“आमच्या पथकाने दोन गट तयार करून ट्रेनवर हल्ला केला, एकाचे नेतृत्व जी. डी. बापू लाडांनी, तर दुसर्या गटाचे नेतृत्व मी स्वत: केलं. अगदी येथेच, जेथे तुम्ही आता उभे आहात - याच ट्रॅकवर एकावर एक दगड रचून ट्रेन थांबवली. मग ट्रेन माघारी जाऊ शकणार नाही अशा रितीने मागेही धोंडे रचले. विळे-कोयते, लाठ्या आणि दोन-तीन सुतळी बॉम्ब याशिवाय कोणतीही बंदूक किंवा शस्त्रे आमच्याकडे नव्हती. मुख्य अंगरक्षकाकडे बंदूक होती पण तो घाबरलेला होता आणि त्याला काबूत ठेवणे सहज सोपे होते. आम्ही पगार उचलून खिळे ठोकले."
हे घडलं ७३ वर्षांपूर्वी. पण 'कॅप्टन भाऊ' लाडांकडून ऐकून ती कालचीच घटना वाटत होती. आता ९४ वर्षांचे, रामचंद्र श्रीपती लाड ज्यांना 'भाऊ' संबोधले जाते, ब्रिटिश राजच्या अधिकार्यांचे पगार घेऊन जाणार्या पुणे-मिरज ट्रेनवर त्यांनी नेतृत्व केलेला हल्ला किती आश्चर्यकारक स्पष्टतेने सांगत होते. "खूप दिवसांनंतर भाऊ एवढं स्पष्ट उच्चारात बोलले," या वयोवृद्ध स्वातंत्र्यसेनानीचे अनुयायी, बाळासाहेब गणपती शिंदे दबलेल्या आवाजात म्हणाले. परंतु नव्वदीतल्या 'कॅप्टन भाऊं' च्या आठवणी त्या रेल्वे ट्रॅकवर जिवंत झाल्या. येथेच त्यांनी आणि बापू लाडांनी धाडसी तूफान सेनेद्वारे ७ जून, १९४३ ला धाड टाकलेली.
त्या लढाईनंतर, सातारा जिल्ह्यातल्या शेणोली गावातल्या या स्थानी ते प्रथमच परत आले होते. काही क्षण तर ते विचारांमध्ये हरवूनच गेलेले, नंतर सर्व काही डोळ्यांसमोर लख्ख उभे राहिले. धाडीत सहभागी झालेल्या आपल्या सर्व सहकारी कॉम्रेड्सची नावे त्यांच्या लक्षात आहेत. आणि त्यांना आम्हांला हे आवर्जून सांगायचे आहे: "तो पैसा कोणत्याही व्यक्तीच्या खिशात नाही तर प्रतिसरकारला गेला. [सातार्याचे तात्पुरते सरकार] आम्ही ते पैसे गरजू आणि गरीबांना दिले."






