“एका वर्षात मी किती सुऱ्या विकतो?” कोटागिरी शहरातल्या एका गल्लीत आपल्या लोखंडी पत्रा टाकलेल्या छोट्याशा भट्टीत बसून मोहना रंगम विचारतात. “चहाच्या पानांसाठी त्यांना छोट्या पत्त्या लागतात. मोठे हाताने चालवायचे नांगर आणि लोखंडी फाळ शेतीसाठी. पण आजकाल शेती कमी आणि चहाचे मळे जास्त झालेत. कधी कधी तर मी इथे येतो आणि काहीही काम नसतं...”
रंगन, वय ४४ कोटा जमातीच्या शेवटच्या काही कोल्लेल किंवा लोहारांपैकी एक आहेत. ते तमिळ नाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातल्या पुड्डू कोटागिरी या छोट्या पाड्यावर राहातात, कोटागिरीपासून अगदी काही किलोमीटररवर. “मी गेली २७ वर्षं हे काम करतोय आणि माझ्या आधी माझा बाप, माझा आजा आणि त्यांच्या वाडवडलांनी हेच काम केलंय,” ते म्हणतात. “आमच्या घरात हेच काम केलं जातं, किती पिढ्यांपासून ते काही मला माहित नाही.”
मात्र गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू असलेलं हे काम गेल्या काही काळात - १९७१ – २००८ (या वर्षानंतर आकडेवारी उपलब्ध नाही) - चहाच्या मळ्यांचा विस्तार वाढायला लागल्यामुळे लयाला चाललंय. भारतीय चहा संघाच्या माहितीनुसार चहाखालचं क्षेत्र २२,६५१ हेक्टरवरून ६६,१५६ वर गेलं आहे. परिणामी लोहारांच्या व्यवसायाला उतरती कळा लागू लागली.
गिऱ्हाईक नसताना असं किती दिवस धकणार हा प्रश्न रंगन यांच्या काळजाला पीळ पाडतो. “मला लोहाराचं काम माहितीये. आम्ही कोटा लोक हेच कायम करत आलोय. पण आता काळ बदललाय आणि दुसरं काही काम मिळालं तर माझा मुलगा ते करेल.” त्यांचा मुलगा वायगुंड १० वर्षांचा आहे आणि मुलगी अन्नपूर्णी १३ वर्षांची. त्यांची बायको पुजारी आहे. रंगन स्वतः पुजारी आहेत आणि अगदी त्यांच्या भट्टीत काम करत असतानाही त्यांना त्यांचा पारंपरिक कोटा वेश परिधान करावा लागतो.
रंगन ३० वेगवेगळ्या प्रकारचे सुरे-कोयते बनवू शकतात. सुरे, फाळ आणि इतर कापणीची अवजारं. त्यांचं गिऱ्हाईक म्हणजे चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे शेतमजूर, शेतकरी, झाडं तोडणारे आणि काही खाटीक आणि माळी. “एकदा का पाऊस आला की मला बाजाराच्या दिवशी [रविवार आणि सोमवार] काम सांगून येतं. माझी अवजारं जमीन सपाट करायला, तणणी, चहाच्या इतर झाडांच्या छाटणीसाठी वापरली जातात. जून ते डिसेंबर मी महिन्याला सुमारे १२,००० रुपयांची कमाई करू शकतो. नंतर मात्र वर्षभर त्याच्या तिनातला एक हिस्सा देखील मिळत नाहीत. मग मात्र सगळं भागवणं अवघड होऊन जातं.”
खर्चात कपात व्हावी म्हणून रंगन यांनी भट्टीला हवा देण्यासाठी हाताने वापरता येईल अशी पुली तयार केली आहे. “भट्टीत लोखंड वितळवण्यासाठी निखारे फुलवायला एका माणसाला फक्त भाता मारण्याचं काम करावं लागतं. मी सायकलच्या चाकाचा पुलीसारखा वापर करून एक हवा सोडणारा झोत तयार केला आहे. त्यामुळे आता मी एका हाताने हवा मारू शकतो आणि दुसऱ्या हाताने लोखंड नीट गरम करू शकतो.”
चहाच्या मळ्यांचा विस्तार वाढू लागल्याने पिढ्या न पिढ्या चालू असणाऱ्या या कामाला उतरती कळा लागली आहे – २००८ पर्यंत नीलगिरीतलं चहाखालचं क्षेत्र तिपटीहून अधिक वाढलं आहे
त्यांनी हा शोध लावला नसता तर त्यांना हाताखाली एक माणूस कामाला ठेवायला लागला असता. गावातले बहुतेक मजूर चहाच्या मळ्यांमध्ये कामाला जातात शिवाय त्यांना तिकडे मिळणारा ५०० रुपये रोज देणं काही रंगन यांना परवडण्यासारखं नाही.
