागले.”


















