सोहन सिंग टिटांच्या शब्दकोषात भीती हा शब्द नाहीच. त्यांनी आजवर अनेकांचे जीव वाचवले आहेत. जमिनीवर किंवा पाण्याखाली. भुले चाक गावातल्या रस्त्यांवर किंवा आसपास नेहमी दिसणारं एक दृश्य म्हणजे धूर आणि धुळीच्या लोटातून आपल्या मोटरसायकलवर ताजी, पौष्टिक भाजी विकायला येणारे टिटा. देवदेवतांभोवती असतं तसं वलय असतं त्यांच्या भोवती. त्यांची खरी ओळख मात्र वेगळीच. पाण्याच सूर मारायचं त्यांचं कसब. पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातल्या आपल्या गावाच्या आसपासच्या कालव्यांमध्ये उडी घेत ते लोकांना सुखरूप काठावर आणतात.
“लोकांना बुडण्यापासून वाचवणं हे काही माझं काम नाही. पण मी ते करतो,” ४२ वर्षीय सोहन सांगतात. गेली २० वर्षं ते नेमाने हे काम करतायत. “तुम्हाला वाटतं, ‘पाणी म्हणजे जीवन’. पण मी किमान हजारदा हेच पाणी जीवघेणं ठरताना पाहिलंय,” टिटा सांगतात. आजवर, इतक्या वर्षांत पाण्यातून किती मृतदेह बाहेर काढलेत त्यासंबंधी ते बोलत असतात.
गुरदासपूर आणि शेजारच्या पठाणकोट जिल्ह्यात कुणी जर कालव्यात पडलं तर सुटका करण्यासाठी किंवा पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पहिला फोन टिटांनाच जातो. ही व्यक्ती अपघाताने पडली की जीव देण्यासाठी, या भानगडीत आपण पडत नाही असं सांगत टिटा म्हणतात, “कुणी तरी पाण्यात पडलंय असं कळताक्षणी मी आधी पाण्यात उडी टाकतो. शक्यतो माणूस जिवंत हाती लागावा हीच इच्छा असते.” जर का जीव गेला असेल तर, “नातेवाइकांना किमान शेवटी एकदा चेहरा तरी पाहता यावा असं वाटतं,” ते अगदी निश्चल आवाजात सांगत असले तरी हजार मृत्यूंचं दुःख त्यांच्या आवाजात दाटलेलं असतं.
टिटा दर महिन्याला कालव्यातून किमान २-३ मृतदेह बाहेर काढतात. या सगळ्याचं त्यांचं एक तत्त्वज्ञान आहे. “आयुष्य हे वावटळीसारखं आहे,” ते मला सांगतात. “एक चक्र आहे. संपतं त्याच क्षणी सुरू होतं.”









