मोठी शहरं सोडून निघालेल्या स्थलांतरित कामगारांची दृश्यं माध्यमांमध्ये पहायला मिळतायक, पण छोट्या नगरांमधले आणि काही अगदी छोट्या गावांमधले वार्ताहर मोठ्या कष्टाने या परतून येणाऱ्या कामगारांचे काय हाल होतायत ते जगासमोर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. प्रचंड मोठं अंतर पायी कापणाऱ्या या स्थलांतरित कामगारांना भेटणाऱ्या आणि त्यांच्या कष्टांचं वार्तांकन करणाऱ्यांपैकी एक आहेत बिलासपूरचे ज्येष्ठ छायाचित्रकार-पत्रकार सत्यप्रकाश पांडे. या लेखातल्या त्यांच्या छायाचित्रांमध्ये छत्तीसगडच्या रायपूरमधून झारखंड राज्याच्या गढवा जिल्ह्यातल्या विविध गावांकडे निघालेल्या सुमारे ५० कामगारांचा हा गट तुम्हाला पहायला मिळेल.
रायपूर आणि गढवामधलं अंतर आहे ५३८ किलोमीटर.
“ते पायी निघाले होते,” पांडे सांगतात. “मागच्या २-३ दिवसांत त्यांनी १३० किलोमीटर अंतर (रायपूर ते बिलासपूर) पारसुद्धा केलं होतं. आणि पुढच्या २-३ दिवसांत ते आपल्या मुक्कामी पोचतील याची त्यांना खात्री असल्यासारखं त्यांच्या बोलण्यावरून तरी वाटत होतं.” (सत्यप्रकाश यांनी टाकलेल्या फेसबुकवरच्या पोस्टमुळे त्यांचे हे हाल काही कार्यकर्त्यांना समजले आणि त्यांनी जिल्हा प्रशासनाला किमान अंबिकापूरपासून पुढे त्यांची प्रवासाची सोय करण्याची विनंती केली. घरी जायचं यावर ते ठाम होते, मग पायी जावं लागलं तरी हरकत नाही).
आपल्या गावी परतणाऱ्या या गटातला एक कामगार, रफीक मियाँ म्हणतो, “गरिबी म्हणजे या देशातलं पाप आहे, सर.”
शीर्षक छायाचित्रः सत्यप्रकाश पांडे बिलासपूर-स्थिक ज्येष्ठ पत्रकार आणि वन्यजीव छायाचित्रकार आहेत.
अनुवादः मेधा काळे