“मी मेलो तरी चालेल, पण आपल्याला बिल परवडायचं नाही,” मृत्यूच्या दोनच दिवस आधी हरीश्चंद्र ढावरे आपली पत्नी जयश्री यांना म्हणाले होते. पत्रकार असलेल्या ४८ वर्षीय ढावरेंची तब्येत ढासळत चालली होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
पण तशा परिस्थितीतही त्यांना स्वतःच्या आयुष्याची काळजी नव्हती. त्यांना घोर होता हॉस्पिटलच्या बिलाचा. “त्यांनी माझ्याशी भांडण केलं आणि मग ढसाढसा रडायला लागले,” ३८ वर्षीय जयश्री सांगतात. “घरी नेण्याचा त्यांनी हट्ट धरला होता.”
मार्च २०२१ मध्ये ढावरेंना करोनाची लागण झाली. वीस वर्षांची पत्रकारिता काही कामी आली नाही. उलट त्यांच्या कामामुळे त्यांची जोखीम जास्त वाढली.
२००१ सालापासून ढावरे उस्मानाबादच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांसोबत काम करत होते. त्यांची शेवटची नोकरी होती राजधर्म या मराठी दैनिकात. “कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेबद्दलच्या ते बातम्या देत होते. पत्रकार परिषदा असायच्या आणि ते सतत बाहेर असायचे,” जयश्री सांगतात. “दर वेळी ते घरातून बाहेर जायला निघाले की आम्हाला घोर लागायचा. त्यांची शुगर आणि बीपी जास्त होतं. पण त्यांचं एकच म्हणणं असायचं, ‘माझं काम मला करायलाच पाहिजे’.”
२२ मार्च रोजी ढावरेंना कोविडची लक्षणं जाणवायला लागली – अंगदुखी आणि ताप. “तब्येतीत फरक पडेना तेव्हा आम्ही त्यांना सिव्हिलमध्ये घेऊन गेलो,” जयश्री सांगतात. त्यांना कोविड झाल्याचं चाचणीतून कळाल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. “तिथे फार काही चांगल्या सुविधा नव्हत्या आणि त्यांची तब्येत हवी तशी सुधारत नव्हती,” त्या पुढे सांगतात. म्हणून, ३१ मार्च रोजी ढावरेंच्या घरच्यांनी त्यांना ६० किलोमीटरवर सोलापूरच्या एका खाजगी दवाखान्यात दाखल करायचं ठरवलं.
तिथे सहा दिवस राहिल्यानंतर ६ एप्रिल रोजी सकाळी ढावरेंचा मृत्यू झाला.









