११ डिसेंबरच्या सकाळी सगळ्यांनी विजेच्या वायर काढून घ्यायला सुरुवात केली तेव्हा शेजारचा एक दुकानदार हमसून रडायला लागला. “आता आम्ही इथे नाही तर त्याला सुनंसुनं वाटेल असं तो म्हणत होता. आम्हाला सुद्धा थोडं जड जाणार आहे. पण शेतकऱ्यांचा हा विजय या सगळ्याहूनच फार मोठा आहे,” गुरविंदर सिंग सांगतात.
सकाळचे ८.१५ वाजलेत. गुरविंदर आणि त्याच्या गावातले शेतकरी दिल्लीच्या पश्चिमेकडे असलेल्या टिक्री इथल्या आंदोलन स्थळावरचे आपले तात्पुरते निवारे आणि घरं उतरवायला लागलेत. गरज पडली तर लाकडाच्या दांडक्याने बांबूचा सांगाडा मोडला जातोय आणि खालच्या फळ्या मोडण्यासाठी विटांचा वापर केला जातोय. २० मिनिटात सगळं मोडून एक मोठा ढीग तयार झाला. चहा आणि भजी खाण्यासाठी ते जरासे थांबले.
“आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने ही घरं उभारली होती आणि आता आमच्याच हाताने ती मोडून जाणार आहोत,” ३४ वर्षीय गुरविंदर सांगतात. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातल्या दांगियाँ गावात त्याच्या कुटुंबाची सहा एकर शेती आहे ज्यात गहू, भात आणि बटाट्याची शेती केली जाते. “विजयी होऊन घरी जायचं म्हणून आम्ही एकीकडे खूश असलो तरी इथे ज्यांना जीव लावला त्यांना सोडून जाणंसुद्धा जिवावर येतंय.”
“आम्ही आलो तेव्हा, आंदोलन सुरू होण्याआधी इथे काहीही नव्हतं. आम्ही सगळे रस्त्यावर झोपायचो. त्यानंतर आम्ही हे घर बांधलं,” ३५ वर्षीय दीदार सिंग सांगतात. ते देखील लुधियानाच्या दांगियाँ गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या सात एकर रानात ते गहू, तांदूळ, बटाटा आणि भाजीपाला करतात. “आम्हाला इथे खूप काही शिकायला मिळालंय. खास करून इथे सगळ्यांसोबत राहताना जाणवलेला बंधुभाव. सगळी सरकारं केवळ भांडणं लावून देण्याचं काम करतात. पण जेव्हा पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातले आम्ही सगळे इथे एकत्र आलो तेव्हा आम्हाला हे कळून चुकलं की आम्ही सगळे शेवटी एकच आहोत.”
“पंजाबात आता निवडणुका आहेत आणि आम्ही योग्य व्यक्तीलाच मत देणार आहोत,” गुरविंदर सांगतात. “आमचा हात धरून आधार देणाऱ्यालाच आम्ही मत देऊ. आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या कुणालाही आम्ही सत्तेत येऊ देणार नाही,” दीदार म्हणतात.

































