या गावाला मोठा इतिहास लाभलेला आहे. निम्मा नायडू या सतराव्या शतकातील राज्यकर्त्याच्या नावावरुन तेलंगणातल्या अदिलाबादमधल्या या गावास निर्मल हे नाव पडले. नायडू यास कला व खेळणी यांमध्ये प्रचंड रस होता. त्या काळी त्याने ८० कारागिरांना एकत्र आणून खेळण्यांचा हा उद्योग सुरू केला. पुढे जाऊन याच उद्योगाने निर्मलला सांस्कृतिक महत्त्व प्राप्त करुन दिले.
... आणि आज, अदिलाबादला जाणाऱ्या किंवा जवळच असलेल्या कुंटाला धबधब्यास भेट देणाऱ्या प्रत्येक वाटसरुचं हे आवर्जून थांबण्याचं ठिकाण झालं आहे. पण बऱ्याचशा लोकांना हे माहित नाही की, शतकानुशतके जुनी लाकडी खेळणी बनविण्याची कला या गावात अजूनही जिवंत आहे. एक लाखांपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या केवळ ४० कुटुंबं या व्यवसायात आज शिल्लक राहिली आहेत.
वनस्पती आणि प्राण्यांच्या रुपातच खेळणी बनविणे, हे इथल्या कारागिरांचं वैशिष्ट्य. नैसर्गिक लाकूड वापरण्याबरोबरच, खेळणे तंतोतंत होण्यासाठी ते खेळण्याच्या आकाराचा व ठेवणीचा बारीक अभ्यास करतात. मग ते प्राणी असोत किंवा फळं.
कलानगर असं समर्पक नाव असलेल्या एका कॉलनीत हे सर्व कारागीर राहतात. खेळण्यांच्या कारखान्याच्या लागलीच पाठीमागे ही कॉलनी आहे. या कारखान्यात काम करणारा एक निष्णात कारागीर म्हणजे नामापल्ली लिंबय्या. स्वत: कलाकार असलेल्या वडिलांकडून हा कलेचा वारसा आपल्याला कसा मिळाला, हे त अभिमानाने सांगतो. “मी जन्माला आल्यापासून ही कला पाहतोय, जगतोय आणि शिकतोय. माझ्यात ही कला सहजच आलेली आहे. पण आता ही गोष्ट आत्मसात करून घेणं अवघड आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की मी आता हे शिकेन, तर नाही... ते शक्य नाही. तुम्हाला या कलेसोबत जगावं लागतं.”
लिंबय्या थकलेला दिसत होता, पण पॉलिश करणारा त्याचा हात अखंड सुरुच चालूच होता. पोनिकी चेक्का (पोनिकी झाडाचे हे लाकूड असते) नावाचे विशिष्ट लाकूड ही खेळणी बनविण्यासाठी वापरले जाते. ही खेळणी कधीच खराब होणार नाहीत किंवा तुटणार नाहीत, हे तो ठामपणे सांगतो. त्यानंतर ‘लप्पम’ नावाचा डिंकासारखा दिसणारा पदार्थ दाखवत तो म्हणतो की, याचा उपयोग खेळणं चमकविण्यासोबतच ते मजबूत करण्यासाठी देखील होतो. चिंचोके कुटून त्याची खळ करुन लप्पम बनविले जाते.
काही दशकांपूर्वी निर्मलमधील या कारागिरांनी एकत्र येऊन एक सोसायटी स्थापन केली. या माध्यमातून त्यांनी सरकारने दिलेल्या जमिनीवर आपले एक वर्कशॉप सुरु केले. कोणत्या प्रकारची आणि किती खेळणी बनविली यावरुन लिंबय्याला महिन्याकाठी कारखान्यातील कारागीर म्हणून सहा ते सात हजार रुपयांच्या दरम्यान पैसे मिळतात.
हातातील हरणाचे खेळणे बाजूला ठेवत त्याने सुस्कारा सोडला व तो सांगू लागला, “आता हे अवघड होत चाललंय. आम्हाला कच्चा माल मिळत नाहीये. हे लाकूड शोधण्यासाठी जंगलात आतपर्यंत जावं लागतं. आता कष्ट वाढले म्हणून जर आम्ही किंमती वाढवल्या, तर कोणीच ही खेळणी विकत घेणार नाही. वारसा म्हणून माझ्या मुलांना मी ही कला शिकवेन, पण ही गोष्ट त्याने व्यवसाय म्हणून पुढे न्यावी असं मला वाटत नाही. त्यांनी शिकावं आणि शहरात जाऊन नोकरी करावी एवढीच माझी अपेक्षा आहे. मला त्यांच्या भविष्याची चिंता वाटते.”
निर्मलच्या जंगलात सापडणाऱ्या पोनिकीच्या झाडाचे लाकूड नरम असते. पूर्वी जंगलात ही झाडं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे त्यांचं वेगळं वृक्षारोपण करण्याची गरज भासली नव्हती. सध्याचा गंभीर तुटवडा, आणि जंगलात वाढत चाललेल्या निर्बंधांमुळे बरेचसे कारागीर हा व्यवसाय सोडू लागले आहेत. त्यांना यात फारसे भविष्य दिसत नाही.
तिथला आणखी एक कारागीर म्हणतो की, दु:ख तर मागच्या कॉलनीत राहणाऱ्या त्या म्हाताऱ्या बायांचं आहे ज्यांचं पोट या कामावर अवलंबून आहे. कारखान्यातील पुरुष लाकूड गोळा करुन आणतात व म्हाताऱ्या बाया कापून, कोरुन त्याची खेळणी बनवितात. हे सर्व त्या कोणत्याही अद्ययावत साधन किंवा यंत्राशिवाय करतात.
मागच्या कॉलनीतील रहिवासी, बूसानी लक्ष्मी यांनी सांगितलं की बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं आणि त्यांना मुलंही नाहीत. कोणाचाच आधार नसल्यामुळे त्यांच्याकडे काहीच पर्याय नाही. लग्न झाल्यापासून ही खेळणी बनविण्यासाठी त्या आपल्या पतीला मदत करत होत्या. आणि त्यांना एवढं एकच काम करता येतं.
“कधी कधी हे खूप अवघड होऊन बसतं. लाकूड दुर्मिळ झाल्यामुळे कारखाना पहिल्यांदा आपली गरज भागवितो व त्यानंतर काही शिल्लक राहिलंच तर आम्हाला पाठवितो. आम्हाला प्रत्येक खेळण्यामागे साधारण वीस रुपये मिळतात, त्यातच मी माझ्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करते,” त्या सांगतात. सिताफळाच्या आकाराची खेळणी वाळविण्यासाठी अंगणात बसलेल्या असताना त्यांनी त्यांची कैफियत सांगितली. आठवड्याला साधारण पन्नास खेळणी त्या बनवितात, त्यामुळे महिन्याकाठी त्यांना केवळ चार हजार रुपयेच मिळतात.
लक्ष्मीबाईंना केवळ लाकूड हवं आहे. हे लाकू़ड मिळत राहील तोवर त्यांची उपजीविका चालेल, “ज्या दिवशी लाकूड यायचं थांबलं, मीही थांबले,” त्या हसून सांगतात.
अनुवादः आकाश गुळाणकर