पायाखाली हिरवं गवत, वरती निरभ्र आकाश, भोवताली हिरवी गार झाडं आणि जंगलातून संथ वाहत जाणारा ओढा. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात हे असं चित्र कुठेही पहायला मिळू शकतं.
पण ते तितकंच नाहीये. गीताताई त्या माहितीत जराशी भर घालते. “बाया डाव्या हाताला आन् गडी उजव्या.” या वस्तीचे लोक सकाळी संडासला कुठे जातात त्याची ही विभागणी.
“आम्हाला घोट्याइतक्या पाण्यात बसावं लागतं बाई – पावसाळ्यात तर छत्री घेऊन. पाळीच्या चार दिवसात तर काय होतं तुला काय सांगायच?” चाळिशीची गीताताई सांगते.
तिच्या वस्तीत ५० घरं आहेत. पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्याच्या कुरुळी गावाच्या वेशीवर असलेली ही वस्ती. प्रामुख्याने भिल आणि पारधी आदिवासींची. राज्यात अनुसूचित जमातींमध्ये गणल्या गेलेल्या या दोन्ही जमाती सर्वात गरीब तसंच वंचित समूहांपैकी आहेत.
भिल आदिवासी असणारी गीताताई असं उघड्यावर जायला लागतं त्याबद्दल फारशी खूश नाही. “गवत टोचतं, डास चावतात... कधी साप चावंल त्याची भीती राहती.”
दर वेळी जायचं तर पावला पावलाला कोण हल्ला करतंय का याची भीती असते. खास करुन स्त्रियांना जास्तच.
“आम्ही पहाटे चार वाजतो सगळ्या मिळून संडासला जातो. कुणी येईल का [आणि हल्ला करेल का] याची सारखी भीती असती,” २२ वर्षांची स्वाती सांगते. तीही भिल आदिवासी आहे.
गावापासून दोन किलोमीटरवर असलेली त्यांची वस्ती कुरुळी ग्राम पंचायतीच्या अखत्यारीत येते. पण वारंवार विनवण्या करूनसुद्धा त्यांच्या वस्तीत वीज, पाणी आणि संडासची सोय केलेली नाही. “आमच्या तक्रारी ते ऐकूनच घेत नाहीत कधी,” सत्तरीला टेकलेल्या विठाबाई सांगतात.
राज्याची स्थिती पाहिली तर ३९ टक्के आदिवासी लोकांना संडासची सोय उपलब्ध नाहीये. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवाल - ५ नुसार ग्रामीण महाराष्ट्रात २३ टक्के कुटुंबं “कुठल्याही प्रकारचा संडास वापरत नाहीत, ते उघड्यावर किंवा शेतात जातात.”
पण स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) यांनी मात्र जाहीरच करून टाकलंय की “स्वभामि (ग्रा) यांनी ग्रामीण भागात संडासाची सोय पुरवण्याचं अशक्यप्राय असणारं काम १०० टक्के पूर्ण करून भारताला ‘हागणदारीमुक्त देशा’चा दर्जा देण्याकडे पहिल्या टप्प्यात (२०१४-१९) कालबद्ध पद्धतीने वाटचाल केली आहे.”
कुरुळीच्या वेशीवरच्या या वस्तीत विठाबाईंचं अख्खं आयुष्य गेलंय. एका झाडाकडे बोट दाखवत त्या म्हणतात, “मीच लावलंय हे झाड. आता तूच काढ माझं वय किती असेल ते. तितकी सगळी वर्षं मी तिथं उघड्यावर [झाडीत] जातीये बघ.”