पूर्व घाटातील खडतर डोंगररांगांआड सूर्य अस्ताला जात असताना शेजारच्या रानातील पहाडी मैनेची कर्कश शीळ निमलष्करी जवानांच्या बुटांच्या भारदस्त आवाजाखाली चिरडली जाते. ते आज पुन्हा इथल्या गावांमध्ये गस्त घालताहेत. तिला सर्वात जास्त भीती वाटते ती रात्री.
आपलं नाव देमती का ठेवण्यात आलं ते तिला ठाऊक नाही. "ती आपल्या गावातली एक धीट बाई होती, जिनं एकटीनं इंग्रज सैनिकांना पळवून लावलं," आई उत्साहानं तिची कहाणी सांगायची. ती मात्र देमतीसारखी अजिबात नव्हती – ती भित्री होती.
आणि ती जगायला शिकली होती, पोटदुखी, उपासमार सहन करत, साशंक आणि घातक नजरेखाली रोजची जेरबंदी, अत्याचार, लोकांचं मरण वगैरे पाहत, पैशा-पाण्याविना घरात राहून दिवस काढायला. पण या सगळ्यात तिच्या बाजूने होतं ते हे जंगल, त्यातील वृक्ष आणि एक झरा. तिला साल वृक्षाच्या फुलांमध्ये आपल्या आईचा गंध यायचा, रानात आजीच्या गाण्यांचे पडसाद ऐकू यायचे. त्यांची साथ आहे तोवर आपण सगळ्या संकटांचा मुकाबला करू, हे तिला माहीत होतं.
पण आता जोवर तिला माहित असलेल्या गोष्टींचा पुरावा म्हणून ती एखादा कागद दाखवणार नाही, तोवर त्यांना ती येथून बाहेर हवी होती – तिच्या झोपडीतून, तिच्या गावातून, तिच्या मातीतून. तिच्या वडिलांनी तिला औषधी गुण असणाऱ्या विविध झाडाझुडपांची, खोडांची आणि पानांची नावं सांगितली होती, एवढं पुरेसं नव्हतं. ती आपल्या आईबरोबर फळं, मेवा आणि सरपण गोळा करायला जायची तेव्हा दरवेळी आई ज्या झाडाखाली तिचा जन्म झाला, ते तिला दाखवायची. तिच्या आजीने तिला रानाबद्दलची गाणी शिकवली होती. या जागेभोवती पक्षी पाहत, त्यांच्या हाकेला ओ देत ती आपल्या भावासह बागडली होती.
पण असलं ज्ञान, या कहाण्या, ही गाणी आणि लहानपणीचे खेळ कुठल्या गोष्टीचा पुरावा ठरू शकतील का? ती आपल्या नावाचा अर्थ शोधत आणि जिच्या नावावरून ते ठेवण्यात आलं, त्या महिलेचा विचार करत बसून राहिली. ती या जंगलाचा भाग आहे, हे देमतीने कसं काय सिद्ध केलं असतं?



