“माझ्या पिशवीत मी केळी भरून घेतली होती, त्याच्यावर पोट भरतोय,” सुरेंद्र राम मला फोनवर सांगत होते. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूच्या वेळी त्यांनी काय केलं ते. त्या दिवशी, मुंबईतली बहुतेक दुकानं आणि उद्योग बंद होते, ज्यांना शक्य होतं ते सगळे घरात थांबले होते, तेव्हाच सुरेंद्र परळच्या टाटा स्मृती रुग्णलयाशेजारच्या फूटपाथवर बसून राहिले होते.
सुरेंद्र ३७ वर्षांचे आहेत आणि त्यांना तोंडाचा कॅन्सर झालाय.
हा कर्फ्यू लागेपर्यंत हा फूटपाथच त्यांचं ‘घर’ होतं – त्यांनाच काय दक्षिण-मध्य मुंबईतल्या या धर्मादाय रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर राहणाऱ्या त्याच्यासारख्या अनेक रुग्णांसाठी ‘घरातच राहणं’ हे शक्यच नाहीये. सरकारी अनुदानावर चालणाऱ्या या रुग्णालयात भारतभरातले अनेक गरीब लोक स्वस्तात कॅन्सरवर उपचार मिळतात म्हणून येतात.
“माझ्या तपासण्या झाल्या आहेत,” सुरेंद्र सांगतात. “डॉक्टरांनी मला चार महिन्यांनी यायला सांगितलंय.” पण बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या आपल्या पोतिलिया गावी जाणंच त्यांना अशक्य झालंय कारण आधी रेल्वे कमी केल्या आणि २५ मार्चच्या संपूर्ण टाळेबंदीनंतर तर पूर्णच थांबवल्या गेल्या. “आता ते सांगतायत की २१ दिवस सगळं चक्क बंद होणार आहे. मला तर काही बातम्या कळत नाहीत. आजूबाजूच्या लोकांनाच विचारावं लागतं. तोपर्यंत मी या फूटपाथवर कसं रहायचं, सांगा?” सुरेंद्र विचारतात.
मी २० मार्च रोजी त्यांना भेटले तेव्हा फूटपाथवर अंथरलेल्या केशरी रंगाच्या प्लास्टिकच्या चवाळीवर बसून तोंडाच्या एका बाजूने ते केळी खात होते. डाव्या नाकपुडीत एक नळी घातलेली होती. “माझ्या घशातून घास खाली जात नाही, म्हणून ही नळी लागते,” ते म्हणाले. तिथेच चवाळीवर एका काळ्या पिशवीत त्यांनी त्यांचे कपडे, डॉक्टरांचे अहवाल, औषधं आणि केळी कोंबून ठेवली होती.
भर दुपारी देखील फूटपाथवर उंदरांचा सुळसुळाट होता. रुग्णांच्या जवळच काही घुशी मरून पडलेल्या दिसत होत्या. रात्री तर आणखीनच वाईट गत होते कारण मोठाले उंदीर बाहेर पडतात.
आम्ही भेटलो त्या दिवसापर्यंत सुरेंद्रकडे संरक्षक मास्क नव्हता. एका हिरव्या गमजाने ते तोंड आणि नाक झाकून घेत होते. दुसऱ्या दिवशी त्यांना कुणी तरी मास्क दिला. ते सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात आणि तिथलाच साबण वापरतात.
“ते लोकांना हात धुवा आणि सुरक्षित रहा असं सांगतायत. पण आमच्या सुरक्षेसाठी ते काहीच का करत नाहीयेत?” ते विचारतात. “आम्ही पण रुग्णच आहोत की.”
जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने कोविड-१९ची गंभीर लागण होण्याचा धोका असणाऱ्या व्यक्तींची यादी केली आहे – आणि त्यामध्ये कॅन्सर असणाऱ्या लोकांचा समावेश आहे. त्यात जर ते उघड्यावर, अन्नपाण्याशिवाय, स्वच्छतेच्या सुविधा नसलेल्या ठिकाणी राहत असले तर मग त्यांना तर किती धोका असेल याची कल्पनाच केलेली बरी.
लोकांचा एकमेकांशी कमीत कमी संपर्क यावा आणि लोक घरातच रहावेत हा टाळेबंदीचा उद्देश. पण मुंबईत खोली भाड्याने घेणं काही सुरेंद्र यांना परवडणारं नाही. “दर वेळी मी या शहरात येतो, तेव्हा मला हरवायलाच होतं. आता मला रहायला जागा कुठे मिळावी?” ते विचारतात. मुंबईत बऱ्याच ठिकाणी स्वस्तातल्या धर्मशाळा आहेत पण त्याबद्दल त्यांना काहीच माहित नाही. “इथे माझ्या ओळखीचं कुणीच नाही. कुणाला विचारावं?” ते म्हणतात.