अनुसूचित जमात म्हणून नोंद असणारे कोटा नीलगिरीचे पारंपरिक कारागीर आहेत. विणकर आहेत, कुंभार, लोहार, सोनार, सुतार, गवंडी, टोपल्या विणणारे आणि चामड्याचं काम करणारे असे अनेक कारागीर या समुदायात आहेत. “जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आम्ही जे काही लागतं ते पुरवू शकतो, आमच्या स्वतःच्या गरजा आणि नीलगिरीतल्या दुसऱ्यांच्याही,” माजी बँक संचालक आणि सध्या कोटा पुजारी असणारे ५८ वर्षीय आर. लक्ष्मणम सांगतात. “आम्ही आमच्या वस्तू दुसऱ्या समुदायांना विकायचो, आमच्या लोखंडी अवजारांच्या बदल्यात ते आम्हाला धान्य आणि सुकवलेल्या शेंगा देत असत. बहुतेक अवजारं शेतीसाठी, काही झाडं तोडायला आणि फांद्या छाटण्यासाठी. या डोंगराळ भागात घर बांधण्यासाठी प्रामुख्याने लाकूडच वापरलं जातं. झाडं तोडायला, वासे आणि खांब तयार करायला, सुतारकामासाठी – सगळ्या कामांसाठी आम्ही अवजारं बनवायचो.”
पण आज नीलगिरी जिल्ह्यातली ७० टक्के कुटुंबं वीट, लोखंड, सिमेंट काँक्रीट वापरून बांधलेल्या पक्क्या घरांमध्ये राहतात आणि २८ टक्के कुटुंबं निमपक्क्या घरांमध्ये (बांबू, माती आणि इतर साहित्य वापरून बांधलेल्या) राहतात. केवळ १.७ टक्के कुटुंबं जंगलातल्या वस्तू वापरून बनवलेल्या घरांमध्ये राहतात, जी घरं बांधण्यासाठी लोहाराचं कौशल्य लागतं. अगदी पुड्डु कोटागिरीमध्ये, जिथे रंगन आणि लक्ष्मणन राहतात, तिथेही फक्त सिमेंटचीच घरं आहेत.
रंगन त्यांच्या वडलांच्या हाताखाली ही कला शिकले आणि त्यांना आठवतंय त्यांच्या वडलांच्या हाताखाली पाच लोक कामाला होते. “माझे वडील फार कल्पक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अशी लोखंडी अवजारं तयार केली होती त्यांचा वापर करून कोणत्याही जमिनीत चहाची रोपं लावता यायची,” ते अभिमानाने सांगतात. अनेक आदिवासींसाठी शेतीकडून चांगला पैसा मिळवून देणाऱ्या चहाची लागवड करण्यासाठी त्यांची अवजारं मदतीला धावून आली आणि ती खरेदी करण्यासाठी झुंबड उठायची. “आमचीच अवजारं वापरून शेतजमीन आणि वनजमिनींचं चहाच्या मळ्यात रुपांतर व्हायला मदत झाली आणि हळू हळू तेच आमच्या व्यवसायाच्या मुळावर उठले,” लक्ष्मणन खेदाने सांगतात.
रंगन आजही पावसाळ्यात थोडी फार विक्री करतात. एरवी मात्र त्यांना काम मिळणं फार मुश्किल झालं आहे. त्यामुळेच त्यांना या महिन्यांमध्येच जी काही कमाई करायची ती करून घ्यावी लागते. “मी एका दिवसात लाकडी दांडा असणारे दोन मोठे कोयते बनवू शकतो. [एकूण] १००० रुपयांना हे विकले जातात. मला हे तयार करायला ६०० रुपये खर्च येतो. मात्र काम अगदी तेजीत असताना देखील दिवसाला दोन कोयते विकणंदेखील अवघड व्हायला लागलंय,” ते सांगतात.
विक्री मंदावली असली, भविष्य अनिश्चित असलं तरी रंगन हे काम सोडून द्यायला तयार नाहीत. “मला फार काही पैसा मिळत नाही मात्र हे निखारे, लोखंड आणि हा भाता, या सगळ्यांमधून नव्या नव्या गोष्टी तयार करण्यात मला आनंद मिळतो. आणि खरं तर हेच मला येतं.”
या लेखासाठी सहाय्य केल्याबद्दल मंगली षण्मुगम आणि अनुवादासाठी आर. लक्ष्मणन यांचे आभार.
अनुवादः मेधा काळे