“मला कुणीच कामावर घेईना झालते. सगळी काळजी घेऊन बी घरातच येऊ देईना गेलते,” महाराष्ट्राच्या लातूर शहरात घरकामगार म्हणून काम करणाऱ्या जेहेदाबी सय्यद सांगतात. “हा कपडा [कापडी मास्क] कवा बी काढला नाही, अंतर ठेवलं, समदं केलं.”
२०२० साली एप्रिलमध्ये कोविड-१९ ची टाळेबंदी लागली आणि जेहेदाबी ज्यांच्याकडे काम करायच्या त्या पाचापैकी चार कुटुंबांनी त्यांचं काम बंद केलं. “माझ्याकडं एकच काम राहिलं, आन् तिथं बी लई काम लावायचे.”
तीस वर्षं झाली, जेहेदाबी घरकामगार म्हणून काम करतायत – आणि यातली बहुतेक वर्षं ज्या घरांनी त्यांना प्रवेश बंद केला त्याच घरांमध्ये भांडी घासणं आणि कपडे धुण्यात गेली आहेत. मार्च २०२० मध्ये दिल्लीच्या एका मरकजमध्ये तबलिगी जमातचे लोक जमले होते आणि ती जागा कोविडचं केंद्र बनली होती. त्यासंबंधी जो काही वादंग झाला त्याचा त्यांच्या मालकांवर निश्चित प्रभाव झाला असणार असं त्यांना वाटतंय. “मुसलमानाच्या लोकांपासून लांब रहा असली कुजबुज सुरू झाली का, आगीगत पसरली,” त्या सांगतात. “जमातमुळे माझ्या जावयाचं काम गेलं. पण त्याच्याशी माझा काय संबंध?”
महिन्याला ५,००० रुपयांची कमाई एकदम १,००० रुपयांवर आली. “ज्यांनी मला येऊ नको सांगितलं, ते काय मला परत कामावर बोलावणार नाहीत का?” त्या विचारतात. “मी किती वर्षं त्यांच्यासाठी काम केलं, आणि त्यांनीच मला वाऱ्यावर सोडली. बाकी बाया लावल्यात.”
गेल्या वर्षभरात त्यांची परिस्थिती फार काही बदललेली नाही. “जास्तच बेकार झालीया,” जेहेदाबी म्हणतात. मार्च २०२१ मध्ये त्या तीन घरात काम करत होत्या. महिन्याला ३,००० रुपये मिळत होते. पण एप्रिलमध्ये त्यातल्या दोन घरात त्यांना येऊ नका म्हणून सांगितलं गेलं. महाराष्ट्रात कोविड-१९ ची दुसरी लाट जोर धरत होती. “त्यांचं म्हणणं काय तर आम्ही झोपडपट्टीत राहताव. आन् तिथं कायच नियम पाळत नाई म्हन.”
त्यामुळे आता त्यांना एकाच कामाचे महिन्याला फक्त ७०० रुपये मिळतील. दुसरी कामं मिळेपर्यंत हे असंच आहे.





