गणेश आणि अरुण मुकणे अनुक्रमे ९ वीत आणि ७ वीत जायला पाहिजे होती. पण त्या ऐवजी ही मुलं मुंबईच्या वेशीवर ठाणे जिल्ह्याच्या कोळोशी या पाड्यावर इकडे तिकडे भटकतायत. जे काही भंगार, टाकाऊ सापडेल त्यापासून गाड्या किंवा नवीन गोष्टी तयार करून खेळत असतात. आई-वडील वीटभट्टीवर कामाला जातात तेव्हा नुसते तिथे आसपास बसून असतात.
“ही मुलं आता पूर्वीसारखी हातात पुस्तक धरून अभ्यास पण करत नाहीत. हा छोटा मुलगा तर दिवसभर नुसता टाकलेल्या वस्तूपासून, लाकडापासून नवीन गोष्टी तयार करून खेळत असतो. त्याचा अख्खा दिवस जातो त्याच्यात,” दोघांची आई नीरा मुकणे सांगते. तिला मध्येच थांबवत अरुण म्हणतो, “किती वेळा सांगू तुला की मला आता कंटाळा येतो शाळेचा?” या वादाचा शेवट म्हणजे अरूण तिथून उठून जातो आणि नुकत्याच तयार केलेल्या गाडीवर बसून खेळू लागतो.
२६ वर्षींच्या नीरा मुकणेचं सातवीपर्यंत शिक्षण झालंय पण तिचा नवरा ३५ वर्षीय विष्णू याने मात्र दुसरीत असतानाच शाळा सोडली. मुकणे पती-पत्नी दोघांचंही ठाम मत आहे की दोन्ही मुलांनी शाळेत जाऊन चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. नाही तर त्यांच्या समोरही आपल्याप्रमाणे मासेमारी किंवा वीटभट्टीवर मजुरी एवढे दोनच पर्याय राहतील हे त्यांना माहित आहे. या भागातले अनेक आदिवासी शहापूर-कल्याण भागातल्या वीटभट्ट्यांवर कामाला जातात.
“मला जास्त शिक्षण घेता आलं नाही. पण माझ्या पोरांनी चांगलं शिकायला पाहिजे,” कातकरी समाजाचा विष्णु मुकणे सांगतो. कातकरी जमातीचा समावेश विशेष बिकट स्थितीत असणाऱ्या आदिवासी समूहांमध्ये केला जातो. महाराष्ट्रात या गटात मोडणाऱ्या तीन जमाती आहेत. कातकऱ्यांमध्ये शिक्षणाचं प्रमाण ४१ टक्के असल्याचा राज्य आदिवासी विभागाचा एक अहवाल सांगतो.
चार वर्षांपूर्वी गावातली सरकारी शाळा पट कमी असल्याने बंद होणार अशी चर्चा सुरू झाल्यावर विष्णू आणि नीरा यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना मढ गावातल्या सरकारी माध्यमिक आश्रम शाळेत घालायचं ठरवलंय (गावात या शाळेला मढ आश्रम शाळा म्हणतात). ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडपासून ३० किलोमीटरवर असलेल्या या निवासी शाळेत पहिली ते बारावीची मुलं शिकतात. पटावरच्या एकूण ३७९ विद्यार्थ्यांपैकी १२५ मुलं निवासी होते. “तिथे शाळेत त्यांना जेवण भेटत होतं, शिकत होते दोघं म्हणून आम्ही खूश होतो. पण त्यांच्याशिवाय आम्हाला करमत नव्हतं,” विष्णू सांगतो.