गेलं एक वर्ष सुरेंद्र टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुंबईत एकटेच येतायत. त्यांची बायको, वय दोन आणि पाच अशी दोन मुलं गावाकडे आहेत. “गेल्या वर्षीपर्यंत मी बंगलोरमध्ये एका दवाखान्यात कामाला होतो. पण मग कॅन्सरमुळे मला ती नोकरी सोडायला लागली,” ते सांगतात. त्यांना महिन्याला १०,००० रुपये पगार मिळत होता. थोडे पैसे खर्चासाठी ठेऊन बाकी ते घरी पाठवायचे. आता उत्पन्नाचा काहीच स्रोत नाही त्यामुळे ते त्यांच्या नातेवाइकांवरच अवलंबून आहेत. “माझ्याकडे पैसा नाहीये. मुंबईला आलो की मी माझा मेव्हणा मला पैशाची मदत करतो.”
रुग्णालयातल्या उपचारासाठी सुरेंद्रंना ‘विना-शुल्क’ अशी सवलत आहे. “केमो आणि इतर उपचारांचं शुल्क कमी केलंय आणि बाकीचा खर्च रुग्णालयातर्फे केला जातो. पण मुंबईत रोज रहायचं म्हणजे मुश्किल आहे,” सुरेंद्र म्हणतात.
सकाळी रुग्णालयाच्या बाहेरच्या फूटपाथवर राहणाऱ्या रुग्णांना केळी आणि चपात्या मिळतात. संध्याकाळी मसाले भात मिळतो. काल (२९ मार्च) पहिल्यांदाच त्यांना सकाळी दूध मिळालं, काही सेवाभावी कार्यकर्त्यांनी वाटलं होतं.
डॉक्टरांनी अंगात पाणी कमी होऊ देऊ नका असा सल्ला त्यांना दिलाय. “काही लोक आमच्यासाठी खाणं घेऊन येतात, पण ते पाणी आणत नाहीत. आणि कर्फ्यू [टाळेबंदी]मध्ये ते आणायचं म्हणजे अवघड आहे,” ते सांगतात.
सुरेंद्र बसले होते तिथून काही पावलांच्या अंतरावरच संजय कुमार यांचं कुटुंब होतं. २० मार्च रोजी मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा संजय फूटपाथवर एका चटईवर आडवा पडला होता, उशाला सिमेंटचा एक गट्टू घेतला होता. हा १९-वर्षीय युवक (शीर्षक छायाचित्र पहा) हाडांच्या कर्करोगाने ग्रस्त आहे, त्याला त्याचा उजवा पाय हलवता येत नाही. त्याचा थोरला भाऊ विजय आणि वहिनी प्रेमलता त्याच्या सोबत गेला एक महिना फूटपाथवरच राहतायत.
काही दिवसांनी संजय मला फोनवर सांगतात, “या कर्फ्यूने [टाळेबंदी] आमचे हाल आणखीच वाढले आहेत, खाणं मिळणंही अवघड झालंय. कुणीच मदत केली नाही तर आम्ही पाव आणि बिस्किट खाऊन दिवस काढतो.”
संजयला पटकन उठता येत नाही आणि नीट चालता येत नाही. त्यामुळे रुग्णालयाशेजारच्या सार्वजनिक शौचालयात जायचं तरी त्याच्यासाठी मुश्किल होतं. “माझं शरीर हलत नाही, त्यामुळे मी रोज इथे पडून राहतो. रुग्णालयापासून फार लांब जाऊन पण चालत नाही मला,” तो सांगतो. चाललं तर त्याच्या उजव्या पायातून रक्त यायला लागतं. तीनच दिवसांआधी डॉक्टरांनी प्लास्टर घातलं आहे.
हे कुटुंब पहिल्यांदाच मुंबईला आलंय. “मला लोक सांगायचे की मुंबईत सुविधा चांगल्या आहेत म्हणून. पण आमच्यासाठी सुविधा म्हणजे फूटपाथवर रहायचं आणि रोज एकदा तरी पोटभर जेवण मिळेल याची वाट पहायची,” विजय सांगतो. स्वस्तातली कोणतीच राहण्याची सोय त्यांना परवडण्यासारखी नाही आणि त्यांनाही कुठल्याच धर्मशाळेची माहिती नाही.
“रोज, आम्हाला तपासण्या करून घेण्यासाठी डॉक्टरची वाट पहावी लागते,” विजय सांगतो. “आम्हाला माघारी जाणंही शक्य नाही.” त्यांचं घर म्हणजे मध्य प्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातल्या बैहार तालुका.
