उत्तर कोलकात्यातील कुमारतुलीच्या अरुंद बोळांमध्ये, जिथे एखादी हातरिक्षा कशीबशी जाऊ शकते, तुम्हाला सहसा केवळ शहरातील मूर्तिकार, म्हणजेच कुमार भेटतील. दरवर्षी याच ठिकाणाहून दुर्गा देवी व इतर देवतांच्या मूर्ती कोलकात्यात प्रस्थान करतात.

इथे कार्तिक पाल यांची (वडलांच्या नावावरून) ‘ब्रजेश्वर अँड सन्स’ नावाची बांबू व प्लास्टिकच्या पत्र्यांची कार्यशाळा आहे. त्यांनी मूर्ती घडवण्याच्या मोठ्या व किचकट प्रक्रियेबद्दल आम्हाला सांगितलं. मूर्ती घडवण्याच्या प्रक्रियेत विविध टप्प्यांत गंगामाटी (गंगा नदीच्या किनाऱ्यावरची माती) आणि पाथ माटी (तागाचे कण व गंगा माटी यांचं मिश्रण) वापरली जाते.

Karthik Paul at his workshop in Kumartuli

कार्तिक पाल आपल्या कुमारतुलीतील कार्यशाळेत

आम्ही बोलत असताना पाल भगवान कार्तिक यांच्या मुखवट्याला चिकण मातीने आकार देत आहेत आणि आपल्या तरबेज हातांनी तिच्यावर सुबक काम करत आहेत. त्यासाठी ते एक कुंचला आणि बांबू पासून तयार केलेलं तासायचं अवजार, चियारी वापरतात.

जवळच्या एका कार्यशाळेत गोपाळ पाल यांनी मातीच्या ढाच्यावर तलम वस्त्र चिकटवण्यासाठी एक गोंद तयार केलाय, जेणेकरून त्याला त्वचेचं रूप येईल. गोपाल मूळचे उत्तर कोलकात्याहून १२० किलोमीटर दूर नाडिया जिल्ह्यातील कृष्णानगरचे आहेत. इथले पुष्कळ कारागीर – सगळे पुरुष – याच जिल्ह्यातून आले आहेत; त्यांच्यातील बहुतांश लोक याच भागात कार्यशाळेच्या मालकांनी दिलेल्या खोलीत राहतात. कामाच्या हंगामाच्या काही महिने आधीच कारागिरांना कामावर घेतलं जातं. ते आठ तासांच्या पाळींमध्ये काम करतात, पण शारदीय नवरात्राच्या काही दिवस आधी मात्र ते रात्रभर काम करतात. तेव्हा जास्त वेळ काम केल्याचा त्यांना मोबदलाही मिळतो.

कुमारतुलीतील कुंभारांची पहिली पिढी सुमारे ३०० वर्षांपूर्वी कृष्णानगर येथून स्थलांतरित झाली. ते बागबाझार घाटानजीक नव्यानेच वसलेल्या कुमारतुलीत राहू लागले, जेणेकरून नदीच्या किनाऱ्यावरील माती सहजपणे आणता यावी. मग ते जमीनदारांच्या घरी काम करू लागले, ठाकूरदालनांमध्ये (जमीनदारांच्या राहत्या घरी सणासुदीकरिता राखून ठेवण्यात आलेला भाग) दुर्गा पूजेच्या काही आठवडे आधी ते मूर्ती घडवत असत.

व्हिडिओ पहा: कुमारतुलीचा फेरफटका

१९०५ साली बंगालच्या फाळणीदरम्यान बांगलादेशातील ढाका, बिक्रमपूर आणि फरीदपूर येथील कुशल कारागिरांनी कुमारतुलीची वाट धरली. भारतात स्वातंत्र्यानंतर जमीनदारीचा ऱ्हास होत गेला आणि सर्बोजनिन अर्थात सार्वजानिक पूजा लोकप्रिय होऊ लागली. तेव्हा कुठे ठाकूरदालनांमध्ये कोंडून ठेवलेली माँ दुर्गा‌ रस्त्यांवरील भव्य पंडालांमध्ये म्हणजेच मंडपांमध्ये, जिथे देवी आणि इतर देवतांसाठी वेगळी व सुबक अशी आरास करण्यात येते, तिथे विराजमान झाली.

