कैलाश खंडागळेंनी मैदानात नजर टाकली आणि त्यांचे डोळे विस्फारले. “लईच शेतकरी आलेत हितं,” मैदानात लंगडत जाता जाता शेतमजुरी करणारे ३८ वर्षीय खंडागळे म्हणतात.
दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारो शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात गोळा झाले होते. २४ जानेवारी रोजी कैलाशही त्यांना सामील झाले. “मी तीन कायद्याला विरोध करायला आलोय. माझ्या कुटुंबाला रेशन मिळतं त्यावर या कायद्यांचा परिणाम होणार असं मी ऐकलंय,” ते सांगतात. त्यांच्या समाजातले लोक एक ते पाच एकर जमिनीत टोमॅटो, कांदा, बाजरी, भात अशी पिकं घेतात.
२४-२६ जानेवारी दरम्यान संयुक्त शेतकरी कामगार मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनासाठी अहमदनगर जिल्ह्यातून (त्यांच्या अंदाजानुसार) तब्बल ५०० महादेव कोळी आदिवासी शेतकरी आले होते, त्यातले ते एक. मुंबईपर्यंतचा ३५० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी अकोले, पारनेर आणि संगमनेर तालुक्यातल्या या शेतकऱ्यांनी प्रत्येकी २०० रुपये वर्गणी करून ३५ गाड्या भाड्याने घेतल्या होत्या.
संगमनेर तालुक्यातल्या खांबे गावचे कैलाश हे त्यांच्या सात जणांच्या कुटुंबातले एकटे कमावते सदस्य आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, भावना, म्हातारे आई-वडील आणि तीन मुलं राहतात. “मी दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला जातो, आणि दिवसाला मला २५० रुपये मिळतात. पण माझा पाय असला, त्यामुळे वर्षाला २०० दिवसांपेक्षा जास्त काय काम मिळत नाही,” ते सांगतात. वयाच्या १३ व्या वर्षी कैलाश यांच्या डाव्या पायाला इजा झाली आणि इतक्या वर्षांत त्यावर योग्य उपचार न झाल्याने तो पाय अधू झाला आहे. भावना देखील उजवा हात अधू असल्याने मेहनतीची कामं करू शकत नाहीत.
कमाई अशी थोडकी आणि अनियमित असल्याने खंडागळे कुटुंबासाठी सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीतून मिळणारं रेशन फार मोलाचं आहे. अन्न अधिकार कायदा, २०१३ नुसार भारतात ८० कोटी लोकांना रेशनवर धान्य मिळण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या कायद्यानुसार पात्र कुटुंबांना दर महा दर डोई पाच किलो धान्य स्वस्त दरात मिळण्याची तरतूद आहे. तांदूळ – ३ रु. किलो, गहू २ रु. किलो आणि भरड धान्यं १ रु. किलो या दरात मिळू शकतात.
पण कैलाश यांच्या सात जणांच्या कुटुंबाला मात्र केवळ १५ किलो गहू आणि १० किलो तांदूळ मिळतोय – त्यांना देय असलेल्या धान्यापेक्षा १० किलो कमी. कारण त्यांच्या दोन धाकट्या मुलांची नावं त्यांच्याकडे असलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना देण्यात येणाऱ्या शिधापत्रिकेतून गायब झाली आहेत.
“हे २५ किलो धान्य १५ दिवसातच पार होतं. त्यानंतर भूक मारावी लागते,” कैलाश सांगतात. दर महिन्याला रेशनच्या दुकानातून धान्य घेऊन येण्यासाठी त्यांना एकूण चार किलोमीटर अंतर चालत जावं लागतं. “तेल, मीठ-मसाला परत पोरांची शिक्षणं या सगळ्याचा खर्च येतोच. किराणा दुकानातलं महागडं धान्य खरेदी करायला पैसा कुठंय?”