तिकडे गावी, त्यांचे आई-वडील मुलगा आणि सून सुखरुप माघारी येण्याची वाट पाहतायत. विजय त्यांच्या घरचा एकटा कमावता सदस्य आहे. तो बांधकामावर मजुरी करतो आणि महिन्याला ७,००० ते १०,००० रुपये कमावतो. संजयच्या मदतीला म्हणून तो मुंबईला आला आणि ही कमाईच थांबली. जी काही तुटपुंजी बचत होती त्यावर या कुटुंबाची गुजराण सुरू आहे.
“आम्ही दुकानातून, हॉटेलमधून काही तरी खाणं विकत घेत होतो, पुरी-भाजी किंवा काही तरी, पण किती दिवस असं खाणार? इथे डाळ-भात फार महाग मिळतो. बाथरुम वापरायची तरी पैसे द्यावे लागतात, फोन चार्ज करायचा तरी पैसे. मुंबईत प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही पैसा खर्च करतोय. मी एक मजूर आहे,” विजय सांगतो. अशा सगळ्या गरजांवरती विजयला दिवसाला १००-२०० रुपये खर्च करावे लागतायत, औषधं घ्यायची तर जास्तच.
रुग्णालयाच्या बाहेर फूटपाथवर राहणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियाना अनेक संस्था आणि व्यक्ती नियमित मदत करत असतात, त्यांना चपाती, केळी आणि दूध देतात. पण टाळेबंदीमुळे हे सगळंच अवघड होऊन बसलंय. “आम्हाला फक्त रात्री जेवण मिळालं,” ‘जनता कर्फ्यू’च्या दिवशीची गोष्ट विजय सांगतो. आदल्या दिवशीची उरलेली भाजी आणि ब्रेड खाऊन त्यांनी कसंबसं भागवलं.
कधी कधी, या टाळेबंदीच्या काळात, काही रुग्णांना तपासणीसाठी रुग्णालयात बोलावतात आणि तेव्हाच बाहेर खाणं वाटत असतात. आणि मग ते जेवणाला मुकतात – गेल्या सोमवारी करुणांचं असंच झालं. करुणा देवींना स्तनाचा कर्करोग आहे. रुग्णालयापासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या दादरच्या धर्मशाळेत जागा मिळावी म्हणून त्या किती तरी आठवडे वाट पाहतायत. काही धर्मशाळा दिवसाला रु. ५० ते रु. २०० इतकं शुल्क घेतात, जे अनेक रुग्णांना परवडत नाही.
२० मार्च रोजी, फूटपाथवर बसलेल्यांमध्ये एक होत्या आपले पती सतेंदर सिंग यांच्यासोबत बसलेल्या गीता सिंग. जवळच दोन दगडांच्या फटीत एक मेलेली घूस अडकून पडली होती. सहा महिन्यांपूर्वी गीतांना यकृताचा कर्करोग असल्याचं निदान झालं झालं होतं आणि गेले चार महिने त्या मुंबईत राहतायत. ते दोघं सोलापूरहून आले आहेत.
गेल्या आठवड्यापर्यंत ते दोघं उत्तर मुंबईच्या गोरेगावमध्ये सतेंदर यांच्या एका बहिणीकडे राहत होते. पण कोविड-१९ च्या भीतीमुळे त्या बहिणीने त्यांना घर सोडून जायला सांगतिलं. “ती म्हणाली की आम्ही रोज दवाखान्यात ये-जा करतो आणि तिच्या मुलाला संसर्ग होईल अशी तिला भीती वाटतीये. त्यामुळे आम्हाला तिथून बाहेर पडावं लागलं. आता गेल्या दोन दिवसांपासून आम्ही स्टेशन आणि फूटपाथवर राहतोय.”
खूप विनवण्या केल्यानंतर सतेंदर ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवलीत, रुग्णालयापासून ५० किलोमीटरवर राहणाऱ्या एका लांबच्या नातेवाइकाशी संपर्क साधू शकले. तो आणि गीता त्यानंतर तिथे रहायला गेले आणि आता राहण्या-खाण्याचे पैसे त्यांना देतायत.
गीताची तपासणी १ एप्रिलला होणार होती. त्यानंतर केमोथेरपी आणि लगेच त्या आठवड्यात शस्त्रक्रियाही ठरली होती. पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांची १ तारखेची भेट रद्द झालीये, सध्या सुरू असणारी औषधं आणि खबरदारीचे उपाय सुरू ठेवा. “आता आम्हाला गावी मुलांपाशी परतही जाता येत नाहीये. आणि इथे दवाखान्यातही प्रवेश नाही. इतर कसल्याच गोष्टी मिळत नाहीयेत. आम्ही अगदी अडकून पडलोय इथे,” सतेंदर सांगतात. त्यांना गीताच्या तब्येतीची चिंता लागून राहिलीये. “तिला सारख्या उलट्या होतायत.”
त्यांना १२ आणि १६ वयाची दोन मुलं आहेत, जी आता सतेंदरच्या मोठ्या भावाकडे राहतायत. “आम्ही लवकर परत येऊ असं त्यांना कबूल केलं होतं, पण आता त्यांचा चेहरा कधी पहायला मिळेल, कोण जाणे,” गीता म्हणतात. पाच महिन्यांपूर्वीपर्यंत सतेंदर एका यंत्रमाग कारखान्यात काम करत होते, जिथे त्यांना ७,००० रुपये पगार मिळायचा. टाटा रुग्णालय औषधांचा निम्मा खर्च उचलतंय, ते सांगतात. बाकीचा खर्च ते त्यांच्या बचतीतून करतायत.
तोंडाचा कर्करोग असणाऱ्या जमील खानला हीच चिंता सतावतीये. आई कमारजहाँ, भाऊ शकील आणि बहीण नसरीन यांच्यासोबत गेले सात महिने तो रुग्णालयाजवळच्या फूटपाथवर राहतोय. ते सगळे उत्तर प्रदेसातल्या बलरामपूर जिल्ह्यातल्या गोंडवा गावचे रहिवासी आहेत. कुटुंबातले बहुतेक जण शेतमजुरी करतात आणि काम असेल तेव्हा त्यांना दिवसाला २०० रुपये रोज मिळतो. नसेल तेव्हा ते कामाच्या शोधात शहरात जातात.
टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर ते नालासोपाऱ्याला लांबच्या एका नातेवाइकांकडे गेले. “थोड्या दिवसांसाठी त्यांनी आमची सोय केली, पण त्यांनाही आमचा मुक्काम एवढा लांबेल असं वाटलं नाही.”
नालासोपाऱ्यात राहणाऱ्या जमीलच्या नातेवाइकांनाही घरात चार जण वाढल्यामुळे जरा अडचण व्हायला लागलीये. “त्यांच्या घरी आधीच पाच लोकं, त्यात आमची भर. एवढ्या सगळ्यांसाठी खाण्यापिण्याची सोय करणं अवघड आहे. आमचा औषधांचा खर्च आठवड्याला ५०० रुपये येतो, आता आमच्याकडचे पैसेही संपायला लागलेत,” नसरीन सांगते. शनिवारी त्यांनी थोडी औषधं आणून ठेवलीयेत, पण त्यानंतर कसं काय भागवायचं हाच प्रश्न त्यांना पडलाय. जमीलच्या डाव्या गालावर गळू आलंय ते सारखं साफ करून त्याची मलमपट्टी करावी लागते.
जमीलला तर वाटायला लागलंय की फूटपाथवर राहणंच बरं होतं, “तिथे निदान दवाखाना तर जवळ होता. यातून [डाव्या गालातून] रक्त यायला लागलं, दुखायला लागलं तर मी निदान लागलीच दवाखान्यात तरी जाऊ शकायचो.”
“इथे, [नालासोपाऱ्यात] माझ्या भावाला काही झालं तर कोण जबाबदारी घेणार?” नसरीन विचारते. “त्याला काही दुखलं-खुपलं तर कुणाला फरक तरी पडतो का?”
टाटा स्मृती रुग्णालयाच्या जनसंपर्क विभागात काम करणारे नीलेश गोएंका मला फोनवर म्हणालेः “ज्या रुग्णांना तत्काळ उपचाराची गरज नाही अशांना आम्ही गावी परत जाण्याचा सल्ला दिला आहे. आमच्याकडून शक्य होईल ते सर्व करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
जानेवारी महिन्यात मुंबई मिरर वर्तमानपत्रामध्ये रुग्णालयाच्या जवळच असणाऱ्या हिंदमाता उड्डाणपुलाच्या खाली राहणाऱ्या कर्करुग्णाची कैफियत मांडण्यात आली होती. त्या बातमीनंतर अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना लागलीच धर्मशाळांमध्ये हलवण्यात आलं होतं. शहराच्या महानगरपालिकेने उड्डाणपुलाखाली फिरती शौचालयं आणि तात्पुरते निवारे तयार करण्यासारखे उपायही सुचवले होते. पण त्यानंतर फूटपाथवर राहणाऱ्या ज्यांच्या ज्यांच्याशी मी बोलले त्या कुणालाही याबद्दल काहीही ऐकण्यात आलेलं नाही.
अनुवादः मेधा काळे