दुर्गा पूजा हा पश्चिम बंगालमधला सर्वांत मोठा सण आहे. त्याची सुरुवात सप्टेंबर अखेरीस व ऑक्टोबरच्या सुरुवातीस येणाऱ्या महालयापासून होते. या दिवशी हजारो लोक गंगेच्या (स्थानिक बोलीत हुगळी) किनारी आपल्या पूर्वजांचं तर्पण करतात. मूर्तीची स्थापना चतुर्थी ते षष्ठी दरम्यान होते. मुख्य पूजा महासप्तमी, महाष्टमी आणि महानवमी अशी तीन दिवस चालते. पूजेचे विधी लांबलचक आणि साग्रसंगीत असतात. तीन दिवसांनंतर दशमीला (अखेरचा दिवस) कोलकात्यातील बरेच भाविक हुगळी नदीवरील बाबूघाट आणि इतर ठिकाणी मूर्तीचं विसर्जन करून देवीला निरोप देतात.

कुमारतुलीतील आपल्या कार्यशाळेत एका मूर्तीवर शेवटचा हात फिरवता फिरवता कार्तिक आम्हाला सांगतात की ते आणि त्यांचे कामगार स्वतः रंग तयार करतात. ते खोडी माटी (समुद्रातील फेसापासून तयार करण्यात येणारी विशेष प्रकारची माती) रासायनिक रंग आणि खाई-बिची म्हणजेच चिंचोक्यापासून तयार केलेल्या गोंदात मिसळतात. चिंचोक्याच्या पुडीमुळे मूर्तीवर रंग जास्त काळ टिकतो.

कालांतराने तयार झालेल्या मूर्ती शहराकडे प्रवास सुरू करण्यास सज्ज होतील. कुमारतुलीतील कार्यशाळा मिणमिणत्या उजेडात आपल्या कलाकृतींना निरोप देतील. आता त्या कोलकत्यातील झगमगाटात मंडपांमध्ये राहायला जातील.

The artisans prepare a clay called ‘path mati’ by mixing jute particles with ‘atel mati’ from the Ganga

गंगा नदीतील ‘ अटेल माटी’ तागाचे कण मिसळून कारागीर ‘ पाथ माटी’ तयार करतात.

The process of making an idol starts with the 'kathamo', a bamboo structure to support the idol.
Once the bamboo structure is ready, straw is methodically bound together to give shape to an idol; the raw materials for this come from the nearby Bagbazar market

डावीकडे: मूर्ती घडवण्याची प्रक्रिया ‘ काठामो’ तयार करण्यापासून होते. हा बांबूचा ढाचा मूर्तीला आधार देतो. उजवीकडे: बांबूचा ढाचा तयार झाला की पद्धतशीरपणे काथ्या बांधून मूर्तीचा आकार देण्यात येतो, यासाठीचा कच्चा माल बागबाझार येथून येतो

An artisan applies sticky black clay on the straw structure to give the idol its final shape; the clay structure is then put out in the sun to dry for 3 to 4 days

मूर्तीला अंतिम आकार देण्यासाठी एक कारागीर काथ्याच्या ढाच्यावर काळी चिकणमाती लिंपतोय, त्यानंतर ही मूर्ती ते दिवस उन्हात सुकवत ठेवतील

कुंचला आणि बांबूचं तासायचं अवजार वापरून कोरीव काम केलं जातं

At another workshop nearby, Gopal Paul uses a fine towel-like material to give idols a skin-textured look

जवळच्या एका कार्यशाळेत गोपाल पाल मूर्तीला त्वचेसारखं स्वरूप देण्यासाठी एक तलम वस्त्र वापरतायत

With the painting of Maa Durga’s eyes on the auspicious day of Mahalaya, the clay idols are finally brought to life

महालयाच्या पावन मुहूर्तावर माँ दुर्गेचे डोळे रेखाटले, की या मूर्तींमध्ये प्राण फुंकला जातो

पहाः 'Journey through Kumartuli' फोटो अल्बम

हा व्हिडिओ आणि कहाणी सिंचिता माजी हिच्या २०१५-१६ मधील पारी फेलोशिप अंतर्गत करण्यात आले आहेत.

अनुवादः कौशल काळू

Sinchita Parbat

ਸਿੰਚਿਤਾ ਪਾਰਬਤ People’s Archive of Rural India ਦੀ ਸੀਨੀਅਰ ਵੀਡੀਓ ਐਡੀਟਰ ਹਨ ਅਤੇ ਇੱਕ ਸੁਤੰਤਰ ਫੋਟੋਗ੍ਰਾਫਰ ਤੇ ਡਾਕੂਮੈਂਟਰੀ ਫਿਲਮ ਨਿਰਮਾਤਾ ਹਨ। ਉਹਨਾਂ ਦੀਆਂ ਪਹਿਲੀਆਂ ਕਹਾਣੀਆਂ ਸਿੰਚਿਤਾ ਮਾਜੀ ਦੇ ਨਾਮ ਹੇਠ ਦਰਜ ਹਨ।

Other stories by Sinchita Parbat
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo